हसालारू :कर्नाटक राज्यातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने चिकमंगलूर, शिमोगा आणि कानडा (उत्तर व दक्षिण) जिल्ह्यांतील डोंगराळ भागांत आढळते. लोकसंख्या २५,१०० होती (२०११). हासुल (मूल) या संज्ञेवरून त्यांचे हसालारू किंवा हसाला हे नामाभिधान झाले असल्याचे ते मानतात. ते स्वतःला अग्नी होनप्पन मतदवरू असेही म्हणवतात कारण आपला पूर्वज होनप्पा हा धनुर्धारीक्षत्रिय होता, असा त्यांचा समज आहे. ते शिकार करण्यासाठी प्रामुख्याने धनुष्य वापरतात. त्यांची भाषा तुळू आहे मात्र इतरांशी बोलताना तेकन्नड भाषेचा उपयोग करतात. मेदार जमातीतल्या लोकांना ते आपले चुलत भाऊ मानतात कारण होनप्पाचा भाऊ चन्नय्या होता. त्याची संतती म्हणजेच मेदार ऊर्फ मेडा लोक.

 

हसालारूंचे नामधारी हसाला, गोड्डा हसाला, मुगर हसाला, अप्पर हसाला, कारी मुगर हसाला, बेल्ली हसाला (बेल्लालरू), अन्तर्गलू हसाला, नाडू हसालानी, मले हसालारू, करा येलायुवा, बग्गालिना हसाला वगैरे अनेक पोटविभाग आहेत. ते मांसाहारी असून प्रामुख्याने डुकराचे मांस खातात. त्यांचे मुख्य अन्न भात आहे. त्यांच्यात बाले, दण्डिगना, गंगरा, हदलिगे, कंदाली, कोवडची, कुल्लिगे, मल्लिगे, सेत्ती, थोलना इ. बहिर्विवाही कुळी असून पूर्वी अंतर्विवाही कुळी होत्या. मुलेमुली वयात आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या सहमतीने त्यांचा विवाह होतो. आते-मामे भावंडांतील विवाहास जमातीत प्राधान्य दिले जाते. तसेच देवरविवाह होतो. विवाहविधी वधूघरी होतो. मंगळसूत्र (थाली), कुंकुमतिलक आणि जोडवी ही विवाहित स्त्रीची प्रमुख सौभाग्यलक्षणे होत. वधूमूल्य रोख रकमेत दिले जाते. लग्नानंतर मुलगी पितृगृही राहते. व्यभिचार व गैरवर्तणूक या कारणांनी घटस्फोट दिला जातो. घटस्फोटित स्त्री व पुरुष तसेच विधवा आणि विधुर पुनर्विवाह करू शकतात. त्यांच्यात बीजकुटुंबपद्धतीचे प्राबल्य असून मातेकडून वारसा हक्क दिला जातो आणि जमात आलिया संतान नियमाचे पालन करते. म्हणजे संपत्ती ही बहिणींच्या मुलांत विभागली जाते. वारसा हक्क ज्येष्ठ मुलीच्या मुलाकडे जातो तथापि अलीकडे त्यात बदल होऊ लागला आहे. जमातीतील स्त्रियांची अर्थव्यवस्थेतील भूमिका लक्षणीय असून त्या कुटुंबाच्या मिळकतीला हातभार लावतात आणि घरखर्चावर नियंत्रणही ठेवतात. त्यांच्यात गरोदर स्त्रीचे पाचव्या महिन्यात डोहाळे( बायके) साजरे करतात. बाळाच्या जन्मानंतर दहा दिवस सोयर पाळतात आणि अकराव्या दिवशी नामकरण (बारसे) विधी करतात. मुलींचा ऋतुकाल करपथवुनी नावाने संपन्न होतो.

 

हसालारू हे मुळात वेठबिगार होते पण त्यांच्यापैकी अनेकजण शेती करू लागले असून काहीजण मोलमजुरीही करतात. शिवाय शिकार व कंदमुळे गोळा करण्याचा पारंपरिक व्यवसायही त्यांच्यात आढळतो. बहुतेक हसालारू हिंदू धर्मीय असून कुक्के सुब्रमण्य आणि मंजुनाथ ही त्यांचीप्रमुख दैवते होत. त्यांचा भुताखेतांवर विश्वास आहे. जमातनायक हाचसर्व धार्मिक विधी करतो. त्याला गुरिकर किंवा बुद्धिवंत म्हणतात व हे त्यांच्या पंचायतीचे पारंपरिक पद असते. उगाडी, दसरा, दिवाळी आणि संक्रांत हे सण ते साजरे करतात. तसेच ते कल्लूर्ती, बोब्बारिया, पांजुर्ली व जातिका या चित्शक्तींची पूजा करतात. अश्विनी पौर्णिमेला भूमिपूजा करतात व शुक्ल प्रतिपदेला बसवण्णाची पूजा करतात.

 

मृतांना ते पुरतात किंवा दहन करतात. मृताशौच बारा दिवस पाळतात आणि नंतर पूर्वजपूजा करतात.

भागवत, दुर्गा