बेदूइन : मध्यपूर्वेतील विशेषतः उत्तर आफ्रिका खंडातील एक भटकी जमात. बेदूइन या अरबी शब्दाचा अर्थ ‘वाळवंटात राहणारे’ असा आहे. त्यांची वस्ती विखुरलेली असून अरबस्तान, सिरिया,लिबिया,उत्तर आफ्रिका,ईजिप्त,सूदान इ. प्रदेशात ती आढळते. या प्रदेशांतील एकूण लोकसंख्येच्या एकदशांश लोक बेदूइन होते(१९७१).

 बेदूइन सेमिटिक वंशातील असून उमदे व आनंदी आहेत. पशुपालन हाच व्यवसाय मुख्यत्वे त्यांच्यात आढळतो. उंट, मेंढ्या, गुरे यांचे कळप घेऊन हे लोक भटकत असतात. मांस व दूध हा त्यांचा मुख्य आहार. कळप संभाळण्याचे काम पुरुष करतात तर स्त्रिया दूधदूभत्याचे काम करतात. यांच्या कुंटा, बग्गर, झेनगा इ. उपजमाती असून प्रत्येकाच्या भटकण्याच्या विशिष्ट कक्षा ठरलेल्या असतात. बेदूइन तंबूंमधून राहतात. त्यांचे कपडे मेंढी किंवा उंटाच्या लोकरीपासून विणलेले असतात. क्वचित काही ठिकाणी त्यांच्या राहूट्याही दिसतात. मरुद्यानाच्या आसपासची यांची घरे दगडविटांची असून ती पांढऱ्या रंगाने रंगविलेली असतात. या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून छोटे मोठे गट असतात. त्या गटाच्या मुख्याला शेख व न्यायदान करणाऱ्यास काजी म्हणतात. ही दोन्ही पदे वारसाहक्काने पित्याकडून मुलाकडे येतात. जवळच्या नात्यात, विशेषत चुलतबहिणीशी, विवाह करण्याची रूढी असल्याने बहिर्विवाहाला वावच नसतो. बहुपत्नीत्वाचे प्रमाण बरेच असून एका पुरुषाला चार बायका करता येतात. त्यामुळे वंशभेद आढळत नाही. वधूमूल्य पैसा अथवा धान्यरूपात देतात. बेदूइन हे मुस्लिम धर्माचे अनुयायी असले, तरी त्यांच्या स्थानिक रूढी व परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

 संदर्भ :

1. Max, Ernanuel, Bedouin of the Negev, Manchestor, 1967.

2.Nevins, Edward : Wright, Theon, World Without Time : Bedouln, Manula, 1969.

 कीर्तने, सुमति