माल पहाडिया : भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, जलपैगुडी, पुरूलिया, माल्डा, दिनाजपूर आणि मिदनापूर तसेच बिहारमधील दाल्मा, रांची, सिंगभूम या जिल्ह्यांत व संथाळ परगण्यांत आढळते. त्यांची सद्री ही बोली भाषा द्राविडी भाषा कुटुंबातील असून तिच्यात बंगाली शब्दांचे मिश्रण आढळते. १९७१ च्या जनगणनेनुसार या दोन राज्यांत त्यांची लोकसंख्या ७९, ६५४ होती. त्यांच्या उत्पत्तीविषयी एक मनोरंजन कथा रूढ आहे. सीतेचा शोध घेतल्यानंतर थकलेल्या रामाला घाम आला. त्या घामाबरोबर त्याच्या अंगातून जो मल बाहेर पडला त्यापासून उत्पन्न झालेल्या सोबती दंपतीपासून ही जमात जन्माला आली. मलापासून उत्पन्न झाल्यामुळे व पहाडी प्रदेशात वास्तव्य केल्यामुळे त्यांना मलपहाडी म्हणतात. रिश्ले यांच्या मते या लोकांत दोन प्रमुख पोटजाती आहेत : माल पहाडिया व कुमार ऊर्फ कुमारभाग. याशिवाय देहेरी, पुझार, लेया, गृही, सिंध मांझी, अहीरी किंवा धनुकी, पातोर इ. गोत्र (खुंट) आढळतात. त्यांतही श्रेष्ठ-कनिष्ठ भेद आहेत.

पूर्वी हे लोक पहाडी प्रदेशात झूम पद्धतीची शेती करीत व जंगलातून कंदमुळे गोळा करून त्यावर चरितार्थ चालवीत असत परंतु अलीकडे यातील बहुतेक लोक चहाच्या मळ्यात किंवा अन्य उद्योग धंद्यातून मोलमजुरी करतात. हे लोक मांसाहारी असून गायीचे मांस निषिद्ध मानतात. ते बाजरीपासून केलेली दारू पितात. काही जण शेती, कुक्कुटपालन व शिकार हे जोडव्यवसायही करतात. भात, ताग व भाजीपाला ही यांची प्रमुख पिके होत. या लोकांची वस्ती प्रामुख्याने जमिनीपासून थोड्या उंचीवर बांधलेल्या झोपड्यांतून आढळते. घराच्या भिंती कुडाच्या असून त्यांवर आतील बाजूस चित्रे काढतात. झोपडीवर गवताचे उतरचे छप्पर असते. गुरांसाठी अंगणाच्या एक बाजूला स्वतंत्र गोठा असतो.

आधुनिकीकरणामुळे माल पहाडी पुरूषाचा वेश सदरा व धोतर असून स्त्रिया साडी नेसतात व चोळी घालतात. स्त्रियांना अलंकारांची आवड असून त्या चांदी, पितळ व काचेच्या बांगड्या हातात घालतात आणि कानात डूल व नाकात नथ घालतात. या लोकांना संगीताचा शौक असून बासरी, ढोल, करताल, मांदल इ. वाद्ये ते उत्सवप्रसंगी तसेच फावल्या वेळी वाजवितात.

सर्वसाधारणतः मुले वयात आल्यानंतर विवाह होतात. तथापि मुलींच्या बाबतीत क्वचित ऋतुप्राप्तीपूर्वीही लग्न झाल्याची उदाहरणे आढळतात. सिथु या पदावरील व्यक्ती लग्न ठरविते. माल पहाडीत बहिर्विवाही कुळीत विवाहविधी होतात. मोठ्या भावाच्या विधवेशी आणि धाकट्या मेहुणीशी (मृत पत्नीच्या बहिणीशी) लग्न करण्याची प्रथा आहे. शिवरात्रीनंतर लग्नसराई सुरू होते. देजची पद्धत रूढ आहे. विवाह निश्चित ठरविण्याच्या विधिस ‘मालाचंदन’ असे म्हणतात. याच दिवशी लग्नाचा मुहूर्त निश्चित करून लग्न दोरे बांधतात. जितके दिवस लग्नमुहूर्तास लागतील तितक्या दोऱ्याला गाठी बांधतात. लग्नापूर्वी जलहरी देवतांची पूजा करतात. यांचा लग्नविधी दीर्घकाळ चालतो. मुलीला ऋतुप्राप्ती झाल्यानंतर तीन दिवस स्वतंत्र झोपडीत ठेवतात. प्रसुतीनंतर पाच दिवस जननशौच पाळतात. नवव्या दिवशी मुलाचे व सातव्या दिवशी मुलीचे मुंडन करतात आणि मग नामकरण विधि होतो. तीन ते सहा महिन्या दरम्यानच्या काळात मुलाला अन्नप्राशन करवतात. त्यावेळी नातेवाईकांना जेवण देतात. या दिवसापासून मुलाची आई पूर्ण शुद्ध झाली असे मानतात.

हे लोक जडप्राणवादी असून भूताखेतांवर व मृतात्म्यांवर त्यांचा विश्वास आहे. त्यांना संतुष्ट करण्यासाठी कोंबड्याचा बळी देतात. जलहरी देवतेव्यतिरिक्त ते काली, मनसा, दयामाई, भगवती, हरिनाथ, भूईन देवता, महादेव, धरती, गरमी गोसाई इ. देवतांना तसेच ग्रामदेवतांना भजतात. भगवान हा यांचा श्रेष्ठ देव. देवांना संतुष्ट करण्यासाठी ते बकरे बळी देतात. जनावरांच्या संरक्षणासाठी जेष्ठ महिन्यात गोरभू पूजा करतात. सूर्याला ते गोसाई म्हणतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला ते नमस्कार करतात. शाल वृक्षाला त्यांच्यात विशेष महत्त्व असून त्याभोवती नाचतात. गावाच्या पुजाऱ्यास मांझी म्हणतात. अपघाताने वा रोगाने मृत्यू आल्यास गावाबाहेर प्रेते पुरतात. पुरण्यापूर्वी मृताला तेल हळद लावून स्नान घालतात व पांढऱ्या कापडात गुंडाळतात. मृताचे डोके उत्तरेला ठेवून त्याला खड्ड्यात ठेवतात व त्यावर माती सारतात. बहुतेक लोक अलीकडे मृतास जाळतात. मृताचा उत्तराधिकारी प्रेताला अग्नी देतो. कुटुंबपरत्वे नऊ, अकरा, तेरा, पंधरा, तेवीस दिवस अशौच पाळतात. साधारणतः तेरा दिवस अशौच पाळण्याची पद्धत आहे. वर्षश्राद्धाला सर्व गावाला भोजन घालतात.

संदर्भ : 1. Das A. K. &amp Others, Planning for the Scheduled Tribes and Scheduled castes – A West Bengal Perspective, Calcutta, 1982.

             2. Das, A. K. Others The Malpaharias of West Bengal, Calcutta, 1966.

             3. Dalton, E. T. Tribal History of Eastern India, New Delhi, 1978.

             4. Risley, H. H. The Tribes &amp Castes of Bengal, Calcutta, 1891.

जोशी , प्रमिला