मसाई : दक्षिण आफ्रिकेतील एक भटकी पशुपालक जमात. यांची वस्ती मुख्यतः केन्या आणि टांझानिया प्रजासत्ताकांत विशेषतः उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या खचदरीत (रिफ्ट व्हॅलीत), गवताळ प्रदेशाच्या आसपास, वायव्य किलिमांजारो या भागात आढळते. हा भाग मसाई भूमी म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्यांची लोकसंख्या १९७१च्या जनगणनेनुसार सु. ३,१५,००० होती.

मसाई लोकांत निग्रोसदृश काही शारीरिक वैशिष्ट्ये दृग्गोचर होतात. उंच, सडपातळ शरीरयष्टी, तपकिरी वर्ण, धारदार नाक आणि काळेभोर डोळे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. यांचे मुख्य अन्न मांस व दूध असून गाय अथवा बैलाचे रक्त ते मानेजवळच्या एका विशिष्ट शिरेमधून काढतात. हे लोक हेमिटिक भाषासमूहातील मसाई भाषा बोलतात. यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन असून ते शेळ्या-मेंढ्यांचे व गाईबैलांचे कळप घेऊन कुरणांच्या शोधात भटकत असतात. पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी ते गोलाकार काटेरी कुंपण (क्रॉल) घालून मुक्काम करतात. तेथे मातीने सारवलेल्या कुडाच्या झोपड्या बांधून राहतात. झोपड्या बांधण्याचे काम मुख्यत्वे स्त्रिया करतात. या जमातीची सामूहिक कुरणे असून ते तुरळक प्रमाणात शेतीही करतात. जवळपासच्या वस्तीत दूध, मांस इत्यादींच्या बदल्यात धान्य व आवश्यक वस्तू घेतात.

या जमातीतील प्रौढ स्त्री-पुरुष डाक्यावर केस राखत नाहीत. स्त्रियांना कंठभूषणे व हस्तभूषणे विशेष आवडतात. आपले सर्व शरीर रंगविलेल्या कातडीने किंवा छापील कापडांनी झाकतात. मसाईत अनेक पितृवंशीय कुले असून ती चार अंतर्विवाही अर्धकात विभागलेली आहेत. यात जमातप्रमुख नसतो. शामान (लायबान) हाच जमातीतील सर्व धार्मिक क्रियाकर्म करतो.

या जमातीचे मूलभूत तत्त्व वयःश्रेणी असून जमातीतील सदस्य भिन्न वयोगटांत विभागलेले असतात. प्रत्येक वयोगटाचा साधारणतः १५ वर्षांचा कालावधी असतो. बालवयीन मुलांचे दीक्षाविधी सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. यौवनारंभ आणि सुंता हे फार महत्त्वाचे विधी होत.

मुलेमुली वयांत आल्यानंतर विवाह होतात. वधूमूल्य पशुधनाच्या रूपात दिले जाते. वयोवृद्धांच्या बाबतीत बहुपत्नीत्व रूढ आहे. समवयस्क पुरुषांत पत्नीची देवाण-घेवाणही होते.

हे लोक जडप्राणवादी असून एन-आई, काळा देव, तांबडा देव इ. देवतांना भजतात. पूर्व आफ्रिकेतील उत्तम लढवय्ये म्हणून हे लोक पूर्वी प्रसिद्ध होते. त्यांची लोकसंख्या हळूहळू घटत असली, तरी त्यांच्या चालीरीती व रूढी अद्यापि अवशिष्ट आहेत.

संदर्भ : 1. Hanley, Gerald, Warriors and Strangers, London, 1972.

2. Hollis, A. C. The Masai : Their Language and Folklore London, 1971.

शेख, रुक्साना