बाख्तिआरी : इराणमधील एक भटक्या जमातींचा संघ. त्याची लोकसंख्या ४॰॰॰॰॰ (१९७॰) होती. ते मुख्यत्वे नैऋत्य इराणच्या बाख्तिआरी प्रांताच्या डोंगराळ भागात राहतात. ते पशुपाल असून आपले मेंढ्यांचे कळप घेऊन पूर्वेस इस्फाहान शहर व पश्चिमेस खूझिस्तान या दरम्यान पसरलेल्या प्रदेशात भटकत असतात. त्यांची दोन घराणी असून एक ‘हाफ्तलंग’ (म्हणजे सात भावांचे) व दुसरे ‘चारलंग’ (म्हणजे चार भावांचे) या नावाने ओळखले जाते. पूर्वी त्यांना मोठे लूर व धाकटे लूर म्हणत. कारण ते लुरिस्तानात राहत असत. लूर हे मूळचे सिरियातील होत.

बाख्तिआरी लोक काळे, उंच, धिप्पाड असून कुडता, विजार व कोळी टोपी हा त्यांचा पारंपरिक पेहराव होय. स्त्रियांना बुरखा नसतो. जामतील बहुपत्नीत्व रूढ आहे. पूर्वी काळ्या कापडाच्या तंबूमध्ये त्यांची तात्पुरती वस्ती असे. विसाव्या शतकात ते स्थायिक झाले असून ते दूधदुभत्याचा धंदा करतात. खेचरांची पैदास हा त्यांचा मुख्य धंदा असून घोडी-गाढवांना ओझ्यासाठी न वापरता ते त्यांची उत्तम निगा राखतात. हे लोक उत्तम घोडेस्वार असून लढवय्ये म्हणून त्यांची ख्याती आहे. आधुनिक काळात अनेक बाख्तिआरी लोक लष्करात भरती झाले आहेत. इराणी लष्करातील ‘बाख्तिआरी रेजिमेंट’ प्रसिद्ध आहे. ‘बाख्तिआरी’ मूळचे शियापंथी मुसलमान असूनही कुराण ग्रंथ मानत नाहीत. पीर व नातेवाईकांची थडगी हीच यांची यात्रास्थाने. थडग्यावर शौर्याचे प्रतीक म्हणून ‘सिंहाकृती’ कोरलेली असते. इराणमधील फार्सी भाषेची एक उपभाषा ते बोलतात. विसाव्या शतकात त्यांच्यात खूप सुधारणा झाल्या असून त्यांच्यातील काही श्रीमंत लोक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी यूरोपला धाडतात.

संदर्भ :Arasteh, Reza Arasteh, J.D. Man and Society in Iran, Leiden 1964.

भागवत, दुर्गा