तिंग्वियन : फिलिपीन्सच्या लूझॉन प्रांतातील वायव्य भागात राहणारी एक जमात. १९६० मध्ये यांची संख्या सु. ३३,००० होती. तिंग्वियन लोकांना मलायातील मूळ संस्कृतीचे प्रतिनिधी समजण्यात येते. त्यांच्यावर हिंदू, इस्लाम आणि ख्रिस्ती यांपैकी कोणत्याही धर्माचा अथवा संस्कृतीचा प्रभाव आढळत नाही. ते डोंगरमाथ्यांवर किंवा लहान नदीखोऱ्यांत राहतात. भात हे त्यांचे मुख्य पीक. प्रत्येक गावास एक मुखिया असतो. वयोवृद्ध माणसांची एक पंचायत असते. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व समारंभात स्त्रिया पुढाकार घेतात. लोकगीतांच्या द्वारे त्यांनी आपल्या जुन्या चालीरीती व परंपरा यांचे जतन केले असून नव्या पिढीस या संस्कृतीची शिकवण देण्यात येते. पूर्वी हे लोक नरहत्या करीत असत.

संदर्भ : Keesing, F. M. The Ethno–History of Northern Luzon, Stanford, 1962.

मुटाटकर, रामचंद्र