टायलर, एडवर्ड बेर्नेट : (२ ऑक्टोबर १८३२ – २ जानेवारी १९१७). सांस्कृतिक मानवशास्त्राचा प्रवर्तक. क्वेकरांच्या श्रीमंत कुटुंबात कँबर्वेल (लंडन) येथे जन्म. शालेय शिक्षण क्वेकर विद्यालयात. विद्यापीठात जावयाचे नाही, या क्वेकर तत्त्वाप्रमाणे रीतसर शिक्षणातून त्याने अंग काढून घेतले आणि वडिलांच्या व्यवसाय संस्थेत कारकुनाची नोकरी धरली. वयाच्या तेविसाव्या वर्षी क्षयरोगाची बाधा झाल्यामुळे प्रकृती सुधारण्याकरिता तो अमेरिकेस गेला. पुढे क्यूबामध्ये त्याची हेन्री ख्रिस्ती या हौशी पुरात्त्ववेत्त्याशी ओळख झाली आणि तो त्याच्याबरोबर मेस्किकोमध्ये टॉल्टेक संस्कृतीचा अभ्यास करण्याकरिता गेला. या सफरीत त्याला आदिम समाजाची जवळून ओळख झाली. सहा महिन्यांच्या संशोधनानंतर तो इंग्लंडला परत आला. १८५८ मध्ये त्याने ॲना फॉक्स या तरुणीबरोबर विवाह केला. मेक्सिकोमधील आपले अनुभव त्याने अनाह्यूएक  : ऑर मेस्किको अँड मेक्सिकन्स एन्शंट अँड मॉडर्न (१९६१) या ग्रंथात मांडले. त्यात टायलरने अनेक विषयांना वाचा फोडली. त्यात आदिम समाजाचा धर्म, तत्संबंधीच्या कल्पना वगैरेंचे तात्त्विक विवेचन होते. हीच तत्त्वे पुढे त्याने आपल्या इतर ग्रंथांत अधिक विस्ताराने मांडली. यानंतर तो रॉयल अँथ्रपॉलॉजिकल सोसायटीचा सभासद झाला आणि स्वतंत्र रीत्या त्याने आदिम संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. रिसर्चिस इन टू द अर्ली हिस्टरी ऑफ मनकाइंड अँड द डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन  (१८६५) प्रिमिटिव्ह कल्चर  (१८७१) आणि अँथ्रपॉलॉजी (१८८१) हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ. अँथ्रपॉलॉजी या ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वी त्याची रॉयल सोसायटीचा अधिछात्र म्हणून नियुक्ती झाली (१८७१). या वेळी एक मानवशास्त्रज्ञ म्हणूनही त्यास चांगलीच प्रतिष्ठा लाभली होती. त्याने आपल्या प्रिमिटिव्ह कल्चर या ग्रंथात आदिवासींच्या जडप्राणवादांसंबंधी महत्त्वाचे सिद्धांत मांडले. जुन्या आणि नव्या संस्कृती, मग त्या प्रगत वा आदिम असोत, त्यांचे तत्त्वचिंतन मानवी इतिहासाचा एक भाग म्हणून झाले पाहिजे, तसेच वर्तमानकाळाच्या आकलनासाठी भूतकाळाच्या अभ्यासाची गरज आहे. सर्व सचेतन व अचेतन पदार्थांत जीवात्म्याचा वास असतो. इ. त्याचे सिद्धांत उल्लेखनीय आहेत. डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा तो एक पुरस्कर्ता होता व म्हणून तो म्हणे, ‘उत्क्रांतिवादी मानवशास्त्रज्ञांनी पन्नास साठ वर्षे जडप्राणवादाचा सिद्धांत शिरोधार्य मानला पाहिजे’. त्याचे हे पुस्तक फार गाजले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. त्याला डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली (१८७५). १८८३ मध्ये तो ऑक्सफर्ड विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयाचा अधिरक्षक झाला. तेथे त्याने मानवशास्त्रावर व्याख्याने दिली. तेथेच पुढे काही वर्षे त्याने मानवशास्त्र विषयाचा प्रपाठक म्हणून काम केले. १८९६ मध्ये मानवशास्त्राचा पहिला स्वतंत्र विभाग ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू करण्यात आला. तो त्या विभागाचा प्रमुख प्राध्यापक झाला. १९०९ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. यानंतरच्या उर्वरित दोन तपांत स्फुटलेखांखेरीज त्याच्याकडून फारसे लेखन झाले नाही. त्याला पहिला गिफर्ड व्याख्याता म्हणून मान मिळाला. तसेच सर हा उच्च किताबही त्यास मिळाला व १९१२ मध्ये त्यास सरदारकी (नाइटहुड) मिळाली.

त्याने केलेली मानवशास्त्राची व्याख्या आजही प्रमाणभूत मानण्यात येते. तो वेलिंग्टन (सॉमरसेट) येथे मरण पावला.

संदर्भः 1. Burrow, J. W. Evolution and Society : A Study in Victorian Social Theory, Cambridge, 1966.

  2. Evans-Pritchard, E. E. The Position of Women in Primitive Societies : and Other Essays in Social Anthropology, London, 1965.

 3. Marett, R. R. Tylor, New York, 1936.

मुटाटकर, रामचंद्र