आरावाक : दक्षिण अमेरिकेतील एक अमेरिकन इंडियन जमात. ॲमेझॉन नदीचे  खोरे, ओरिनोको, व्हेनेझुएला, पूर्व कोलंबिया वगैरे विस्तृत भागांत ही जमात विखुरलेली असल्याने, त्यांच्यात सांस्कृतिक किंवा वांशिक एकात्मता आढळत नाही. काहीशा फरकाने बोलली जाणारी आरावाकी भाषा हीच एक त्यांच्या एकत्वाची खूण होय.

आरावाक हे कोलंबसला भेटलेले पहिले अमेरिकन इंडियन होत. त्यांच्या लुकामो, टॅनो व इगनेरी ह्या तीन उपजमाती प्रमुख समजल्या जातात. कोलंबसने टॅनो धर्माचा अभ्यास केला. टॅनो लोक ‘झेमिस’ नावाच्या देवतेची आराधना करीत. ह्या देवतेची मूर्ती दगड, लाकूड व धातूंमध्ये कोरीत. डोमिनिकन प्रजासत्ताक व प्वेर्त रीको येथे आजही तिचे अवशेष सापडतात. गुलाम, सामान्य लोक, सरदार व राजे असे चार वर्ग त्यांच्या समाजात होते. राजपदाचा वारसा मातृसत्ताक पद्धतीने ठरविण्यात येई. राजे लोकांचे मोठ्या प्रदेशांवर आधिपत्य असून जमातबंधूंकडून त्यांना मान मिळे. उत्सवाच्या वेळी हे लोक शरीरावर झेमिस देवतेची चित्रे काढीत. स्त्रीपुरुषांना अलंकारांची आवड असे. हे लोक शांतताप्रिय होते. स्पॅनिश व कॅरिब लोकांच्या हल्ल्यांपासून त्यांना स्वतःचे संरक्षण करता आले नाही. कॅम्पा, ग्वाईता, ग्वाना, मोजो, तायनो, तुकूना इ. जमाती आरावाकी भाषा बोलतात.

मुटाटकर, रामचंद्र