कारेन : दक्षिण ब्रह्मदेशातील काही जमातींना कारेन या ब्रह्मी नावाने संबोधण्यात येते. ब्रह्मी भाषेत कारेन म्हणजे रानटी मनुष्य. हे मूळचे चीनमधील असून शानवंशीय लोकांच्या जुलमामुळे ब्रह्मदेशात आले असावेत. १९३१ मध्ये ब्रह्मदेशात सु. १३,००,००० कारेन होते. ते कारेन भाषा बोलत. मुख्यतः कारेन भाषेतील स्गा व प्वो या बोलीभाषा त्यांच्यात अधिक प्रचलित असून दोन्हीत लिहिण्याच्या दृष्टीने फारच थोडा फरक आढळतो. स्वातंत्र्योत्तर काळात ब्रह्मी भाषा सक्तीची केल्यामुळे कारेन भाषेचा वापर मर्यादित झाला आहे. ह्यांपैकी ७० टक्के लोक स्गा (Sgaw; पुरुष) व प्वो (Pwo; स्त्री) या अंतर्विवाही गटांपैकी कोणत्यातरी गटाचे असतात. ह्यांतील श्वेत कारेन हे त्यांच्या पोशाखावरून रक्त कारेनांपासून वेगळे ओळखता येतात. रक्त कारेन कारेन्नी, काया, ब्वे, बघाई वगैरे इतर नावांनीही ओळखले जातात. पूर्वी कारेनांकडे तिरस्काराने इतर लोक पाहत; परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांना बरेच सामाजिक अधिकार प्राप्त झाले. एकोणिसाव्या शतकात मॉङ् भाषा बोलणाऱ्या ⇨ तलैंग लोकांची संख्या हळूहळू घटू लागली व त्यांची जागा ह्या पांढरपेशा बौद्ध कारेन लोकांनी घेतली. प्वो कारेन लोकांपैकी बहुतेक मूळ तलैंग लोकांपैकीच असावेत. कारेनांपैकी बहुसंख्य बौद्ध धर्मीय असून उरलेल्यांपैकी काही ख्रिस्ती व जडप्राणवादी आहेत. ह्यांची वस्ती विस्तृत प्रदेशात विखुरलेली असल्यामुळे १९४७ मध्ये ब्रिटिशांना कारेनांच्या स्वतंत्र प्रांतासंबंधी निश्चित निर्णय घेता आला नाही. मात्र स्वातंत्र्योत्तर ब्रह्मदेशात कारेनांनी १९४८ नंतर स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यासाठी सशस्त्र उठाव केले. शेवटी १ जून १९५४ मध्ये त्यांस स्वतंत्र प्रांत देण्यात येऊन त्यांस ३ एप्रिल १९६४ मध्ये कॉथूले हे नाव देण्यात आले. अद्यापिही काही कारेन जंगलात राहतात.

संदर्भ : 1. Marshall, H. I. The Karens of Burma, London, 1946.

2. Tinker, Hugh, The Union of Burma : A Study of the First Years of Independence, Toronto, 1961.

देशपांडे, सु. र.