धनका : गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील एक अनुसूचित जमात. यांची वस्ती मुख्यत्वे गुजरात राज्यात अधिक असून महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार व तळोदा या तहशिलांत ती विशेषत्वाने आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,७६,११३ होती त्यांपैकी गुजरात राज्यात १,२८,०२४ होती. १९५६ च्या अधिनियमानुसार तड्‌वी, तेतरिया व वळ्‌वी या जमाती धमकाच्याच पोटजाती असल्याचे जाहीर करण्यात आले आणि त्याचा समावेश धनका जमातीत करण्यात आला. तेतरिया आणि तड्‌वी हे आपला उल्लेख शेवटी धनका लावून करतात, तर वळ्‌वी हे स्वतःस उच्य समजतात. बहुतेक धनका हे भिल्ली भाषा बोलतात, तर काही धनका गुजराती व मराठी भाषा बोलतात.

धनकांचे भिल्लांशी सादृश असले, तरी ते स्वतःस वेगळे समजतात. हे लोक भिल्लांपेक्षा दिसायला उजळ असून बसके नाक व जाड ओठ ही यांची शारीरिक वैशिष्ट्ये होत. महंमद बेगडाच्या स्वारीच्या वेळी ते जंगलात पळून गेले आणि कच्चे धान्य खाऊन राहीले, म्हणून त्यांना धनका हे नाव प्राप्त झाले अशी एक कथा आहे, तर काहींच्या मते धनुष्यक या संस्कृत शब्दावरून धनक नाव रूढ झाले आहे. महाभारतात उल्लेखिलेले धनुष्यक म्हणजेच धनका असाही एक मतप्रवाह आहे.

धनकांचा मुख्य व्यवसाय शेतमजुरी असून काहीजण जंगलातील लाकडे तोडून तसेच डिंक, मध इ. पदार्थ गोळा करून उपजीविका करतात. हे लोक पूर्वी बांबूच्या वस्तू तयार करीत. ज्वारीची भाकरी व तुरीची डाळ हे त्याचे मुख्य अन्न असून मांस, मासेही ते प्रसंगोपात्त खातात. लग्नसंभारभ वा अन्य सणांच्या वेळी ते दारू पितात.

धनकांची स्वतंत्र अशी खेडी नाहीत पण इतर खेड्यांतच ते वेगळी वस्ती करून राहतात. त्यांची घरे काटकोनी व आयताकार असून भिंती कुडाच्या व शेणाने सारवलेल्या असतात. त्यात तिन चार खोल्या असून एक वऱ्हांडा असतो. स्नानगृह व संडास कोणत्याही घराला नसतो. तरीसुद्धा घरे स्वच्छ ठेवण्याकडे त्यांची प्रवृती आहे.

यांत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून मुलामुलींची लग्ने वयात आल्यावर होतात. जमातीत मुलांची संख्या जास्त असल्यामुळे वधू संशोधनासाठी फिरावे लागते आणि प्रसंगी देजही द्यावे लागते. लग्न बहिर्वीवाही कुळीत होते. आते-मामे भावंड विवाह संमत नाही मात्र दिर-भावजय यांचे पुनरविवाह झाल्याची उदाहरणे आढळतात. जमातीत मुलीची संख्या कमी असल्याने घटस्फोटाची अनेक उदाहरणे आढळतात, त्यास फारकत म्हणतात. एकपत्नीकत्व रूढ असले, तरी अनेक बायका केल्याचीही काही उदाहरणे आहेत. लग्नानंतर बहुधा मुलगा स्वंतत्र राहतो. त्यामुळे विभक्त कुटुंबपद्धती असूनही क्कचित एकत्र कुटुंबपद्धती दिसते. मुलांना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो, पण मुलीस संपत्ती मिळत नाही.

धनकांच्यात गरोदर स्त्री अखेरपर्यंत काम करते. तिची प्रसूती नवऱ्याच्या घरी होते आणि ती सुइणीमार्फत (होयानी) होते. पाच दिवस सुवेर पाळतात. पाचव्या दिवशी बाळंतीण स्नान करते, नतंर सटवाईची पूजा होते आणि मुलाचे नामकरण करतात. मुलाची नाळ खोल खड्डा खणून मीठ व तांब्याच्या नाण्यासह पुरतात.

विवाहबाह्य मातृत्वास समाज शासन करीत नाही. मात्र पंचायत संबंधित पुरुषास त्याच स्त्रीशी लग्न करण्यास सक्ती करते. मात्र अशी व्यक्ती ज्ञातिबाह्य असल्यास त्या स्त्रीस वाळीत टाकतात.


धनकांच्या धर्मात वाघ्या, शिवाया, डोंगरदेव, गोप चौहान देव व धानदेव यांना महत्त्व आहे. याशिवाय ते उंचेरीमाता, नीचेरी माता, खप्पर जोगिणी, कालिका राणी वगैरे देवतांना पूजतात. वाघ्या देव त्यांच्या गोधनाचे, तर शिवाया देव त्यांच्या गावाचे रक्षण करतो, अशी त्यांची समजूत आहे. या देवांना ते मध्य आणि कोंबडीचे पिलू अर्पण करतात. गोप चौहान हा सर्पदेव आहे. धानदेव त्यांच्या पिकांचे रक्षण करतो. धनका वर्षातून दोनदा सर्व ग्रामदैवतांची सामुदायिक रीत्या पूजा करतात. चेटूक, भुतेखेते, जादुटोणा यांवरही त्यांचा विश्वास असून भगवतामार्फत त्यांची बाधा दूर केली जाते. हिदूंचे बहुतेक सर्व सण ते साजरे करतात पण दिव्याची अमावस्या व नंदर्वो हे त्यांचे खास सण असून नंदर्वो म्हणजे नविन पालवी फुटण्याचा सण ते विशेष उत्साहाने साजरा करतात. या वेळी तरुण-तरुणी एकत्र जमतात व आपले जोडीदार निवडतात.

धनका पुरुष बंडी, धोतर व फेटा घालतात, तर स्त्रिया चोळी व साडी नेसतात. अलीकडे शिक्षणाच्या प्रसारामुळे व शहरी लोकांच्या संपर्कामुळे त्याच्या पोषाखात आधुनिकता येत आहे. स्त्रियांचे अलकार चांदी-पितळेचे असतात. अलंकार प्रत्येक विवाहित स्त्री घालते व नवऱ्याच्या मृत्यूनंतर उतरविते. हंसडी या अलंकाराला मंगळसुत्राइतके महत्त्व असते. त्या कपाळावर व हातावर गोंदून घेतात. गोंदण्यात अनेक प्रकारचे आकृतीबंध असले, तरी आंब्याची डहाळी व स्वस्तिक त्यांना विशेष प्रिय आहे.

जमातीचा सर्व व्यवहार पंचायतीमार्फत चालतो. जमातीतील सरपंचास ज्ञाती पटेल किंवा कारभारी म्हणतात. तो इतर पंचांच्या सल्ल्याने जमातीचे प्रश्न सोडवितो. सरपंच व पंच वडिलधाऱ्या समजंस व्यक्तिंतून निवडलेले असतात.

धनका मृतांना जाळतात. मृत मनुष्य अविवाहित असल्यास त्याला हळदकुंकू वाहतात, मात्र विवाहितास फक्त कुंकू वाहतात. प्रेत प्रथम स्नान घालून नव्या वस्त्रात गुंडाळतात आणि त्याच्या तोंडात चांदीचे नाणे ठेवतात. इतर विधी बहुतेक हिदूंप्रमाणे करतात. लहान मुलांना पुरतात. दहा दिवस सुतक पाळतात व दहाव्या दिवशी मृताचे आत्प क्षौर करतात. दहाव्या व अकराव्या दिवशी आत्पांना जेवण घालतात. नंतर तेराव्या दिवशी गावजेवण घालतात. त्यास दहोद म्हणतात.

संदर्भ : The Maharashtra Census office, Census of India, 1961, Vol. X, Part V-B Scheduld Tribes in Maharashtra, Ethnographic Notes, Bombay, 1972.

देशपांडे, सु. र.