एल्विन, व्हेरिअर : (२९ ऑगस्ट १९०२ — २२ फेब्रुवारी १९६४). एक प्रसिद्ध इंग्रज मानवशास्त्रज्ञ. एका मध्यमवर्गीय पाद्री कुटुंबात डोव्हर (केंट) येथे जन्मला. व्हेरिअर सात वर्षांचा असताना त्याचे वडील एडमंड निवर्तले आणि त्याच्या सर्व संगोपनाची जबाबदारी आईवर पडली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पहिल्या वर्गात पदवी घेतल्यानंतर त्यास काही दिवस अधिछात्रवृत्ती मिळाली. पण पुढे तो लवकरच पाद्री झाला आणि १९२७ साली पुण्यास ख्रिस्तसेवासंघात मिशनरी म्हणून दाखल झाला. १९२८ मध्ये त्याचा म. गांधींशी परिचय झाला आणि त्याच्यात आमूलाग्र बदल झाला. त्याने काँग्रेसतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. एकदा तर त्याचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. परिणामत: राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर ब्रिटिश सरकारने फादर व्हेरिअरला भारतात राहण्यास अनुमती दिली. त्यामुळे महात्मा गांधी व जमनालाल बजाज ह्यांच्या सल्ल्यावरून त्याने १९३२ पासून भारतीय आदिवासी जमातींचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. १९३६ मध्ये त्याने पाद्रीपदाचा राजीनामा देऊन भारतीय नागरिकत्व स्वीकारले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यास आदिवासीविषयक मध्यवर्ती सरकारच्या अनेक समित्यांवर सल्लागार म्हणून घेण्यात आले. १९५४ मध्ये आसामच्या राज्यपालांचा आदिवासीविषयक सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती झाली व अखेरपर्यंत तो त्या पदावर होता.

व्हेरिअर एल्विन

त्याने उर्वरित आयुष्य विविध जमातींच्या चालीरीती, रिवाज, तसेच त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये ह्यांचे संशोधन व अभ्यास करण्यात व्यतीत केले. एवढेच नव्हे, तर गोंड जमातीतील तरुणीशी पहिला विवाह केला व तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर परधान जमातीतील तरुणीशी दुसरे लग्‍न केले. ह्यावरून तो त्यांच्या जीवनाशी किती एकरूप झाला होता, ह्याची कल्पना येते. त्याच्या अनुप्रयुक्त मानवशास्त्रातील कार्याबद्दल त्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट दिली. ह्याशिवाय त्यास अनेक पदके मिळाली. भारत सरकारने १९६१ मध्ये त्यास पद्मभूषण हा किताब देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला.

त्याची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याने विविध जमातींच्या बहुविध अंगांवर तसेच ललित साहित्यासंबंधीही लेखन केले. द मारिया अँड देअर घोटूल (१९४७), द बैगा (१९३९), द अगरिया (१९४२), बांडो हाय लँडर्स (१९५०), द ट्रायबल आर्ट ऑफ मिडल इंडिया (१९५१), द रीलिजन ऑफ ॲन इंडियन ट्राइब (१९५५), ए डेमॉक्रसी इन नेफा (१९६५) वगैरे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. द ट्रायबल वर्ल्ड ऑफ व्हेरिअर एल्विन (१९६४) ह्या मथळ्याखाली त्याने आत्मचरित्रही लिहिले. त्याच्या ‘द मारिया (मुरिया) अँड देअर घोटूल’ या पुस्तकाचे फ्रेंच व इटालियन भाषांत भाषांतर झाले आहे. त्यांत त्याने माडिया जमातीच्या लैंगिक प्रथा व कल्पना यांविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. तो वयाच्या बासष्टाव्या वर्षी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला.

मुटाटकर, रामचंद्र