जिव्हारो : स्पॅनिश हिबारो. ते स्वतःला शुआरा म्हणतात. द. अमेरिकेत एक्वादोरच्या आग्नेयीस अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर व उ. पेरूत यांची वस्ती प्रामुख्याने आढळते. १९६० साली त्यांची लोकसंख्या २०,००० होती. त्यांपैकी १०,००० जिव्हारो एक्वादोरमध्ये राहतात. त्यांची घरे बंदिस्त असतात. पूर्वी ते मका व तंबाखू पिकवीत असत. गोफणीच्या साहाय्याने व भाल्याने ते शिकार करीत. मासे जाळ्यात पकडीत किंवा गुंगीचे औषध देऊन नंतर भाल्याने मारीत असत. लामा व गिनी डुक्कर ठेवावयास ते इंका लोकांकडून शिकले. ते लढवय्ये म्हणून प्रसिद्ध होते. एका खेड्याची वस्ती सु. ४० ते ८० माणसे एवढी असायची व त्यात एकाच घराण्याचे लोक राहावयाचे. जिव्हारोंची आपापसांत बरीच भांडणे होत. शत्रूला मारल्यावर त्याचे डोके संत्र्याच्या आकाराएवढे होईपर्यंत ते उकळावयाचे, असा त्यांच्यात प्रघात होता. त्याला ते त्सांत्सा (Tsantsa) म्हणतात. यामुळे मयताच्या आत्म्यापासून मारणाऱ्यास त्रास होत नाही, असा त्यांचा समज असे. त्यांच्यातील स्त्रिया मातीची भांडी तयार करतात व पुरुष कापड विणतात. जिव्हारोंची स्वतंत्र बोलीभाषा असून तिला जिव्हारोच म्हणतात. त्यांच्यात पाच विभाग आहेत : मूळ जिव्हारो, अँटिपा, ॲक्युएल, ह्युएम्बिझा आणि ॲग्यूरूना.

संदर्भ : Steward, J, Ed. Handbook of South American Indians, New York, 1948.                             

मुटाटकर, रामचंद्र