बाताक : इंडोनेशियातील मध्य सुमात्रामध्ये राहणारी एक मलायी आदिवासी जमात. आपण इंडोनेशियामधील मूळ रहिवासी आहोत, असा या जमातीचा दावा आहे. नंतर आलेल्या आक्रमकांच्या टोळ्यांनी या जमातीस मध्ये-पूर्वेकडे रेटले. दीडलाख लोकसंख्या (१९७॰) असलेल्या या जमातीच्या तोबा, मंदाईलिंग, कारो, पाकपाक व तिमूर अशा पाच उपजमाती आहेत. बाताक लोक शेतीवरच उपजीविका करतात. काही लोक पशुपालनातही गुंतलेले आहेत. मुख्य पीक तांदळाचे आहे. कुळ हा गटप्रमुख असून कुळीतील सर्व लोक एकाच मोठ्या घरात राहतात. त्यांची घरे लाकडाची असून त्यांवर कोरीवकाम केलेले आढळते. त्यांची भाषा ऑस्ट्रोनेशियन कुटुंबातील असून तीत अनेक संस्कृत शब्द आढळतात. पूर्वी हे नरमांसभक्षक होते. मृतात्म्याची पूजाही ते करीत. सुमारे एक तृतीयांश बाताक लोक जडप्राणवादी असून उरलेल्यांपैकी निम्मे मुसलमान व निम्मे ख्रिस्ती धर्माचे अनुयायी आहेत.

परळीकर, नरेश.