मॅरेट, रॉबर्ट रानुल्फ : (१८६६–१९४३). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक्सटर महाविद्यालयात ते पदवी संपादन करून तत्त्वज्ञान या विषयात पाठनिर्देशक (ट्यूटर) म्हणून काम करीत होते. त्या सुमारास मानवशास्त्रीय विषयावरील निबंध-स्पर्धेत भाग घेण्याच्या निमित्ताने त्यांचा या विषयाशी परिचय झाला व त्याकडे ते आकृष्ट झाले. साहजिकच मॅरेट यांना मानवशास्त्राचे औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. तथापि पुढे त्यांच्या आदिवासींच्या विशेष अध्ययनामुळे त्यांना विद्यापीठात अध्यापनाचे पद प्राप्त झाले.

मॅरेट यांच्या आयुष्यातील अध्यापनाचा बहुतेक सर्व कालखंड ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गेला. १९०८–३४ या कालखंडामध्ये त्यांनी तेथे सामाजिक मानवशास्त्राचे प्रपाठक म्हणून अध्यापनकार्य केले आणि पुढे ते एक्सटर महाविद्यालयातच कुलमंत्री (रेक्टर) झाले. या पदावर ते अखेरपर्यंत होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातच त्यांचा त्यावेळचे प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ इ. बी. टायलर यांचा परिचय झाला आणि ते विशेषत्वाने आदिम धर्माच्या अभ्यासाकडे वळले. शिवाय त्यांनी जर्सी या आपल्या मूळ बेटावरील पुरातत्त्वीय उत्खननाचे व्यवस्थापन केले होते.

आदिवासी समाजातील धर्म हा त्यांच्या विशेष अध्ययनाचा विषय होता. आपल्या लिखाणातून त्यांनी आदिवासींचे मनोव्यापार आणि श्रद्धांचे स्वरूप यांवर विशेष प्रकाश टाकला आहे. आदिवासींच्या दैनंदिन जीवनावर श्रद्धांचा प्रभाव अधिक असला, तरी त्याला सर्वसामान्य व्यवहाराचे ज्ञानही मोठ्या प्रमाणात असते हे त्यांनी संकलित केलेल्या सभोवतालच्या गोष्टींसंबंधीच्या ज्ञानावरून सिद्ध होते. आदिवासींचे नित्यनैमित्तिक जीवन हे त्यांच्या धार्मिक श्रद्धांशी निगडित असलेल्या जीवनाहून खूपच वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यांचे व्यावहारिक जीवन सामान्य सारासारबुद्धीवर आधारलेले असते, तर त्यांच्या धार्मिक श्रद्धांशी निगडित असलेल्या कृतींभोवती गूढतेचे वलय असते, असे मॅरेट यांचे म्हणणे होते.

मॅरेट यांनी टायलर आणि फ्रेझर या दोन मानवशास्त्रज्ञांच्या आदिम धर्म व यातुविद्याविषयक विचारांवर टीका केली. आदिवासी मानवाची बौद्धिक प्रगल्भता गृहीत धरून या विचारांची मांडणी केली गेली आहे, असा त्यांच्या टीकेचा सूर आहे. आदिवासी मानवाची अलौकिक शक्तींवरील श्रद्धा हा त्यांच्या धर्माचा गाभा आहे व धर्माचे मूळ मानवाच्या बौद्धिक व्यवहारात नसून भावनेमध्ये आहे. व्यक्तीला वाटणाऱ्या भीतीपोटीच ती अलौकिक शक्तींचा अनुनय करते व त्यात तिच्या धार्मिकतेचा उगम आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला.

टायलर यांनी धर्माच्या उत्पत्तीसंबंधीचा चेतनवादी सिद्धांत पुढे मांडला होता. मृतात्मे निरनिराळ्या वस्तू व्यापून राहतात अशी आदिवासींची श्रद्धा असते व त्याची अवकृपा होऊ नये म्हणून ते त्या वस्तूंची पूजा-अर्चा करतात, हा विचार मॅरेट यांना मान्य नव्हता. ज्या वस्तूंना आदिवासी लोक धार्मिक महत्त्व देतात, त्या वस्तू सगुण आणि सजीव असतात, अशी आदिवासींची श्रद्धा असते, असे त्यांचे म्हणणे होते.

मॅरेट हे टायलर यांचे सहकारी व चाहते असूनही त्यांनी टायलर यांनी मांडलेल्या महत्वपूर्ण अशा संस्कृतीविषयक विचारांचा पुरस्कार केला नाही. आदिवासी समाजाचा अभ्यास करण्यासाठी टायलर यांच्या संस्कृती या संकल्पनेपेक्षा रूढी ही संकल्पना त्यांना अधिक उपयुक्त वाटली. रूढीबद्ध वर्तन असे आदिवासी मानवाच्या वर्तनाचे वर्णन त्यांनी केले आहे.

मॅरेट यांचे महत्त्वाचे लेखन हे त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचे तसेच विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या अभ्यासपूर्ण पाठांचे समग्र विवेचन आहे.त्यांच्या ग्रंथांपैकी थ्रेशोल्ड ऑफ रिलिजन (१९००), अँथ्रपॉलॉजी (१९१२), सायकॉलॉजी अँड फोकलोअर(१९२०), फेथ, होप अँड चॅरिटी इन प्रिमिटीव्ह रिलिजन (१९३२), सॅकमेंट्स ऑफ सिंपल फोक (१९३३) हेड, हार्ट अँड हँड्स इन ह्युमन इव्होल्यूशन (१९३५) व टायलर (१९३६) हे ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांतून प्रामुख्याने आदिम धर्माविषयी सांगोपांग चर्चा, मतमतांतरे आणि ऊहापोह आढळतो. अखेरच्या दिवसांत त्यांनी आपल्या आठवणी आत्मवृत्त रूपाने ए जर्सिमन ॲट ऑक्सफर्ड (१९४१) या शीर्षकाने पूर्ण केल्या.

संदर्भ : 1. Evans-Prichard, E. E. Theories of Primitive Religion, Oxford, 1965.

            2. Lowie, R. H. the History of Ethnological Theory, New York, 1937.

भोईटे, उत्तम