मलयाळी : दक्षिण भारतातील संख्येने मोठी असलेली एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यत्वे तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम्‌, तिरूचिरापल्ली, सेलम आणि वेल्लोर (उत्तर अर्काट) या जिल्ह्यांत विशेषतः जावाडी, कलरायन व शेवराय टेकड्यांत आढळते. केरळ राज्यातही काही प्रमाणात मलयाळी आढळतात. त्यांची एकूण लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार १,५९,४२६ होती.

 

मलयाळी शब्दाचा अर्थ पहाडातील निवासी (मलाई=पहाड). पारंपरिक पद्धतीनुसार ते मूळचे वेल्लाळ जातीचे शेतकरी असून त्यांचे मूलस्थान कांचीपुरम्‌ (चिंगलपुट) असावे. तेथून या जातीतील तीन भाऊ स्वतंत्रपणे कलरायन, पछिमलई व कोल्लिमलई या डोंगररांगांत येऊन अनुक्रमे स्थायिक झाले. त्यावरून पेरिया मलयाळी, पयाई मलयाळी व कोल्ली मलयाळी या तीन प्रमुख शाखा उत्पन्न झाल्या. पुढे त्यांतही आणखी अनेक उपशाखा निर्माण झाल्या आहेत.

 

बहुतेक मलयाळी शेती वा शेतमजुरी करतात. काही कॉफीच्या मळ्यात काम करतात व जंगलातील फळे, मुळे, मध इ. गोळा करून विकतात. ते जनावरे पाळतात व नांगरटीसाठी त्यांचा वापर करतात. गाईचे दूध ते काढत नाहीत. कोल्ली मलयाळी या शाखेतील लोकसंख्या अधिक असून त्यांची वस्ती नामकल व रासीपुर तालुक्यांत डोंगर-दऱ्यांत आढळते.

 

या जमातीत व्यक्तीस्वातंत्र्य असून स्त्रीपुरुष दोघेही धूम्रपान करतात. पूर्वी हे लोक अर्धनग्न अवस्थेत जंगलातून वावरत असत. स्त्रिया एकाच पांढऱ्या कापडाने आपले शरीर कसेबसे झाकतात परंतु आधुनिकीकरणाबरोबर त्यांच्या पोषाखात स्थलपरत्वे आमूलाग्र बदल झाला आहे. काही भागात स्त्रिया साड्या वापरू लागल्या आहेत. स्त्रीपुरूष दोघानांही आभूषणांची आवड असते. ते हातात कडी, बांगड्या, कानात वाळी व नाकात अलंकार घालतात तसेच कपाळावर व गालावर गोंदवून घेतात.

 

यांची वस्ती प्रामुख्याने शेताजवळ किंवा कॉफीच्या मळ्याशेजारी असते. त्यांच्या झोपड्या गोलाकार असून बांबू, पामची पाने व गवत यांच्या साह्याने त्या उभ्या करतात. घराच्या पुढील बाजूस डुकरांसाठी जागा असते. हे लोक मासांहारी असून त्यांच्या आहारात डुक्कर बदक, माकड तसेच पक्ष्यांचे मांस हे मुख्य अन्न असते. मलयाळींची वस्ती भिन्न प्रदेशांत विखुरलेली असली तरी त्यांच्या चालीरीतींत तसेच राहणीमानात बरेचसे साधर्म्य आढळते.

 

जमातीची पंचायत असते. दहा गावांतील वस्ती मिळून एक पंचायत बनते. पंचायतप्रमूख (पट्टकरण/पेरिया नाडन) सर्व तंटे-बखेडे मिटवितो. पट्टकरणाच्या मदतीला मनीकरण म्हणून आणखी एक व्यक्ती असते. तीच मुलामुलींचे विवाह ठरविते आणि उरकवुन्डन नावाचा अधिकारी मुलींचा शोध घेतो आणि जमातीतील वाद मिटवितो. तोच विवाहादी समारंभाचे निमंत्रण देतो. जमातीत गावप्रमुखाला (मुप्पन) आदर असून महत्त्वाचे स्थान असते. जमातीत पुरोहितालाही (दोराई) महत्त्वाचे स्थान असते. तो धार्मिक विधी, विवाह यांसारखी कार्ये पार पाडतो. पुरोहितपद वंशपरंपरागत चालते.

 

या जमातीत मेंढ्या वा धान्याच्या स्वरूपात वधूमूल्य दिले जाते. मुलगी वयात आल्यावर बहिर्विवाही कुळींत (वागुप्पू) विवाह करतात पण वर मात्र वयाने लहान असतो. विवाहात ताली बांधणे हाच मुख्य विधी असतो. वर वधूस ताली बांधतो. वधू म्हणून मावसबहिणीस अग्रक्रम दिला जातो. वधूवरातील वयातील अंतरामुळे प्रजजनासाठी बहुपतित्व व बहुपत्नीवकत्व या दोन्ही बाबी जमातीत आढळतात. पुनर्विवाह व घटस्फोट यांना मान्यता आहे. रजस्वला स्त्रीस सात दिवस तर प्रसूतीनंतर १५ दिवस जननाशौच पाळतात. सोळाव्या दिवशी नामकरण करतात.

 

शिव आणि विष्णू या प्रसिद्ध देवतांबरोबरच मारियाची, पिडारी, काली, नाची, अय्यनार व मारी देवतांनाही ते भजतात. पोंगल, दिवाळी हे हिंदूंचे सण ते उत्साहाने साजरे करतात. पोंगलच्या दुसऱ्या दिवशी शिकार आणि बैलांचा खेळ हे करमणुकीचे कार्यक्रम ठेवतात. विसाव्या शतकात काही मलयाळींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून शिक्षणाचा प्रसार या डोंगर-दऱ्यांतील जमातीत झपाट्याने होत आहे. केंद्रशासन व राज्यशासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

धोबी, नाभिक, सुईण यांची कामे त्या त्या जातीतील लोकच या जमातीत येऊन करतात.

विवाहोत्तर जीवनात नवरा वयाने बाल असल्यामुळे मलयाळी स्त्रीला संततीसाठी स्वाभाविकच लैंगिक स्वातंत्र्य प्राप्त होते. त्यांमुळे जमातीतील कोणाही पुरुषाबरोबर ती लैंगिक संबंध ठेवते आणि अनेकवेळा सासरा-सून यांचे सलगीसंबंध आढळतात तथापि तिला झालेल्या सर्व मुलांचा सांभाळ नवऱ्यास कराव लागतो. परजातीतील व्यभिचाराबद्दल पुरूष अथवा स्त्रीस पंचायत विविध प्रकारच्या शिक्षा देते. त्यांपैकी सर्वांत गंभीर शिक्षा जमातीतून बहिष्कृत करणे ही असते.

 

मृत व्यक्तीस मलयाळी पुरतात परंतु ती जर साथीच्या अथवा कुष्टरोगाने मरण पावली असेल, तर तिचे दहन करतात. मृताबरोबर तंबाखू, सिगारेट, विड्याची पाने आणि सुपारी ठेवतात. मृताशौच सोळा दिवस पाळतात आणि ऐपतीप्रमाणे जेवण देतात.

संदर्भ : 1. Ramaswami, A, Ed. Madras District Gazetteers : Salem, Madras, 1967.

           2. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southerns India, Vol. IV, Madras, 1965.

शेख, रूक्साना