लेव्ही-स्त्राऊस, क्लोद : (२८ नोव्हेंबर १९०८ – ). फ्रान्समधील संरचनावादी मानवशास्त्राचा प्रवर्तक आणि तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे झाला. त्याचे वडील चित्रकार होते आणि व्यावसायानिमित्त ते भटकंती करीत तथापि लेव्ही-स्त्राऊसचे बालपण पॅरिस येथे गेले. सॉरबॉन विद्यापीठातून त्याने तत्त्वज्ञान व कायदा या विषयांत पदवी घेतली (१९३२) आणि माध्यमिक विद्यालयात अध्यापकाची नोकरी धरली. त्यावेळी झां-पॉल सार्त्र व कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानांची छाप त्याच्यावर पडली. पुढे ब्राझील येथील साऊँ पाउलू विद्यापीठात समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९३४-३७). या सुमारास त्याने ब्राझीलमधील इंडियन जमातीमध्ये (अमेरिंड) प्रत्यक्ष राहून क्षेत्र-अभ्यास केला. काही वर्षे त्याने न्यू स्कूल (न्यूयॉर्क) या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले (१९४१-४५). तेथे भाषाशास्त्रज्ञ रॉमान याकबसन याच्या सान्निध्यात तो आला. त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकली. त्याच्या कार्यपद्धतीचा आणि ज्ञानाचा त्याच्यावर प्रभाव पडला. त्याची परिणती पुढे त्याच्या संरचनात्मक मानवशास्त्रावरील लेखनात प्रकर्षाने आढळून येते. त्याने ल अनॅलिस स्त्रक्चरल एन् लिंग्विस्तिक एत एन् अँथ्रपलॉजी हा शोधनिबंध १९४५ मध्ये प्रसिद्ध करून संरचनावादाची ओळख करून दिली आणि नंतर लेस स्त्रक्चर्स एलिमेन्तेअर्स द ल पेरेन्ते (द एलेमेन्टरी स्ट्रक्चर ऑफ किन्‌शिप इं. शी.) हा बृहदग्रंथ लिहिला (१९४९). आते-मामे भावंडांत विवाह करण्याच्या पद्धतीमुळे आत्पसंबंधांचे नातेवाईक जास्त जवळ येतात व त्यांचे परस्परसंबंध टिकून राहतात. आते-मामे भावंडांच्या विवाहाच्या सामाजिक परिणामांचा विस्तृत अभ्यास करून लेव्ही-स्त्राऊसने अशा विवाहांमुळे सामाजिक ऐक्यभाव वाढीस लागतो, हे मत प्रतिपादन केले आणि आप्तसंबंधांतील लोकांच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण होण्यास मदत होते, असे दाखवून दिले. पतिपत्नींमधील या देवाण-घेवाणीतील नातेसंबंध समजू शकतात तद्वतच मालाच्या व सेवांच्या देवघेवीतून आर्थिक व्यवहार समजतात.

क्लोद लेव्ही-स्त्राऊसया ग्रंथांमुळे मानवशास्त्रज्ञ म्हणून त्याचा नावलौकिक झाला. सहसंचालक आणि संचालक म्हणून त्याची अनुक्रमे मुसी द ल-होम आणि इकोल प्रातीक देस हॉल्स इनुदेस या मान्यवर संस्थांत १९५० ते १९७४ दरम्यान नियुक्ती झाली मॅन : रिव्ह्यू ऑफ फ्रेंच अँथ्रपॉलॉजी या नियतकालिकाचे संपादकत्व त्याच्याकडे आले. १९५९ मध्ये त्याच्याकरिता कॉलेज द फ्रान्स (पॅरिस) येथे सामाजिक मानवशास्त्र विषयातील प्राध्यापक हे पद निर्माण करण्यात आले. या पदावर त्याने अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. 

   

प्रत्यक्ष सर्वेक्षण, क्षेत्र-अभ्यास व संशोधन यांद्वारे माहिती संकलित करून त्याने त्रिस्तेस त्रॉपिक्‌स (१९५५) हा काहीसा आत्मचरित्र कथन करणारा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर अँथ्रपलॉजी स्त्रकचरले आणि लेस स्त्रक्चरस एलिमेन्तेअर्स (१९५८) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. या दोन ग्रंथांत त्याच्या सर्व संशोधनाचे सारभूत विवेचन आणि विश्लेषण आढळते. त्याने नातेसंबंध या संकल्पनेचे विश्लेषण विशेषतः संमिश्र संरचनांवर भर देऊन करण्याचे काम पुढे चालू ठेवले. आदिवासींच्या विभिन्न धर्मकल्पना व मिथ्यकथा यांवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या संरचनावादाचे प्रमुख घटक संस्कृती-प्रधान शब्दार्थ पद्धती आणि तिच्या मुळाशी असलेल्या सामान्य नियमांत आढळतात. संरचनात्मक भाषाशास्त्राचे तंत्र आणि तत्त्व यांचे निकष लावून त्याने वर्तणुकीच्या विविध छटांचा शोध घेतला आणि संरचनात्मक मानवशास्त्र ही संज्ञा सूत्रबद्ध केली. आदिवासींच्या चालीरीती, धार्मिक परंपरा, रूढी आणि मिथ्यकथा यांचा अभ्यास करून त्याने त्यांतील सामाजिक वास्तवता निदर्शनास आणली आणि समाजपरत्वे या पद्धतीत बदल होतात, हेही दाखवून दिले. मानवाच्या वर्तनाच्या मूळाशी एक तर्कशुद्ध उपसंरचना असते. तिचा शोध संरचनात्मक भाषाशास्त्र, संचारण, संदेशवहनशास्त्र आणि सांख्यिकीय यांद्वारे घेता येईल. म्हणून संरचनात्मक विश्लेषणाचा अंतिम उद्देश मानवी मनाचे संचलन करणाऱ्या वैश्विक तत्त्वांचा शोध घेणे होय, असे समर्थन त्याने दिले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास संस्कृत्या ह्या सामाजिक स्थिती नियंत्रण करणारी यंत्रे होत, असे तो म्हणे.

लेव्ही-स्त्राऊसने संरचनावादाची संकल्पना स्पष्ट केल्यानंतर मिथ्यकथाविद्या, गणचिन्हवाद इ. संकल्पनांवर विस्तृत लेखन केले. लेतोने मिस्मे औजुर्दहुई (१९६२), ल पेन्सी सेव्हेज (१९६२) आणि मायथॉलॉजिक्स (१९६४-७१) हे यांवरील तीन प्रमुख ग्रंथ होत. मायथॉलॉजिक्स या ग्रंथाचे चार स्वतंत्र खंड असून त्यात त्याने अमेरिंडियन जमातींच्या एक हजार मिथ्यकथांचे विश्लेषण केले असून, वायव्य पॅसिफिक किनाऱ्यावरील अमेरिंडियन कला आणि धार्मिक विधी यांचाही त्यात समावेश केला आहे. यांशिवाय त्याने स्फुटलेखांच्या स्वरूपात अनेक शोधनिबंध लिहिले. लेव्ही-स्त्राऊसच्या बहुतेक ग्रंथांची इंग्रजी व अन्य यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली असून त्याच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत.

लेव्ही-स्त्राऊसला अनेक मान-सन्मान आणि सन्मान्य डॉक्टरेट पदवी मिळाली. त्यांपैकी हक्स्ली मिमॉरिअल मेडल (१९६५), इंटरनॅशनल गोल्ड मेडल आणि व्हायकिंग फंड प्राइझ (१९६६), इरॅस्मस प्राइझ (१९७३) इ. पदके प्रतिष्ठेची असून इटलीच्या अध्यक्षांच्या नावे असलेले सुवर्ण पदक (१९७१) मिळाले. लेव्ही स्त्राऊसने पहिले लग्न डायना ड्रायफस (१९३२) आणि नंतर दुसरे रोझ मेरी यूल्मो (१९४६) यांबरोबर केले तथापि मॉनिक रॉमान या तिसऱ्या पत्नीला त्याच्या खासगी जीवनात विशेष स्थान आहे. तिच्याबरोबर १९५४ मध्ये तो विवाहबद्ध झाला. त्याला तिच्यापासून एक मुलगा झाला. तिने शेलिया हिक्स (१९७३) नावाचे एक पुस्तक लिहिले असून त्यात फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या अमेरिकन कलाकारांच्या कलाकृतींविषयी माहिती आहे. याशिवाय तिने काही मानवशास्त्रावरील ग्रंथांचेही भाषांतर केले आहे.

संदर्भ : 1. Backes-Clement, Catherine, Claude Levi-Strauss, Paris, 1970.

           2 . Boon, J. A. From Symbolism to Structuralism : Levi Strauss in Literary Tradition,

                London, 1972.

           3. Gardner, Howard, The Quest for Mind : Piaget, Levi-Strauss and the Structualist

               Movement, New York, 1973.

           4. Leach, Edmund R. Levi-Strauss, London, 1970 .

           5. Merquior, J. G. Liesthetique de Levi-Strauss, Paris, 1977 .

 

देशपांडे, सु. र.