कुकी : आसाममधील एक आदिवासी जमात. कुकी या असमी शब्दाचा अर्थ वन्य जमात असा आहे. आसामातील लुशाई व चिन या डोंगरांतील लोकांना लुशाई-कुकी  व चिन-कुकी म्हणतात. त्रिपुरा व नागालँड या प्रदेशांतही कुकींची वस्ती आढळते. जुने व नवे असे यांचे दोन गट असून त्यांची भाषा व राहणीमान भिन्न आहे. जुनी कुकी दक्षिणेकडे, तर नवे उत्तरेकडे राहतात. १९६१ च्या खानेसुमारीनुसार त्यांची लोकसंख्या २७,२८१ होती.

केवळ कुकी हे नाव जुन्या कुकींना देतात. त्यांच्या अनेक उपजाती आहेत. हे मंगोलॉइड वंशाचे असून लुशाईशी त्यांचे शारीरसादृश आहे. यांचा रंग पिवळसर, चेहरा बसकट व उंची बेताची असते. उत्तम गिर्यारोहक व लढवय्ये म्हणून त्यांची ख्याती आहे. ते स्थलांतरित पद्धतीची शेतीही करतात आणि भाताबरोबरच काही प्रमाणात कापूस पिकवून कापडही तयार करतात. अलीकडे स्थिर शेती करावी, म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

पुरुष व स्त्रिया यांचा पोशाख जवळजवळ सारखाच म्हणजे डाव्या खांद्यावरून सर्व अंगाभोवती कापड गुंडाळणे असा असतो. दोघेही डोक्यावर केस वाढवतात आणि तऱ्हेतऱ्हेच्या फण्या आणि पिना केसात खोचतात.

कुकींची खेडी दुर्गम पहाडात वसलेली असतात. त्यांना खुआं म्हणतात. सु. दोन मी. उंचीच्या चौथऱ्यावर आपले घर बांबूंनी बांधतात. त्यांच्या राजाचे घर सर्वांत मोठे असते. यांच्यामध्ये अनेक कुळी असून त्या सर्व अंतर्विवाही आहेत. परंतु शक्यतो मुलगी बाहेर देण्याकडे प्रवृत्ती आहे, कारण त्यामुळे दहेज जास्त मिळण्याचा संभव असतो. लग्नासाठी धार्मिक विधी आवश्यक नसतो.

कुकींच्या वस्तीभोवती बहुतेक वेळूंची बेटे असतात. त्यांची मासे पकडण्याची जाळी, जनावरे पकडण्याचे सापळे, विणण्याचे सामान, तंबाखूची चिलीम, कोसन नावाचे वाद्य इतकेच नव्हे, तर भाकरी करण्याचे तवेदेखील वेळूचेच असतात. हे लोक वेळूच्या नळकांड्यातच पाणी साठवितात. वेळूचे कोवळे कोंब उकडून भाताबरोबर खातात. थोडक्यात कुकींचे जीवन वेळूने व्यापलेले आहे.

हे मुख्यत्वे वन्यधर्मी लोक आहेत. त्यांचा उथेन नावाचा देव आहे. नाँगजार ही त्याची पत्नी असून माणसाला परलोकात बऱ्यावाईट कृत्याचे फळ भोगायला लागते, अशी त्यांची समजूत आहे. थिला हा त्यांचा मुलगा व हिलो ही मुलगी अनुक्रमे दुष्ट व खट्याळ दैवते आहेत, असे ते मानतात. बळी देऊन देवांना संतुष्ट करतात. त्यांच्या पुरोहितास थिंपू म्हणतात. याशिवाय जंगल, नदी, खडक, पर्वत  इत्यादींमध्ये वास्तव्य करणारे अनेक देव आहेत.

संपत्तीचा वारसाहक्क धाकट्या मुलाकडे असतो. अनाथांना गुलामगिरीने वागविण्याची पद्धत आहे. ते मृतांना पुरतात त्यांच्याबरोबर तंबाखू व त्यांची चिलीमही पुरतात. मोठ्या जाळापुढे लाकडाची शवपेटी ठेवून त्यांतील मृतदेह बरेच दिवस हळूहळू जळू देतात व नंतर हाडे मडक्यांत घालून ते मडके गावातच पुरतात.

संदर्भ: Barkataki, S. Tribes of Assam, New Delhi, 1969.

भागवत, दुर्गा