कोरगा : तमिळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांतील ही एक वन्य जमात. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ६,९३६ होती. केरळमध्ये त्यांची वस्ती दीड हजार होती. एका शूद्रापासून ब्राह्मणीला झालेली ही संतती आहे, असे तिच्या उत्पत्तीविषयी म्हणतात. त्यांच्या दोन शाखा सप्पू आणि कंटू या होत. सप्पू पानांची वस्त्रे परिधान करतात, तर कंटू सुती कपडे घालतात. कोरगा बुरूडकाम व भंगीकाम करतात. त्यांच्या देवांना गवत व पानांची वस्त्रे आवडतात. कोरगा जडप्राणवादी असून सूर्यपूजक आहेत. त्यांची पूजास्थाने वृक्षांच्या तळी असतात. पर्वस्त्र हा त्यांचा मोठा सण असतो. त्यांच्यात देजची पद्धत आहे आणि बहुपत्नीत्व रूढ आहे. घटस्फोटाची पद्धत रूढ असून पुनर्विवाहही प्रचारात आहे. मृतांना ते पुरतात.

आंध्रलगतच्या प्रदेशातील या लोकांना कोरगा हे नाव असले, तरीही ते वस्तुतः कोरचा ऊर्फ येरुकलच आहेत. दारिद्र्यामुळे ते भटकत असतात.

संदर्भ : Luiz, A.A.D.Tribes of Kerala, New Delhi, 1962.

भागवत, दुर्गा