ग्वारानी : दक्षिण अमेरिकेतील ग्वारानी बोली बोलणाऱ्या इंडियन जमातीच्या कुलास ग्वारानी हे जातिपद देतात. हे अर्जेंटिना, यूरग्वाय, पॅराग्वाय व आग्नेय ब्राझील या प्रदेशांत विखुरले आहेत. पॅराग्वाय देशातील १८,१९,००० लोकसंख्येपैकी १७,००० शुद्ध रक्ताचे ग्वारानी होते (१९६१). इतर स्पॅनिश व ग्वारानी यांचे संमिश्र वंशज आहेत तेथे स्पॅनिश व ग्वारानी या दोन प्रमुख भाषा आहेत.

स्पॅनिश आक्रमणापूर्वी स्त्रिया रताळी व मका पिकवीत आणि पुरुष शिकार व मासेमारी करीत होते. ते विशेष कपडे वापरीत नसत. ग्वारानी पूर्वी नरभक्षक होते असाही एक प्रवाद आहे. सात किंवा आठ मोठ्या झोपड्यांनची ग्वारानींची खेडी असत. खेड्याभोवती लाकडी ओंडक्यांची संरक्षक भिंत असे. टोपल्या व कापड विणणे, मातीची भांडी घडविणे व पक्ष्यांच्या पिसांच्या विविध कलाकृती बनविणे या कलाप्रकारांत ग्वारानी वाकबगार होते.  सोन्याच्या आशेने १५३६ मध्ये स्पॅनिश लोक ग्वारानी प्रदेशात आले. त्यांच्यानंतर मिशनरी लोक तेथे गेले आणि तेव्हापासून येथे यूरोपीय उद्योगधंदे सुरू झाले.

संदर्भ : Steward, J. H. Native Peoples of South Americe, New York, 1959.            

     मुटाटकर, रामचंद्र