म्यूलर-लायर भ्रम : ‘ब’ पेक्षा ‘अ’ ती लांबी जास्त दिसते.

भ्रम : (इलूझन). यथार्थ स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान अथवा संवेदन न होता अयथार्थ, मिध्या, विपर्ययात्मक ज्ञान होणे म्हणजे भ्रम होय. भ्रम व  ⇨निर्वस्तुभ्रम (हॅलूसिनेशन) एकच  नव्हेत. निर्वस्तुभ्रमामध्ये बाह्य ज्ञानेंद्रियांच्या उद्दीपनाचा संबंध नसतो. रक्तातील विषारी द्रव्यांचा मेंदूवर झालेला परिणाम, विकृत मनोवस्था, उद्दीपनरहित अशी प्रदीर्घ अवस्था (सेन्सरी डिप्रायव्हेशन) इत्यादींमुळे साक्षात् त्याक्षणी त्सल्नर भ्रम : उभ्या समांतर रेषा असमांतर दिसतात.विद्यामान नसलेल्या वस्तूंचा, संवेदनसदृश अनुभव हे निर्वस्तुभ्रमाचे स्वरूप असते.या उलट, भ्रमात्मक ज्ञानास विषयाचे (ऑब्जेक्ट) अथवा उद्दीपकाचे साक्षात् आलंबन आवश्यक असते ज्ञानेंद्रियांच्या नसांचे उद्दीपन झालेले असते परंतु अर्थबोध मात्र चुकीचा होतो वस्तूच्या ठिकाणी जे गुणधर्म वस्तुतः नाहीत अशा गुणधर्मांचा बोध होतो (तदभाववति तत्प्रकारकः अनुभवः) उद्दीपक असते तसेच प्रत्ययास येण्याएवजी ते ‘अन्यथा’ भासते, दुसऱ्याचा कशाचा अवभास (परावभास) होतो. दोरी सर्प असल्यासारखी भासणे, शिंप चांदीचा तुकडा असल्यासारखी वाटणे, खांब माणसासारखा दिसणे, तापलेल्या वाळूवर पाणी असल्यासारखे दिसणे किंवा ‘शृंगारपत्ती’ ह्या शब्दाच्या जागी ‘शृंगारपत्ती’ व ‘पोषक’ ह्या शब्दाचे जागी ‘पोषाक’ दिसणे गर्द झाडीतून येणारा वाऱ्याचा आवाज बासरीचा ध्वनी भासणे पहिल्या बोटावर मधले बोट चढवून त्यांच्या अग्रांच्या चिमटीत धरलेली पेन्सिल दोन पेन्सिली म्हणून भासणे ही त्या त्या इंद्रियांच्या भ्रमात्मक ज्ञानाची उदाहरणे होत.

भ्रमाची कारणमीमांसा : भ्रमात्मक संवेदनाची मानसशास्त्रीय स्वरूपाची कारणमीमांस प्राचीन भारतीय  तत्त्वज्ञान वाङ्मयात तसेच आधुनिक मानसशास्त्रात झालेली आहे. ती एकत्रित केली, तर भ्रमज्ञानास कारणीभूत होणारे घटक तीन वर्गांत विभागात येतात : (१) ज्ञातृसंबद्ध घटक (२) इंद्रियसंबद्ध घटक व (३) बाह्या घटक. कधी-कधी यांपैकी एका वर्गांतील घटकांमुळे तर कधीकधी इतर वर्गांतील घटकांचीही जोड मिळून भ्रमज्ञान होत असते.

ज्ञातृसंबद्ध घटक म्हणजे व्यक्तीची त्या वेळची मानसिक अवस्था. भावनाग्रस्त मन, अपेक्षापूर्ण मनःस्थिती, उत्कट इच्छा, सवय इत्यादींचा परिणाम म्हणून भ्रमात्मक संवेदन होऊ शकते. उदा., भीतभीत चाललेल्या माणसास दोरीच्या जागी सर्पाचा बोध होतो व दूरवरचा खांब कोणीतरी माणूस उभा असल्यासारखा भासतो भुकेल्या व्यक्तीला दुध्या काचेच्या तावदानामागे लटकत असलेले जाड फटाके केळ्यांचा घड असल्यासारखे दिसतात मृत्युशय्येवरील प्रिय व्यक्तीच्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडण्याची अपेक्षा करीत असणाऱ्यास तिचे निश्चल ओठ हलल्यागत दिसतात ‘आता विद्युत्प्रावाहाने ही तार तापेल’ अशा सूचनेचा (सजेशन) प्रभाव म्हणून तार गरम वाटू लागते शुद्ध लिहिलेला शब्द सवयीचा झालेला असल्याकारणाने तो अशुद्ध छापला गेला असताही पुष्कळदा शुद्धच वाचला जातो.

हेरिंग भ्रम : आडव्या समांतर रेषा फुगीर दिसतातइंद्रियसंबद्ध घटकांमध्ये इंद्रियांना झालेली इजा, इंद्रियांची सदोषता, इंद्रियांची विशिष्ट रचना इत्यादींचा समावेश होतो. उदा.,  भाजलेल्या बोटास वस्तूचा स्पर्श निराळ्या स्वरूपाचा जाणवतो सॅन्टोनिन घेतल्यामुळे वस्तू पिवळ्या दिसू लागतात जिभेला दातांमधील बारीकशी फट खूपच मोठी भासते.

बाह्य अथवा विषयसंबद्ध घटकांच्या सदरात अपुरा प्रकाश, अन्य वस्तूचे सामीप्य, अतिदूरत्व यांसारखे संवेदनास अननुकूल घटक प्रतिबंधक घटक इंद्रियोद्दीपक वस्तू य अन्य वस्तू यांच्यातील सादृश्य उद्दीपकाचा संदर्भ (काँटेक्स्ट) इत्यादींचा समावेश होतो. उदा., भीतीमुळे दोरीऐवजी सर्प दिसतो तसा अपुऱ्या प्रकाशामुळेही दिसतोच, दोरी नागमोडी पडली  असली तरीही दिसतो स्फटिकासमीप असलेल्या रक्तपुष्पामुळे स्फटिक रक्तवर्ण दिसतो स्वतःपासून खूप दूर असलेला पर्वत काळसर दिसतो पाण्यात बुडवलेली काठी वाकलेली दिसते घायपाताचे पान साप वाटते उंच माणसाच्या मध्ये उभी असलेली जराशी कमी उंच व्यक्तीही खुजी दिसते उभ्या रंगीत पट्ट्यापट्ट्यांच्या कपड्यात बुटकी माणसे उंच दिसतात वा काळ्या पोषाखात स्थूल व्यक्ती कमी स्थूल दिसतात आपल्या भोवतालच्या वहात्या पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम म्हणून किंवा आपल्या स्थिर गाडी शेजारून दुसरी गाडी उलट दिशेने जात असेल तर आपणच उलट दिशेने सरकत असल्यासारखे वाटते. ह्यांवरून संदर्भाचा भ्रमोत्पादक प्रभाव लक्षात येतो. संदर्भमूलक दृक्-भ्रमांची उदाहरणे म्हणून वरील तीन आकृत्यांत दाखवलेले रेषाभ्रम प्रसिद्ध आहेत.

भ्रमाचा निरास : एका इंद्रियाद्वारे झालेले संवेदन दुसऱ्या एखाद्या इंद्रियाद्वारे आलेल्या विरोधी अनुभवाने बाधित झाले, की पहिला अनुभव भ्रमात्मक असल्याचे लक्षात येते उदा., पाण्यात अर्धा भाग बुडवलेल्या काठीवरून हात फिरवला, की ती पाण्यात वाकडी दिसली हा भ्रम होता हे कळते. रुपे म्हणून उचललेली शिंप हलकी लागते व भ्रमाचे निरसन होते. संवेदनावर विसंबून केलेल्या व्यवहाराने वा कृतीने फलप्राप्तीऐवजी अपेक्षाभंग झाला म्हणजे देखील त्या संवेदनाचे भ्रमात्मकत्व ध्यानी येते.

भ्रमाचे तात्त्विक विवेचन : भारतीय ज्ञनमीमांसेमध्ये भ्रमाचे वा मिथ्या ज्ञानाचे तात्त्विक विवेचन करण्यात आलेले आहे. भ्रमज्ञानाच्या ‘विषया’ च्या अस्तित्वासंबंधीचा प्रश्न उपस्थित करून ते विवेचन केलेले आहे. त्यास ‘ख्यातिवाद’ ही संज्ञा आहे. नैय्यायिकांचा ‘अन्यथाख्यातिवाद’, सांख्य-योगाचा मूळचा ‘अख्यातिवाद’, प्रभाकर मीमांसकांचा ‘विवेक-अख्यातिवाद’, कुमारिल भट्टांचा ‘विपरीत-ख्यातिवाद’ व रामानुजांचा ‘सख्यातिवाद’ या सर्वांमध्ये भ्रमज्ञानाचा विषय सत् (अस्तित्वात) असतो असे मानलेले आहे. शंकराचार्यांच्या मते मात्र, जे अस्तित्वात असते त्याचेचे ज्ञान संभवते म्हणून भ्रमज्ञानाचा विदही ‘सत्’ मानावा लागतो पण भ्रमनिरासानंतर तो बाधित होतो ह्या कारणास्तव तो ‘असत्’ मानणे प्राप्त होते, अशी अडचण निर्माण होते म्हणून भ्रमज्ञानाचा विषय ‘अनिर्वचनीय’ होय (अनिर्वचनीयख्याति).

पहा : ख्यातिवाद.

संदर्भ : 1. Dutta, Dhirendra Mohan, The Six Ways of Knowing Calcutta, 1960.

            2. Hilgard, E. R. Introduction to Psychology, New York, 1967.

            3. Luckiesh, Matthew, Visual Illusions, New York, 1965.

अकोलकर, व.वि.