पंग्वाल : हिमाचल प्रदेशातील एक आदिवासी जमात. यांचा उल्लेख कधीकथी पांगी असाही करतात. यांची लोकसंख्या ९,२९१ (१९७१) होती. यांच्यात ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, राठी, लोहार, डाकी व मेघ या सर्व तऱ्हेच्या जाती-जमातींचे लोक आढळतात. पंग्वाल हे चिनाब, रावी, बिआस व लाहुल या नदीखोऱ्यांतून इकडे आले असावेत, असा एक मतप्रवाह आहे. हे लोक शेतीची फक्त नांगरट व लाकूडतोड करतात. उरलेली सर्व कामे त्यांच्या स्त्रिया करतात. यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून शेतीतील धान्य त्यांना अपुरे पडते, म्हणन कंदमुळांवर त्यांना उपजीविका करावी लागते.

पंग्वाल कन्या

पांगींंमध्ये विशू ऊर्फ बिसोआ हा सण वैशाख शुद्ध प्रतिपदेला पाळतात. त्या दिवशी तुपात तळलेल्या गव्हाच्या घाऱ्या (त्यांना सौज म्हणतात) देवीला वाहतात व जवापासून केलेली दारू ऊर्फ कुगरी पितात. माघ शुद्ध प्रतिपदेला पितृपूजा करतात. माघ पौर्णिमेला ‘खौल’ हा उत्सव साजरा करतात. त्या दिवशी एक मशाल, तिला दलपुती किंवा चाजगी म्हणतात, ग्रामप्रमुख गावाच्या देवतांपुढे ओवाळतो, मुलेही लहान पलिते करतात व ते अक्रोडाच्या झाडावर फेकतात. जर पलिता त्याच्या फांदीत अडकला, तर जो फेकील त्याला मुलगा होतो असे समजतात. त्या दिवशी गोड पदार्थ करून खातात. पुरुष पायजमा व अंगरखा वापरतात, तर स्त्रिया चुणीदार पायजमा व चोळी घालतात. कमरेला पट्टा बांधतात. केसांचा अंबाडा घालून तो रुमालाने बांधतात. यांच्यात सन्मान्य विवाह पद्धतीला म्हणजे वाडवडिलांच्या संमतीने झालेल्या विवाहाला जानजी ऊर्फ जानी म्हणतात. त्यात सातूचे ‘तातू’ म्हणजे टोकदार उंच लाडू करतात व ते मुलाचे आईबाप मुलीच्या आईवडिलांना लग्‍नाच्या वेळी देतात. लग्न झाल्यावर चार दिवसांनी पत्नी पतीला घेऊन माहेरी येते व चार दिवस राहते. या विधीला फिरनी म्हणतात. त्यांच्यात तीन पद्धतींनी विवाह होतात : देज देऊन, मुलाने मुलीच्या घरी नोकरी करून आणि साटेलोटे पद्धतीने. यांना अनुक्रमे फक्की पकडना, बार्टी आणी सेवा विवाह असे म्हणतात. या जमातीत पुरुष आळशी असल्यामुळे स्त्रिया बाहेरच्या प्रदेशातील वर शोधतात. त्यामुळे नैतिक बाबतीत शिथिलता आढळते व जमातीच्या मुलांना वधू मिळणे कठीण जाते. पंग्वाल हिंदुधर्मीय असूनही बौद्ध दैवदेवतांना भजतात. यांशिवाय स्थानिक देवदेवता व भुतेखेते यांचीही ते पूजा करतात. हिंदूंचे बहुतेक उत्सव ते साजरे करतात. अनेक पंग्वाल मुळात मांसाशन करीत नाहीत पण धान्याच्या तुटवड्यामुळे त्यांस हे कृत्य करावे लागते. ते पंगवाली ही बोलीभाषा बोलतात. त्या भाषेत साहित्य नाही, मात्र मौखिक परंपरेने काही कथा आणि गीते जतन केली जातात. मृताला अग्‍निसंस्कार देतात. मृत्यूचा वार हा वर्षभर उपासाचा म्हणजे एकाशनाचा म्हणून पाळतात.

देशपांडे, सु. र.