बोंडो : भारतातील एक डोंगरी आदिवासी जमात. ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात डोंगराळ भागात यांची मुख्यत्वे वस्ती आढळते. त्यांची लोकसंख्या ५,३३८ होती (१९७१).

पुरुष अंगावर एखादे फडके गुंडाळतात, तर स्त्रिया आखूड झगा घालतात त्यांना दागिन्यांची अतिशय आवड असून विविध धातू व माळेच्या मण्यांनी सर्वांग मढवितात. स्त्रियांचे केशवपन करतात.

एकमेकांपासून काहीशी दूर असलेली लाकडी घरे ते बांधतात डुकरे बांधण्याकरिता व्हरांडा व धान्य कोठाराकरिता वेगवेगळ्या जागा असतात.

पुरुषांची आणि स्त्रियांची स्वतंत्र युवागृहे प्रचारात आहेत. त्यांना अनुक्रमे इंगेरसिनी व सेलानी डिंगो म्हणतात. विवाहात वधू मूल्य असून देवर विवाह, अदलाबदल वगैरे पद्धती रुढ आहेत. बोंडो जमातीत पतीपेक्षा पत्नीचे वय जास्त असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. अपहरण विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात चालू आहे. या डोंगरी जमातीत पतीला अगर पत्नीला सहजासहजी घटस्फोट मिळत असला, तरी त्याचे प्रमाण कमी आहे.

दागिन्यांनी गावात एका बाजूला झाडाच्या भोवती एक ओटा असून तेथे धार्मिक, सामाजिक व राजकीय कार्ये चालतात गावातील तंटे बखेडे सोडवितात. गाव बव्हंशी स्वयंपूर्ण असते. बोंडो सोपान व बदलती शेती करतात. भात हे त्यांचे प्रमुख उत्पन्न असून मासेमारी व शिकार करतात. ते दुभती जनावरे व कोंबड्या पाळतात जनावराचे दूध काढत नाहीत. सर्व प्रकारचे मांस ते खातात. तांबड्या मुंग्या व उंदीर यांची त्यांना विशेष आवड आहे.

कंदमुळे व फळे, बांबूच्या कांबी, भुछत्र वगैरेंचे ते संकलन करतात.

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक कष्टाचे काम करतात. वांझपणा किंवा नापिकता अशुभ चिन्हे मानतात. त्याकरिता ‘डोगो’ देवाला रेडा बळी देतात. प्रत्येक धार्मिक विधीत बळीच्या रक्तात पेरणीसाठी राखलेले बी ते भिजवतात त्यामुळे त्याची क्षमता वाढते असे मानतात.

वास्तुदेवता, जमिनीची देवता, सूर्य, पाणी, स्थानिक देवता यांचे ते पूजन करतात. मृताचे दहन करतात आणि वीरगळ उभारतात. वडाच्या झाडावर पूर्वजांची शस्त्रे ठेवतात व त्यांची वर्षातून एकदा बोंडो पूजा करतात.

संदर्भ : 1. Elvin, Verrier, Bondo Highlander, Oxford, 1950. 2. Watts, Neville A. The Half Clad Tribals of Eastern Assam, Calcutta, 1970.

मांडके, म. बा.