सोलीगाडू : कर्नाटक राज्यातील एक आदिम जमात. तिचा उल्लेख सोलीगा किंवा शोलगा असाही करतात. कर्नाटकात गौडा (जमात प्रमुख) असा स्वत:चा ते उल्लेख करतात. ही जमात मुख्यत्वे चामराजनगर जिल्ह्याच्या येलांडूर आणि कोल्लेगल तालुक्यांतील विरळ लोकसंख्येच्या ठिकाणी आणि अती पर्जन्यमय प्रदेशात केंद्रित झाली आहे. यांशिवाय ते तमिळनाडू राज्याच्या एरोडा, निलगिरी, पेरियार, कोईमतूर, सालेम आणि धरमपुरी जिल्ह्यांतही तुरळक प्रमाणात आढळतात. त्यांची लोकसंख्या सु. २०,००० होती (अंदाजे -१९९१).

सोलीगाडू जमातीची मूळ उत्पत्ती मलेया महादेश्वर स्वामीचा पुत्र कारय्यापासून झाली असावी, असे काही विद्वान म्हणतात. मध्यम उंची, लांब व अरुंद डोके, लंबगोल चेहरा आणि पसरट (रुंद) नाक ही त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये होत. ते मांसाहारी असून कंदमुळेही खातात. स्वयंपाकात सोयाबीन, भुईमूग आणि नायजर बियांचे तेल वापरतात. ते दूध, कॉफी, चहा ही पेये घेतात तर बिडी ओढणे आणि जंगली अंबाडी व ताग या तंतूमय पदार्थांचे सेवन करतात. तसेच ते पानविडा खातात.

सोलीगाडूमधील उराली, कडू, माले, उरबाथी किंवा दसय्या वा बुरूडे आणि पुजारी या पाच विभागांतील माले व उराली गटांची लोकसंख्या जास्त आहे. ते आपापसांत कानडीच्या बोली भाषेत बोलतात मात्र उराली सोलीगा समूहातील लोक परस्परांत सोलीगा बोलीत संभाषण करतात.

सोलीगाडू जमात चलकिरी, सुरारू, बेल्ली, तेनेरू आणि हालेरू या कुळींत विभागली असून त्यांच्यातील समूह पातळीवर आंतरविवाह संपन्न होतात मात्र कुळीत बहिर्विवाही पद्धत प्रचलित आहे. आतेमामे नाते-संबंधातील विवाहास प्राधान्य दिले जाते. उभयंतांच्या संमतीने विवाह जुळून वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने होतात. जमातीत वधूमूल्याची प्रथा असून ते रोख रकमेत दिले जाते. मंगळसूत्र आणि जोडवी हे सौभाग्यालंकार असून विवाहित स्त्रीची ती सौभाग्य लक्षणे होत. जमातीत घटस्फोटास संमती असून व्यभिचार व पतिपत्नीमधील संघर्ष या कारणांस्तव घटस्फोट दिला जातो. दोघांना पुनर्विवाह करता येतो. मृत पत्नीच्या लहान बहिणीशी विवाह करण्याची प्रथा रूढ आहे. संपत्तीत वारसा हक्क सर्व मुलांना सारखा प्राप्त होतो मात्र ज्येष्ठ मुलाकडे वडिलोपार्जित प्राधिकार जातात. जमातीतील स्त्रिया घरगुती कामाबरोबरच जळण व कंदमुळे गोळा करतात. शिवाय जमातीच्या सामाजिक-धार्मिक समारंभात सहभागी होतात. मुलींची ऋतुप्राप्ती आणि नवजात बालकाचे बारसे (नामकरण) ह्या दोन विधींना जमातीत विशेष महत्त्व आहे. मृताचे दफन करतात आणि दरवर्षी पितरांची पूजा करतात. सोलीगांचे उराली, इरुला आणि कुरुंबा जमातींशी सहभोजी संबंध आहेत.

त्यांच्यातील बहुसंख्य सोलीगा हे हिंदू धर्मीय असून अगदी तुरळक इस्लाम व ख्रिस्ती धर्मीय आहेत. त्यांच्या कारय्या, क्यातेदेवरू, जडेस्वामी, महादेश्वर व रंगास्वामी ह्या मुख्य देवता असून ते बसवेश्वर, नंजुंदेश्वर ह्या देवतांचीही उपासना करतात. महादेश्वर ही त्यांची प्रादेशिक देवता आहे. रोट्टी हब्बा व देवरा हब्बा हे त्यांचे पारंपरिक उत्सव होत.

सोलीगाडूंचा पारंपरिक व्यवसाय स्थलांतरित शेती आणि जंगलातील कंदमुळे, मध गोळा करणे हा होता. मात्र आता स्वतःच्या जमिनी ते कसतात व जंगलातही काम करतात. शेतीतील उत्पन्न आणि जंगलातील गैर इमारती लाकूड, बांबू, मध, नेल्लीकाई (एक काटेरी फळ-गुझबरी फळ), पासी (दगडफूल) इ. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. ते बांबूपासून टोपल्या, सुशोभित चटया इ. वस्तू बनवितात. त्यांच्या हस्तकलात्मक पारंपरिक व्यवसायाला जास्त वाव व मोबदला मिळावा या हेतूने सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन त्यांना मूळ ठिकाणापासून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते ज्या दुर्गम जंगली भागात राहतात ते सर्व क्षेत्र वन्य जीव संरक्षण क्षेत्रांतर्गत येते त्यामुळे त्यांना सरकारकडून घरे व जमिनी देऊन जंगलातून नागरी भागात आणले जात आहे. त्यांची पूर्वीची पारंपरिक परिषद (कुल पंचायत) प्रभावी राहिली नसून आता खेडे आणि तालुका पातळींवर संघटना स्थापन केली जात आहे. अलीकडे या जमातीतील काहीजण सरकारी नोकरीत आढळतात.

सोलीगाडू जमातीच्या परिसरात मुलामुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी निवासी शाळा आहेत. या लोकांचा औपचारिक शिक्षणाबद्दलचा प्रतिसाद सर्वसाधारण अनुकूल आहे परंतु काही मुलेमुली सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षणापासून वंचित राहतात तथापि तमिळनाडूतील सोलीगांमध्ये साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक आहे.

गेडाम, संतोष