खाम्पटी : अरुणाचल प्रदेशात पूर्वेकडे आढळणारी एक अनुसूचित जमात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हे लोक इरावती नदीच्या खोऱ्यातून येथे आले. १९६१ च्या जनगणनेत त्यांची संख्या २,६०० होती. आपण सुवर्णभूमीहून आलो असे ते समजतात. त्यांचे मूळ वसतिस्थान बार खाम्पटी त्याचा अर्थ सुवर्ण प्रदेश असा होतो. आसामातील आहोम जमातीच्या शाखेपैकीच खाम्पटी ही एक शाखा असून त्यांची भाषा थाई भाषेच्या गटातील आहे.

खाम्पटी लोक मंगोलियन लोकांप्रमाणेच पण वर्णाने काळे होते, परंतु आता त्यांतही गोरे लोक आढळतात. पुरूष डोक्यावर मध्यभागी केसांचा अंबाडा घालतात आणि जाकीट घालून करमेला दाओ नावाचे हत्यार ठेवतात. हे उत्तम लढवय्ये आहेत. स्त्रिया डोक्यावर मध्यभागी जवळजवळ १०–१२ सेंमी. उंचीचा केसांचा मोठा झुपका बांधतात आणि छातीवरून पायापर्यंत एक वस्त्र गुंडाळतात व अंगात बाह्यांचे जाकीट घालतात.

खाम्पटी लोकांत पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून वडिलार्जित संपत्तीचा वाटा सर्व मुलांना समप्रमाणात मिळतो. एकपत्नीत्व असूनही दोन बायका केल्याची उदाहरणे बरीच सापडतात पण सामाजिक, कौटुंबिक कार्यात थोरलीचेच महत्त्व अधिक मानले जाते. त्यांच्यात एकत्र कुटुंबपद्धतीचे प्रमाण जास्त दिसते.

हे लोक बौद्ध धर्माचे असून गौतमाचा जन्मदिन व महानिर्वाणदिन हे दोन दिवस साजरे करतात. धर्मोपदेशक वंशपरंपरागत नसून धर्माची दीक्षा घेणाऱ्या कोणालाही धर्मोपदेशक होता येते.

पूर्व भारतातील इतर जमातींपेक्षा विद्या आणि कला या दृष्टींनी ही जमात अधिक प्रगत आहे. लोखंड, पितळ, हस्तिदंत, लाकूड यांवरील उत्कृष्ट कलाकुसरीबद्दल त्यांची ख्याती आहे. जमिनीपासून उंचीवर बांधलेली त्यांची लाकडी घरे कौशल्यपूर्ण बांधणीची असतात. यांचा मुख्य व्यवसाय भातशेती आहे. त्यामुळे भात भरडण्याच्या चक्क्या अनेक लोक चालवितात.

संदर्भ :  Sen, B. The Khamptis: An Outline of Their Culture, Man in India, Vol. 45, No.3, 1965, Patna, 1965.

किर्तने, सुमति