ठाकूर : महाराष्ट्रातील एक प्रमुख जमात. पंजाब व जम्मू-काश्मीर राज्यांत असलेले काही जातींनाही ठाकूर असे नाव आहे. उत्तर भारतातील एका क्षत्रिय जातीसमूहासही ठाकूर म्हणतात. श्री. वि. का. राजवाडे ठाकूर हा शब्द तस्कर = चोर शब्दावरून व्युत्पादितात. कात्यायनही ठाकूरांना तस्कर म्हणून ओळखतो. सुलतान मुहम्मदच्या आक्रमणांनी त्रस्त होऊन गुजरातचे ठक्कर रानावनात पळून गेले. त्यांच्याबरोबर इतर लोक होते. त्या सर्वांना मिळून पुढे ठाकूर असे म्हणू लागले, असे डॉ. विल्सन म्हणत. चालुक्यांच्या एका शिलालेखात ठाकूरांचा उल्लेख आढळतो. राजस्थानातील राजपूत सरदार आपल्याला ठाकूर म्हणून घेतात.

महाराष्ट्रातील ठाकूर जमात मुख्यत्वे उत्तर कोकणातील कुलाबा व ठाणे जिल्ह्यांत आढळते. याशिवाय पुणे, अहमदनगर, नासिक या जिल्ह्यांतूनही ठाकूरांची वसती आहे. १९६१ च्या जनगनेनुसार त्यांची संख्या १,५९,३७२ होती. यांपैकी ७५ टक्के ठाकूरांची वसती ठाणे, कुलाबा आणि नासिक जिल्ह्यांत आढळते. त्यांच्यात दोन उपजाती आहेत : क-ठाकूर व म (मा)–ठाकूर. महालदेशातून आले ते म व कोकणातून आले ते क होत. म म्हणजे मोठे व क म्हणजे कनिष्ठ असाही भेद केला जातो. हे दोन वर्ण वारंवार त्यांच्या बोलण्यात येतात, म्हणून त्यांना तशी नवे मिळाली असावीत, असेही म्हटले जाते.

सामान्यपणे शेती हा ठाकूरांचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय ते मच्छीमारी व मजुरीही करतात. नागली, वरी ही धान्ये ते मुखत्वे पिकावितात. ठाकूरांचे मुख्य अन्न नाचणी, वरी यांची भाकरी आणि भात. त्याशिवाय उडीद, तूर व कुळीथ त्यांना विशेष आवडतात. भाकरीबरोबर सुकलेले मासे भाजून ते खातात. काही ठाकूर ताडीचे उत्पादन करतात.

ठाकूरांचे कुटुंब पितृप्रधान असते. बहुसंख्य कुटुंबे बीजात्मक असतात. वयात आलेल्या मुलामुलींचे विवाह होतात. वधूमूल्य देऊन विवाह होतो. वधूमूल्यांच्या बदल्यात भावी जावई वधुघरी शेतावर काम करतो. आते-मामे-भावंडात विवाह होतात. मेहुणीशी लग्न करणे हि समाजमान्य प्रथा आहे. म–ठाकुरांचे विवाह ब्राह्मण लावतो, तर क–ठाकुरांत स्त्री-पुजारी विवाह समारंभ उरकते. विधवाविवाह समाजसंमत आहे पण देवर विवाह निषिद्ध आहे. घटस्फोटास मान्यता आहे पण काडीमोड देणाऱ्या नवऱ्याकडून पंचायत दंड वसूल करते.

ठाकूरांमधील कुळी बहिर्विवाही असतात. कुळींची नावे आडनावे म्हणून धारण केली जातात : जसे आवळी, घुगरे, वाघ, धुमाळ, गवते, वयाळ इत्यादी.

वृद्ध ठाकूर

ठाकूरांच्या वस्तीला ठाकूरवाडी म्हणतात. ठाकूरांची झोपडी लहान असते. त्यातल्याच एका भागात ते गुरे-ढोरे बांधतात. मोठ्या घरांसमोर मांडव असतो, घराचे छप्पर गवताचे किंवा कौलांचे असते. भिंती कुडाच्या असतात. घरे स्वच्छ असतात. स्वयंपाकघर झोपडीच्या एका कोपऱ्यात असते. कधीकधी आडभिंत घालून स्वयंपाकघर वेगळे करण्यात येते. प्रत्येक घरात भात सडण्यासाठी किमान एक उखळ असते. त्यांचे घरबांधणीचे एक विशिष्ट तंत्र आहे.

लंगोटी व बंडी असा पुरुषांचा पेहेराव असतो, तर स्त्रिया गुढग्यापर्यंत लुगडे नेसतात व पोलके वापरतात. अलीकडे पुरुष गावाबाहेर जाताना धोतर किंवा पायजमा घालतात. स्त्रिया हातावर व कपाळावर गोंदवून घेतात. बहुसंख्य ठाकूर मराठी भाषा बोलतात.

ठाकूर हे जडप्राणवादी आहेत. ते भवानी, शंकर, पार्वती, कान्होबा, खंडेराव, वाघ्या, हिरवा, मुंजा, वेताळ, वीर इ. देवतांना भजतात. चेद्या, वाघ्या, हिरवा हे देव जंगलात वास करतात. हिरवा मोराच्या पिसांशी बांधलेला असतो. याशिवाय भूताखेतांनाही ते पूजतात. भूतबाधा झाली असता भगताकडून उपचार करून घेतात. प्रत्येक गावात भगत असतात व ते औषधोपचार करतात. क–ठाकूरांत देव-दिवाळी उत्साहाने साजरी करतात. होळी, गोकुळाष्टमी व वाघबारस या सणांत म–ठाकूर नृत्य करतात. त्या वेळी प्रत्येक ठाकूर आपले घर झेंडूच्या फुलांनी सजवतो. रात्री नृत्य करण्यात येते. यांची वाद्ये ते स्वतःच तयार करतात. तारफा हे त्यांचे प्रमुख वाद्य.

ठाकूरांमध्ये मयताचे दफन अथवा दहन करतात. म–ठाकूर प्रेते पुरतात. तर क–ठाकूर मृतांच्या किंवा त्यांच्या आप्तांच्या इच्छेनुसार क्वचित प्रेते जाळतात. पावसाळ्यात केवळ दफनच करतात. सुखवस्तू कुटुंबात दहनविधी करतात. बहुतेक सर्व अंत्यविधी हिंदूप्रमाणेच करतात. क–ठाकुरांत मयताच्या दफनाच्या जागेत एक दगड पुरतात. त्यावर स्त्री व पुरुष याची आकृती काढतात. त्यास वीरगळ म्हणतात.

ठाकूर हिंदूंचे आचार-विचार बऱ्याच प्रमाणात अनुसरतात. त्यामुळेच डॉ. घुर्ये हे आदिवासींना मागासलेले हिंदूच म्हणतात. 

संदर्भ : Chapekar, L. N. The Thakurs of the Sahyadri, London, 1960.

मुटाटकर, रामचंद्र