खासी :  मेघालय राज्यातील एक अनुसूचित जमात. हिला ‘खास’ असेही म्हणतात. बहुसंख्य खासी त्यांच्याच नावामुळे पडलेल्या खासी जिल्ह्यातील पश्चिम भागात रहातात. तुरळक प्रमाणात त्रिपुरा व नागालँडमध्येही त्यांची वस्ती आढळते. त्यांची संख्या ३,५६,२०८ (१९६१) असून त्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. खासीसंबंधीचे सर्व साहित्य एका महापुरात वाहून गेले, असा समज असल्यामुळे त्यांचा पूर्वेतिहास उपलब्ध नाही. परंतु ब्रह्मदेशातून हे लोक आसामकडे आले असावेत, असे मानतात.

खासी

हे लोक ठेंगणे पण जाडजूड असून रंगाने पिवळसर असतात. आखूड डोके, बसके पण रुंद नाक, बारीक डोळे, गालाची हाडे उंचावलेली, अशी यांच्या चेहऱ्याची ठेवण असते.

खासींचा पोषाख म्हणजे बिनबाह्यांचा कुडता, टोपी व कमरेभोवती गुंडाळलेले एक फडके स्त्रिया वरपासून खालपर्यंत एकच सैलसर अंगरखा व एक उत्तरीय खांद्यावरून गाठ मारलेले घेतात. स्त्रिया सोन्याचांदीचे दागिने वापरतात व त्यांना पोवळ्याच्या माळा फार आवडतात. सुधारलेले खासी पुरुष कोट, विजार, बूट, मोजे वापरतात.

खासींचे मुख्य अन्न भात व मासे आणि कुत्र्याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे मांस. आसपासच्या हिंदु-संस्कृती संपर्कामुळे काही खासी गोमांस खात नाहीत. दूध, लोणी व तूप हे पदार्थ आहारदृष्ट्या ते निषिद्ध मानतात. तांदूळ व ज्वारी यांपासून केलेली दारू पितात. पान-तंबाखू खाण्याचे प्रमाण खूपच आहे.

खासींचा मुख्य धंदा शेती. हमाली करण्याचे प्रमाण बरेच आहे. कारण डोंगर चढणीच्या कामात ते अत्यंत कुशल असल्यामुळे अवजड मालाची ने-आण करणे, हा त्यांचा एक धंदाच झाला आहे. चहाच्या मळ्यात मजुरीचे काम बव्हंशी बायकाच करतात, तसेच कापड विणणे, रंगविणे, वगैरे कामेही त्यांचीच आहेत.

या जमातीचे खासी, सिंतेङ् ऊर्फ प्नार, वार, भोई, आणि लिंग्नाम असे गट असून त्यांचे पुन्हा अनेक उपगट आहेत. हे उपगट अंतर्विवाही अथवा बहिर्विवाही अशा दोन्ही प्रकारचे असले, तरी अंतर्विवाहींचे प्रमाणच प्रामुख्याने दिसते. हे सर्व उपगट अनेक कुळींमध्ये विभागले आहेत. या कुळी मात्र पूर्णतः बहिर्विवाही आहेत. कुळींची नावे वृक्ष, वनस्पती, प्राणी यांवरून घेतलेली असली, तरी त्या कुळी-कुळीचिन्हवादी नाहीत. म्हणजेच कुळीला ज्या वनस्पतीचे नाव असेल, ती वनस्पती वर्ज्य मानत नाहीत. कुळींचे पूर्वज का-इआबेई-तिनराई या स्त्रिया आहेत, असे समजतात व त्यांना दैवत मानतात.


खासींमध्ये लग्न हा केवळ सामाजिक उपचार आहे असे मानले जात असले, तरीसुद्धा काही विशिष्ट धार्मिक विधी करतात. लग्नाच्या वेळी कुळींचे पूर्वज, देव-देवता वगैरेंची विधियुक्त प्रार्थना केली जाते. मातृप्रधान कुटुंबसंस्था असल्यामुळे लग्नानंतर नवऱ्याने बायकोच्या घरी राहण्यास जाण्याची प्रथा आहे. एक-दोन मुले झाल्यानंतर ती दोघे स्वतंत्र बिऱ्हाड थाटतात. सिंतेंग या उपजमातीमध्ये लग्नानंतर नवरा पत्नीच्या माहेरी राहण्यास न जाता फक्त पत्नी-संबंधापुरताच तिला भेटत राहतो. बहुपतित्व किंवा बहुपत्नीत्वाची चाल नसली, तरी लग्नबाह्य स्त्री-संबंध असल्याची अनेक उदाहरणे सापडतात इतकेच नव्हे, तर वार प्रांतामध्ये अशा अनौरस संततीला वडिलांच्या स्वकष्टार्जित संपत्तीचा वाटा वारसाहक्काने मिळू शकतो. मामेबहिणीशी लग्न होऊ शकते पण ते मामाच्या हयातीत मात्र होऊ शकत नाही. कारण मामा हा पित्यापेक्षाही अधिक निकटचा मानला जातो. ज्या मध्यस्थामार्फत लग्न झालेले असते, त्याच्या साक्षीशिवाय नवरा-बायकोला फारकत मिळू शकत नाही. फारकतीनंतर मुलांवर आईचाच हक्क राहतो.

मातृसत्ताक कुटुंबसंस्थेनुसार संपत्तीचा वारसाहक्क स्त्रियांकडेच असतो. सर्वांत धाकटी मुलगी संपत्तीची वारस ठरते. एखाद्या स्त्रीला मुली नसल्यास तिची संपत्ती तिच्या बहिणीच्या धाकट्या मुलींकडे जाते. पुरुष स्वकष्टार्जित पैशाने जमविलेल्या संपत्तीचा वारसाहक्क त्याच्या आईला असतो. पुरुषाने लग्नाअगोदर मिळविलेली संपत्ती त्याच्या आईकडे न जाता त्याच्या कुळाकडे जाते. कुटुंबात वारसाहक्क बजाविण्यासाठी कोणीच मुलगी हयात नसल्यास त्या कुटुंबातील संपत्ती राजाकडे (Siem) जाते. शक्य तो संपत्ती कुटुंबातच रहावी, म्हणून कोणत्याही विशिष्ट समारंभाशिवाय एखाद्या मुलीला घरी बोलावून तिच्याकडून कौटुंबिक धार्मिक कृत्ये करवितात व तिला सर्वात धाकटी दत्तक मुलगी अथवा बहीण मानतात. दत्तक घेण्याची ही पद्धत आजूबाजूच्या हिंदु संस्कृती संपर्कामुळे आली असावी. कारण दत्तक विधानाचा कोणताही रूढ धार्मिक विधी खासींमध्ये आढळत नाही. याउलट संपत्तीला वारस नाही, अशा कुटुंबाला खासी भाषेत याप-दुह असा शब्द आहे.

खासी लोक जडप्राणवादी आहेत. याही बाबतीत स्त्री-प्राधान्य दिसून येते. दुष्काळ, रोगराई, मृत्यू यांसारख्या आपत्तींना कारणीभूत वाटणाऱ्या ज्या अद्‌भुत शक्तींची आराधना केली जाते, त्याही प्रामुख्याने देवताच आहेत. देवीचे वण अंगा-तोंडांवर राहणे म्हणजे त्या विशिष्ट देवतेची आपल्यावर अवकृपाच झाली, असा त्यांचा समज आहे. पितरपूजा करतेवेळी फक्त मातेकडील कुळीची पूर्वज-स्त्री व तिचे भाऊ यांचेच स्मरण केले जाते. पितर असा नामनिर्देश करताना पित्याकडील पूर्वजांचा उल्लेख केला जात नाही. बळी देण्याच्या वेळी पुरोहिताचे काम स्त्रीनेच करावयाचे असते. पुरुष फक्त त्या स्त्री-पुरोहितांचे प्रतिनिधित्व करतात. व्यक्तीच्या मरणानंतर कोंबडे बळी दिले म्हणजे ते कोंबडेही व्यक्तीच्या मरणोत्तर प्रवासात सतत सोबत करतात, अशी समजूत आहे. अंडे फोडण्याचा एक विधी करतात. अंडे फोडल्यावर त्याची टरफले विशिष्ट तऱ्हेने आजूबाजूला पडण्यावरून शुभ-अशुभ, शकुन-अपशकुन यांचे संकेत अजमाविण्याची पद्धत आहे.

मृताला जाळतात व त्याच्या अस्थी दगडांच्या एका राशीखाली जतन करून ठेवतात. या राशींना क्रॉमलेक म्हणतात. मरणानंतर व्यक्तीच्या आत्म्याला निसटून जाण्यास वाव मिळू नये, या समजुतीने या राशींना जरासुद्धा फट राहू देत नाहीत. मेनहिर व डॉलमेन्झ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या स्मृतिशिला हे खासींचे वैशिष्ट्य आहे. अस्थी जतन केलेल्या क्रॉमलेकपासून जवळपास किंवा इतरत्रही या स्मृतिशिला उभारलेल्या असतात. मेनहिर हे जवळजवळ ३-४ मी. उंचीचे दगड एका रांगेत तीन, पाच, सात अशा विषम संख्येत उभे करतात. मधला दगड सर्वात उंच असून दोन्ही बाजूंचे दगड ठेंगणे असतात. डॉलमेन्झ हा दगड सपाट चौथऱ्यासारखा असून तो मेनहिरच्या रांगेतील मधल्या उंच दगडासमोर आडवा ठेवलेला असतो. हा दगड कुळीची जी स्त्री-पूर्वज, तिचे स्मृतिचिन्ह असतो, तर त्यामागचे उभे दगड मृताच्या आईकडील पुरुष बांधवांची स्मृतिचिन्हे असतात.

खासींना स्वतंत्र लिपी नाही तथापि खासी ही त्यांची भाषा असून प्रादेशिकतेनुसार प्नार, वार, लिंग्नाम, जिरांग इ. वेगवेगळ्या बोलीभाषाही आहेत.

संदर्भ : 1. Bereh, Hemlet, History and Culture of the Khasi people, Calcutta, 1969.

     2. Barkataki, S. Tribes of Assam, New Delhi, 1969.

     3. Gurdon, R. R. T. The Khasis, London, 1907.

कीर्तने, सुमति