कुरेलू : न्यू गिनीच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या हिमपर्वतातल्या बालिएम नदीच्या खोऱ्यातली एक जमात. अनेक पठारी पॉलिनीशियन जमातींपैकी ती एक आहे. तिचे चार पोटविभाग म्हणजे (१) लोरोमाबेल (उत्तर), (२) कोसी-आलुआ (पश्चिम), (३) हैमन-हल्लुक (कोसी आलुआ आणि डोंगर यांच्यामधले) व (४) विलिहिमन-वालावुआ (दक्षिण). या चार विभागांच्या सीमारेषा एकमेकींत मिसळलेल्या आहेत. दक्षिणेकडच्या कुरेलूंना परकीय संस्कृतीच्या संपर्क झालेला नाही. हार्व्हर्ड पीबॉडी मोहिमेद्वारे त्यांचे १९६१ मध्ये संशोधन झाले. त्यात अश्मयुगीन संस्कृतीचे काही अवशेष उपलब्ध झाले.

लढाई आणि शेती हे यांचे मुख्य व्यवसाय. पाच मी. उंचीचे भाले व तीरकमठे ही त्यांची आयुधे असून लढाईत जास्त माणसे मारणाऱ्यास बहुमान मिळतो. लढाईच्या वेळी ते गळ्यात शंख-शिंपल्यांच्या माळा, पिसांचे मुगुट व नाकात वाघनखीच्या आकाराची हाडे घालतात आणि डुकराची चरबी अंगाला चोळतात. टेहळणीसाठी ७-८ मी. उंचीचा मनोरा करतात. हा मनोरा बांधताना पुरुषांना विशिष्ट नियम पाळावे लागतात.

शेताच्या खुरपणीसाठी दोन्ही बाजूंनी टोके असलेल्या ३-४ मी. लांबीच्या काठ्या वापरतात. मुख्य पीक रताळे शिवाय तंबाखू, ऊस, भोपळा, आले व केळीसुद्धा लावतात. बालिएम खोऱ्यातील खाऱ्या पाण्याच्या झऱ्यांतून मीठ काढण्याचे काम फक्त स्त्रिया करतात.

पुरुष वस्त्र वापरत नाहीत, पण स्त्रिया झाडांच्या साली एकीला एक जोडून कमरेभोवती गुंडाळतात आणि डोक्यावरून पाठीच्या बाजूने गुडघ्यापर्यंत लोंबणारी अनेक कप्प्यांची जाळी घेतात. यांत वरच्या कप्प्यात कंदमुळे व इतर सामान आणि खालच्या कप्प्यात तान्ही मुले ठेवतात.

कुरेलूंमध्ये अनेक कुळ्या असून त्या विटा व वाइआ या शाखांमध्ये विभागल्या आहेत. कुळीच्या प्रमुखाला कइन वा केन म्हणतात. नोपू नावाचा यांचा मूळ पुरुष असून पूर्वी आकाश व जमीन (कुरेलू वस्ती) यांच्यामध्ये दोर होता, पण आकाशातील लोक जमिनीवरील बायका व डुकरे चोरायला लागले म्हणून दोर कापून टाकला, अशी त्यांची समजूत आहे.

त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे. कइन हा समारंभपिता म्हणजे प्रमुख समजण्यात येतो. मुलामुलींची लग्‍ने वयात आल्यावर करतात. ती वडील-माणसांनीच ठरविलेली असतात. बहुपत्‍नीत्व असून प्रत्येक बायको वेगळ्या झोपडीत–एबाईत–राहते. प्रत्येक वस्तीला सिली म्हणतात. तीतील सर्व पुरुष एका समाईक झोपडीत–पिलाईत–राहतात. प्रत्येक सिलीमध्ये अनेक एबाई, एक पिलाई, एकच समाईक स्वयंपाकघर व डुकरांसाठी ३-४ झोपड्या असतात.

लग्‍नप्रसंगी देणगी म्हणून किंवा कर्जफेडीसाठी डुकरे देण्याची प्रथा आहे. शिंपल्यांना मिकाक म्हणत असून चलनी नाणे म्हणून ती वापरतात. काही विशिष्ट दगडांना दैवी शक्ती आहे, असे ते मानतात. औषधोपचार करणाऱ्याला विसाकुन म्हणतात. दैवी शक्ती असलेल्या दगडासंबंधाने केला जाणारा विधी दर वर्ष-दोन वर्षांनी विसाकुनच्या देखरेखीखाली केला जातो.

फक्त तरुण पुरुषांना मरणानंतर समारंभपूर्वक कवड्यांच्या माळा घाळून खुर्चीत बसवून मिरवितात आणि इकिपालीन नावाचा विधी करतात. यात मेलेल्या व्यक्तीच्या नात्यातील कुणाही लहान मुलीच्या हाताची बोटे तोडायची व मुलाचे कान कापायचे असतात. डुकराच्या मांसाची मेजवानी करून नंतर मृताला जाळण्यात येते. लहान मुले, बायका किंवा म्हातारी माणसे मेल्यानंतर कोणताच समारंभ करीत नाहीत.

संदर्भ : Matthiessen, Peter, Under the Mountain Wall : A Chronicle of Two Seasons in the Stone Age, New York, 1962. 

भागवत, दुर्गा