मिरी दांपत्यमिरी (जमात) : पूर्व भारतातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यत्वे आसामच्या सपाट भागात व अरुणाचल प्रदेशात आढळते. मिरी शब्दाचा अर्थ मध्यस्थ. पूर्वी अबोर लोकांशी आसामचा सर्व व्यवहार मिरींमार्फतच होत होता. त्यामुळेच यांना ‘मिरी’ म्हणून संबोधिले जाऊ लागले. काही तज्ञ ही जमात अबोर जमातीचीच एक पोटशाखा असावी, असे मानतात. त्यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार २,७१,९८४ होती. भौगोलिक दृष्ट्या यांच्यात दोन भाग आहेत : पहाडी मिरी आणि पठारावरील मिरी. दोन्ही मिरींमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या विशेष फरक आढळत नाही तथापि स्थलपरत्वे त्यांच्या राहणीमानात काही किरकोळ बदल झालेले दिसतात. याशिवाय धिघासी, बार्डोलीनी, पाणीबोटिया आणि तारबोटिया अशा चार आणखी उपशाखा स्थलपरत्वे त्यात आढळतात.

हे लोक मंगोलियनसदृश असून तपकिरी वर्ण, उंच शरीरयष्टी व घाटदार बांधा ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा आवाज मृदू व खोल असून ते खूप हळू बोलतात.

यांची वस्ती नदीकिनारी असून ते आपली घरे जमिनीत खांब रोवून उंच केलेल्या मंडपावर किंवा चौथऱ्यावर एका ओळीत बांधतात. घराची जमीन बांबूच्या कामट्यांची व छप्पर फांद्या, पानांचे असते. घरे आकाराने मोठी असतात. एका घरात साधारणतः तीस जोडपी राहतात. घराच्या खालील भागात डुकरे, कोंबड्या आणि गुरे व पाळीव प्राण्यांसाठी जागा असते. गावापासून दूर धान्याचा साठा असतो. तसेच मूल्यवान किंमती सामान पुरून ठेवतात.

शेती हा प्रमुख व्यवसाय असून ते बदलती शेती करतात. लागवडीयोग्य जमिनीतील फक्त पाचवा हिस्साच दरवर्षी पिकवितात. दर दोन वर्षांनी जमिनीचा भाग बदलतात. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, बटाटे, तंबाखू, मिरी इ. पिके घेतात परंतु लागवडीखाली कमी जमीन असल्यामुळे त्यांना शिकार हा जोडधंदा करावा लागतो. जमातीतील काही लोक सपाट मैदानी भागात जाऊन मांस, मासे वाळवून आणतात. तसेच शेतीतील उत्पन्नाची ने-आण करतात. हे लोक निरनिराळ्या प्रकारचे सापळे लावून लहानमोठे प्राणी पकडण्यात तरबेज असतात. तसेच ते मिथान, डुकरे, कोंबड्या व शेळ्याही पाळतात. ही जमात मांसाहारी असून मद्यपान त्यांच्यात रूढ आहे. ते तांदळापासून बनविलेली दारू (अपाँग) पितात. ते मिथान पाळत असले, तरी त्याचा दुधासाठी वापर करीत नाहीत.

यांच्या पोषाखात आधुनिकीकरणाचा स्थलपरत्वे परिणाम झालेला दिसून येतो. पर्वतीय मिरी स्त्रिया वेताच्या पट्‌ट्यांपासून बनविलेला परकर नेसतात. त्यांचा उरोभाग उघडाच असतो, तर पाणीबोटिया मिरी स्त्रियांचा पोषाख वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यांच्या कमरेला चामड्याचा रुंद पट्टा व त्यावर पितळी चकत्या बसविलेल्या असतात. त्यावर वेताचा परकर नेसतात. एरवी त्या शालीसारखे रेशमी कापड पांघरतात. पुरुष जवळजवळ अर्धनग्न अवस्थेत भटकतात. फक्त मुखिया विशिष्ट आकाराची बांबूची टोपी डोक्यावर घालतो आणि उत्तरीय पांघरतो. तसेच केसांच्या धाग्यांपासून बनविलेला काळा बिनबाह्यांचा कोट घालतो. पुरुष कपाळावर केसांची गाठ बांधतात. कपाळाभोवती पितळेचा किंवा तांब्याचा पट्टा घट्ट बांधतात. स्त्रिया दोन वेण्या घालतात. स्त्रियांना अलंकाराची आवड असून त्या बांगड्या, गळ्यात माळा तसेच कर्णभूषणे वापरतात.

बहुपत्नीत्वाची व बहुपतित्वाची प्रथा रूढ असून यांच्यात वधुमूल्य रूढ आहे. फक्त जमातप्रमुख अनेक बायका करू शकतो. त्याच्या मृत्यूनंतर फक्त मुलाची आई सोडून त्या सर्व बायका मुलाच्या होतात. आसाममधील सर्व सण व उत्सव मिरी साजरे करतात. आसाममधील बिहू उत्सवात मिरी मुली नृत्य करतात. वर्षातून एक खास उत्सव असतो. त्यावेळी मुलेमुली एकत्र राहतात आणि आपला जोडीदार निवडतात. हे लोक आसाममधील गोसावी ब्राह्मणाला आपला गुरू मानतात. यांचा भुताखेतांवर विश्वास असून ते पशुबळी देतात. तसेच ते निसर्गपूजाही करतात. जमातीत जमातप्रमुखाला महत्त्वाचे स्थान असते. यांच्या जमातपंचायतीला केबांग म्हणतात.

या जमातीत मृताचे दफन करतात. त्याचबरोबर त्याचे कपडे, दागिने, स्वयंपाकाची भांडी इ. पुरतात. जमातप्रमुख पुरलेल्या ठिकाणी स्मृतिशिळा उभारतात.

संदर्भ : 1. Baveja, J. D. New Horizons of North East, Gauhati, 1982.

             2. Dalton, E. T. Descriptive Ethnology of Bengal, Calcutta, 1978.

             3. Dutt, S. C. The Wild Tribes of India, 1984.

             4. Furer-Haimendorf, Christoph Von, Highlanders of Arunachal Pradesh, New Delhi, 1982.

             5. Nair, P. T. Tribes of Arunachal Pradesh, 1985.

शेख, रुक्साना