न्यूर : दक्षिण सूदानमधील एक आदिम जमात. त्यांची लोकसंख्या ३,००,००० (१९६१) होती. यांची वस्ती मुख्यत्वे नाईल नदीच्या दोन्ही काठांवर दलदलीच्या प्रदेशात आढळते. उंच, आजानुबाहू व अरुंद कपाळ ही या जमातीची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून स्त्रीपुरुष नग्‍नावस्थेत वावरतात. ह्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन आहे. बागकाम, शेती व मच्छीमारी हे जोडधंदेही हे लोक करतात आणि शेतातून भरडधान्ये तसेच ज्वारी व मका ही पिके काढतात. पावसाळ्यात नद्यांना पूर येत असल्यामुळे ते टेकड्यांवर वस्ती करतात. तेथे फळांच्या बागा लावतात.

त्यांचे अन्न मुख्यत्वे दूध, मांस, मासे, ज्वारी व मका असून उन्हाळ्यात त्यात जनावरांच्या, विशेषतः गाईच्या, रक्ताचाही अंतर्भाव होतो. गुरे वैयक्तिक मालकीची असतात. जमिनीवर गावाचा हक्क असतो. जनावरांच्या मूत्राचा उपयोग ते शरीर स्वच्छ करण्याकरता करतात.

न्यूर ही प्रत्यक्षात काही जमातींच्या समूहाला लाभलेली संज्ञा आहे. तीत एकोपा कमी असून मालकीसंबंधी तंटे अधिक आढळतात तथापि विभक्त किंवा एकत्र नातेसंबंधास त्यांच्यात फार महत्त्व आहे. गावातील लोक एकमेकांस गणगोताने बांधलेले असतात. वर्गनिष्ठ नातेपद्धती, तसेच पितृवंशावळ आणि कुलपद्धती रूढ आहेत. स्वतःच्या किंवा मातृवंशावळीतील कोणत्याही व्यक्तीशी विवाह निषिद्ध मानतात. विवाहात वधूमूल्य म्हणून पशुधनाचा वापर केला जातो. विवाहात वधूच्या चेहऱ्याला लोणी लावून तिचे केशवपन करतात. ते तिच्या वैवाहिक दर्जाचे निदर्शक असते. विवाहानंतर पतिपत्‍नी एकत्र न राहता आपापल्या आईवडिलांकडे राहतात. पहिले मूल झाल्यानंतर वधूच्या आईवडिलांकडे आणि तदनंतर ते स्वगृहात राहू लागतात. पतीपासून फारकत घ्यावयाची झाल्यास वधूमूल्य परत करावे लागते. फारकतीचे प्रमाण बरेच कमी आहे. पुत्रजन्मासाठी नियोग पद्धतीही प्रचलित आहे. वयोगटाप्रमाणे पुरुषांचे सामाजिक स्थान बदलते. असे सु. सहा वयोगट असून वयात येणाऱ्या मुलावर अनेक धार्मिक संस्कार करतात. याशिवाय प्रत्येक वयोगट बदलताना विधी असतात. त्यांतील सर्वांत महत्त्वाच्या विधीच्या वेळी पुरुषाच्या दोन कानांमधील भाग सहा ठिकाणी कापला जातो व नंतर त्यास इतर भागांपासून अलग करण्यात येते.

त्यांची शासकीय संस्था दुबळी आहे. मुख्य पुढारी चित्त्या वाघाचे कातडे परिधान करतो. त्याला धार्मिक बाबतींत, तसेच वेळ पडल्यास इतर बाबतींत मध्यस्थी करण्याचा अधिकार असतो.

मृत माणसास पुरण्याची पद्धती त्यांच्यात रूढ असून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक सहा महिने केस वाढवितात. मृत माणसांपासून भूतबाधा होते, असा त्यांचा समज आहे.

आकाशदेवतेला हे पूज्य मानतात. ‘देंग’ नावाच्या देवतेचा युद्ध, शिकार व आजारपणाशी ते संबंध जोडतात. काही देवतांची पिरॅमिडवजा स्मारके ते बांधतात. दृष्ट लागणे व जादूटोणा यांवर त्यांचा विश्वास आहे.

संदर्भ : 1. Evans-Pritchard, E. E. The Nuer, Oxford, 1967.

          2. Howell, P. P. A Manual of Nuer Law, London, 1954.

मांडके, म. बा.