मेच : भारतातील एक अनुसूचित जमात. त्यांची वसती मुख्यत्वे पश्चिम बंगाल व आसाम या राज्यांत आढळते. बंगाल राज्यात त्यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार १०,८६२ होती. ही जमात काचारी जमातीशी इतकी मिळतीजुळती आहे, की तिला स्वतंत्र जमात म्हणावे की नाही, हाच मानवशास्त्रज्ञांमुळे प्रश्न पडतो. मेच लोकांची वसती आसामात गोपालपुरा जिल्ह्यात व बंगालमधल्या जलपैगुरी जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळते. या भागात बखत्यार खल्‌जीचे आक्रमण होईपर्यंत मेच लोक तिथल्या समाजातील एक प्रमुख घटक समजले जात असत. मेच व कोच या दोन जमाती कोच राजांच्या कारकीर्दीत परस्परांशी संबंधित होत्या कारण कोच राजाच्या वंशपरंपरेत मेघांचाही संबंध आलेला होता. काही भागातले मेच स्वतःला काचारी म्हणून घेतात. गारो पर्वतात मेचांचे ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडचे असे दोन भाग झालेले आहेत. या दोन पोटजातींत सांस्कृतिक एकता आढळते. दोन्हीही तऱ्हेचे मेच गारो आणि राभा यांच्याकडून अन्न घेत नाहीत.

बदलती शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. आज ते स्थायिक शेती करतात. विणकाम व मासेमारी हे त्यांचे उपव्यवसाय होत. ‘बाथो’ हे त्यांचे प्रमुख दैवत. महाकाल, माइनो, टीशबुरी ह्यादेखील त्यांच्या देवता आहेत. मेच हीच त्यांची बोलीभाषा आहे.

संदर्भ : 1. Das, Amal Kumar and Others, Handbook on Scheduled Castes &amp Scheduled Tribers of West Bengal, Calcutta, 1966.

 

              2. Ray, U. K. &amp Others, Planning for Scheduled Castes &amp Scheduled Tribes – A West Bengal Perspective, 1982.

भागवत, दुर्गा