इबान : नैर्ऋत्य बोर्निओमधील भटके मलाई आदिवासी लोक. त्यांचे आधिकृत नाव सी-डायक (समुद्रावरील फिरस्ते) असले, तरी ती एक अपसंज्ञा आहे. इबान हे मूलतः दऱ्याखोऱ्यातून राहणारे लोक आहेत. ए. सी. हॅडनने १९०१ साली हे नाव प्रथम मानवशास्त्राच्या विवेचनात वापरले. त्याने त्यांचे वर्गीकरण ‘सागरी मंगोल’ म्हणून केले. ते मंगोलॉइड वंशाचे असून बुटके आहेत. त्यांचे डोळे काळे, नाक रुंद, ओठ जाड, केस काळेभुरे व वर्ण दालचिनीसारखा आहे. सारावाक प्रदेश हेच त्यांचे राहण्याचे प्रमुख ठिकाण असून त्यांपैकी काही लूपार व राजांग नद्यांच्या खोऱ्यांत तसेच सारिबास या भागात राहतात.
ह्यांच्या भटक्या वृत्तीमुळे त्यांस फुलपाखरी लोक असेही म्हणतात. अलीकडे हे शेतीप्रधान झाले आहेत. डोंगराच्या उतारावर भात व रबर ही पिके ते काढतात. रबराच्या नगदी पिकामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीनुसार प्रत्येक कुटुंब स्वतंत्र आहे. इबान समाज वर्गविरहित असून स्त्रीपुरुषांत समानता आहे.
इबानांची भाषा मलाई भाषेच्या जवळची आहे. या जमातीत अद्यापि पुरेसा साक्षरताप्रसार झाला नाही. त्यांच्या शिक्षणाकरिता सारावाक सरकारने अनेक विद्यालये उघडली असून नभोवाणीतर्फेही शिक्षणाचा प्रचार केला जातो. त्यांच्याकरिता पेम्ब्रिता हे वृत्तपत्र सारावाक सरकार काढते. इबानांचा धर्म प्राचीन व स्वतंत्र असला, तरी अलीकडे त्यांतील काहींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांच्या नौका झाडाच्या बुंध्यांच्या केलेल्या असतात. ते शंखशिंपल्यांचे काम व कापडाचे विणकाम ह्यांत कुशल आहेत. त्यांचे लोकवाङ्मय मौखिक परंपरेने चालत आले आहे. केवळ सारावाकमध्ये १९६१ मध्ये त्यांची २,३५,००० एवढी वस्ती होती.
भागवत, दुर्गा