मग : भारतातील एक आदिम जमात. ही जमात त्रिपुरा व पश्चिम बंगाल राज्यांत आढळते. पश्चिम बंगालमध्ये त्यांची वस्ती हळूहळू विरळ होते असून मुख्य वस्ती ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातच आढळते. ही जमात चिनी-भारतीय जमात या नावाने प्रसिद्ध असून त्यांना माघही म्हणतात तथापि ते स्वतःला मरमग्री, भुईया माघ, बरूआ माघ, राजवंसी माघ, मरमा ऊर्फ मयमा, रोआंग माघ व थोंगला ऊर्फ जुमिया माघ इ. विविध नावांनी संबोधितात. ही नावे स्थलपरत्वे त्यांना दिलेली आढळतात. त्यांची लोकसंख्या १६,५३० (१९७१) होती.

मग जमातीत तीन अंतर्विवाही शाखा आहेत : (१) थोंगटा, थोंगला ऊर्फ जुमिया माघ, (२) मरमा ऊर्फ मयमा, रोआंग ऊर्फ रखाइंग माघ आणि (३) मरमग्री ऊर्फ राजवंसी, बरुआ किंवा भुईया माघ.या जमातीचे रूपसाद्दश मंगोलियनांशी आहे. ठेंगू बांधा, रुंदव बसका चेहरा, उंच गाल-हाडे, पसरट व बसके नाक ही मंगोलॉइड वंशाची शारीरिक वैशिष्ट्ये त्यांच्यांत आढळतात परंतु यांच्यातील मूळ मंगोलियन वंशाची शारीरिक वैशिष्ट्ये ते जसजसे बंगाली लोकांत अधिकाधिक शरीरसंबंधांमुळे मिसळत गेले, तसतशी लोप पावत गेलेली दिसतात. बहुतेक मग शेती करतात व काहीजण मजुरी करतात. राजवंसी मगांपैकी अनेकजण उत्तम स्वयंपाकी म्हणून प्रसिद्ध आहेत.

माघांतल्या तिन्ही शाखांतल्या कुळींची नावे विविध असून यांपैकी बहुसंख्य कुळींची नावे नद्यांच्या नावांवरून पडलेली आहेत. ज्या स्थानी त्या कुळीचे मूलस्थान असेल, तेच तिच्या नावात प्रगट होते. कुळीअंतर्गत विवाह निषिद्ध असून हा दंडक कटाक्षाने पाळण्यात येतो. काही कुळी मातृवंशीय आहेत, त्यांत क्वचितच कुळी-अंतर्गत विवाहविधी होतो.

मग जमातीत वधूमूल्याची पद्धत असून मुलीचे लग्न खालच्या कुळीतल्या माणसाशी झाले, तर देज अधिक द्यावे लागते. उदा., राजवंसी माघ मुलीबरोबर जर भुईया माघ मुलाचे लग्न झाले तर त्याला अधिक देज द्यावे लागते. मरमग्रींमध्ये बंगाली हिंदूंप्रमाणे महत्त्वाचा विधी ‘सिंदुरदान’ म्हणजे वराने वधूच्या भांगात शेंदूर भरण्याचा असतो, नंतर ऐपतीप्रमाणे अहेरदान झाल्यावर उत्तान नाचगाणी आणि कामुक शब्द यांनी करमणूक करतात.

मग जमातीत बहुपत्नीकत्वाची परंपरा आहे. तसेच घटस्फोटही रूढ आहे. बहुतेक सर्व मग हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांचा बौद्ध पंथ दाक्षिणात्य आहे. उत्तरेकडच्या तिबेटी बौद्ध पंथाला ते त्याज्य मानतात पण थोंगला माघ अद्यापि जडप्राणवादी असून त्यांचा ओढा हिंदू धर्मातील तंत्रमार्गाकडे अधिक आहे. तंत्रधर्मातील शिव आणि दुर्गा या दैवतांची ते पूजाअर्चा करतात. प्रत्येक मग वस्तीच्या खेड्यात बांबूंनी तयार केलेले एक मंदिर (खिआँग) असते. त्यात गौतमाची प्रतिमा पूजेसाठी वापरला जाते.

मग लोकांत मर्तिकाचा विधी फार समारंभाने करतात. प्रेत ताटीवरून नेतात. दफनाच्या जागी एक पॅगोडा किंवा बौद्ध धर्मीय बांबूचा पूजा मंडप करतात. त्या मंडपात प्रेतासाठी स्त्रीपुरूष मोठमोठ्याने शोक करतात. पुरूष एका बाजूला व स्त्रिया एका बाजूला अशा पद्धतीने ताटी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी दोन्ही पक्षात मोठी झोंबाझोंबी होते. मृताला आपल्यामधून जाऊ न देण्याचा हा अखेरचा अट्टाहासी आकांत असतो. काही वेळाने एक पक्ष जिंकतो आणि मग प्रेत ताटीसकट त्या मंडपात ठेवतात व त्या मंडपाला अग्नी देतात. 

संदर्भ : Risley, H.H. The Tribes and Castes of Bengal, Vol.II, Calcutta, 1891.

भागवत, दुर्गा