रथवा : भारतातील एक आदिम जमात. तिची वस्ती गुजरात व महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात धुळे, ठाणे जिल्हे आणि बृहन्मुंबईत ती आढळते. रथवांची लोकसंख्या ९६ होती (१९७१).

रथवा स्वतंत्र वस्ती करून कुडाच्या झोपडींतून खेड्यात (पाड) राहतात. झोपडीला दोन दालने असतात. पुढच्या दालनात शेळ्या, मेंढ्या, गाई वगैरे बांधतात. त्यांचा प्रमुख धंदा शेती असून काही मोलमजूरी करतात. त्यांचे प्रमुख अन्न ज्वारीची भाकरी आणि चटणी असून भात व चपाती सणासुदीला खातात. बहुतेक रथवा मांसाहारी आहेत.

त्यांचा पोषाख साधा असतो. लुंगीसारखे वस्त्र ते गुंडाळतात. स्त्रिया परकराप्रमाणे झगा घालतात व चोळी वापरतात. त्यावर ओढणी असते. स्त्रियांना अलंकारांची हौस असून प्रत्येक मुलगी हनुवटी, गाल आणि कपाळ यांवर गोंदवून घेते. त्यांची मातृभाषा लमाणी/वंजारी आहे.

वयात आलेल्या मुला-मुलींचे विवाह करतात. आतेमामे भावंडांच्या विवाहास अग्रक्रम दिला जातो. दुसरी पत्नी म्हणून मेहुणी विवाहही रूढ आहे. घटस्फोट आणि विधवाविवाह यांना जमातीत मान्यता असून वधूमूल्य म्हणून काही रक्कम, दोन गाई व दोन बैल द्यावे लागतात. हिंदू पद्धतीने विवाहसमारंभ साजरा करतात. दोन रोवलेल्या मुसळांना प्रदक्षिणा घातल्यानंतर लग्नविधी समाप्त होतो. नंतर मेजवानी होऊन मुली रात्रभर नृत्य करतात.

रथवा हिंदू असून हनुमान व अंबाबाई या देवतांना भजतात. जादुटोणा आणि भुताखेतांवर त्यांचा विश्वास आहे. तुळस, पिंपळ, बेलफळ, आंबा आदी वृक्षांना व गायीला ते पवित्र मानतात. त्यांच्यात जात पंचायत असून त्याच्या पुढाऱ्याला नाईक म्हणतात. तो लोकांची गाऱ्हाणी ऐकून निर्णय देतो आणि गुन्हेगाराला दंड करतो. या दंडातून सर्व जमातीला मेजवानी देतात.

रथवा मृताला जाळतात वा पुरतात. विवाहितांना जाळतात. जाळण्यापूर्वी नवीन वस्त्रात गुंडाळून त्याला हळद, तेल लावतात. तिसऱ्या दिवशी विधियुक्त्त दिवस पाळतात. अन्य विधी हिंदूंप्रमाणे करतात.

संदर्भ : 1. Gare, G. M. Aphale, M. B. Tribes of Maharastra, Pune, 1982.

2. The Maharastra Census Office, Comp. Scheduled Tribes in Maharastra, Bombay, 1972.

देशपांडे, सु. र.