बोलोकी : आफ्रिकेतील काँगो खोऱ्यात विषुववृत्तातील वनप्रदेशात आढळणारा ‘बांतू’ जमातीमधील एक समूह. ‘पिग्मी’ लोकांकडून बळकाविलेल्या प्रदेशात ते राहतात. कॅमेरून, गिनी, सूदान, मलेशिया येथील समाजांचा परिणाम बोलोकी संस्कृतीवर झालेला आढळून येतो. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. जाम, तारो, केळी हे यांचे मुख्य अन्न असून मका, बटाटा, तंबाखू इ. पिके ते काढतात. मासेमारी, जलपर्यटन, शिकार इ. व्यवसायही ते करतात. अंतर्गत व्यापारात तांबे व लोखंडी नाण्यांचा ते उपयोग करतात. बकऱ्या, कुत्री, कोंबड्या पाळतात. पूर्वी हे लोक नरमांसभक्षक होते. विशेषतः पराजित शत्रूचे मांस ते खात. पुरुष शिकार व शेतीला मदत करीत. मुख्य गावरस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीत यांची घरे आढळतात. त्यांच्या भिंती लाकडाच्या, तर छपरे पानांची असतात. प्रत्येक वस्तीत एक अधिकारी असतो. त्याच्या मदतीस वयस्कर अनुभवी पुरुष सभासद असतात.

यांच्यातील गुलामांचा वर्ग सोडल्यास समाजांतर्गत फरक विशेषत्वाने आढळत नाही. वधूमूल्याची प्रथा आहे. जनावरांच्या रूपात दिलेल्या वधूमूल्याला ‘लोबोला’ म्हणतात. जवळच्या नातलगांमध्ये विवाह होत नाही. मेहुणी, देवर, विधवा इ. विवाह प्रकार प्रचलित आहेत. यांमध्ये पितृसत्ताक पद्धती रूढ आहे.

मांडके,म. वा.