मिकिर: पूर्व भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे आसाम राज्यातील विशेषतः कामरूप, नौगाँग व सिबसागर जिल्ह्यांत आणि मिकिर टेकड्या व उत्तर काचार टेकड्या या प्रदेशांत आढळते. मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांतही त्यांची तुरळक प्रमाणात वस्ती आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,८४,०८९ होती. आसामी लोकांनी त्यांना मिकिर हे नाव दिले आहे तथापि ते स्वतःचा उल्लेख आर्लेङ् या नावानेच करतात. आर्लेङ्चा अर्थ माणूस असा होतो. त्यांचे तीन पोटभेद आहेत : हमरिजोंकोली किंवा चिंगथाँग, राँगहोंग व हमरी. प्रत्येक पोटजमातीत काही कुळी असून त्यांपैकी इंगटी, तेरंग, तेरॉन, तिंमघ व इंघी ही महत्त्वाची व प्रमुख आहेत. एकाच कुळीत विवाहसंबंध होत नाहीत. मिकिर जमातीबाहेर असमिया भाषा बोलतात. त्यांच्या बोलीभाषेचे नागा गटातील बोलीभाषांशी साम्य आहे.

ते तिबेटी-बर्मन वंशी आहेत. निमगोरा गव्हाळी वर्ण, मध्यम उंची, सपाट व रुंद नाक व बळकट शरीरयष्टी ही यांची काही प्रमुख शारीरिक वैशिष्ट्ये असून यांचा पोशाख वैशिष्ट्यपूर्ण असतो. लाल वा निळे पट्टे असलेल्या पांढऱ्या कापडाचा व बिनबाह्यांचा अंगरखा (चोई) व आखूड धोतर (रिकाँग) वा पंचा पुरुष नेसतात. स्त्रिया परकर (पिनी) नेसतात व उरोभाग उत्तरीयाने झाकतात. परकरावर नक्षीदार कमरपट्टा बांधतात. थंडीच्या दिवसात दोघेही अंगावर शाल घेतात. पूर्वी आपले कपडे घरच्या मागावरच विणण्याची पद्धत होती. 

भात व मासे हे यांचे मुख्य अन्न असून तांदळाची दारू त्यांना अतिशय प्रिय आहे. शेती होच त्यांचा मुख्य व्यवसाय असून शिकार व मच्छीमारी हेही व्यवसाय काही प्रमाणात प्रचलित आहेत. ते झूम पद्धतीची बदलती शेती करतात आणि भात हे मुख्य पीक घेतात. यांशिवाय मका, कापूस, एरंडी ही पिके आणि संत्री, नारंगी, लिंबू इ. फळे यांची बागाईत करतात. बापाची संपत्ती मुलाकडे जाते पण मुलगा अगर मुलगे नसल्यास मुलींना वा पत्नीला संपत्तीचा वारसा मिळत नाही. तो सर्वांत जवळच्या पुरुष आप्ताला देण्यात येतो.

मिकिरांची वस्ती वा गावे लहान असून एका वस्तीत साधारणतः पाच-सहा झोपड्या असतात. त्यांची झोपडी वा घर म्हणजे एकच दालन असून ते जमिनीपासून उंचीवर व लाकडाच्या खांबांनी केलेल्या चौकटीवर फळ्या टाकून बांधतात. घराच्या भिंती बांबूच्या कामट्यांच्या व छप्पर गवताचे असते. खालच्या बाजूस डुकरे, बकरी ही जनावरे आणि कोंबड्या इ. ठेवतात. एका लांब फळीला रुंद खाचा पाडून जिन्यासारखा उपयोग करतात. या दालनात त्यांचे संयुक्त कुटुंब राहते. 

मुलेमुली वयात आल्यानंतर बहिर्विवाही कुळीत सोयरीक करतात. आतेमामे भावंडांना अग्रक्रम दिला जातो. लग्नाचा विधी साधा असून कोंबड्याचा बळी व मद्यपान यांना प्राधान्य देतात. कोंबडा बळी दिल्यानंतर एक रात्र व एक दिवस लोटला की पतिपत्नीचे नाते प्रस्थापित होते. विवाहविधी वधूच्या घरी साजरा करतात. देज देण्याची पद्धत नाही. मुलाच्या संमतीनंतर वधू आपल्या घरी वरासाठी शय्या तयार करते व लग्नसोहळा पार पडतो. बहुधा मिकिर एकच पत्नी करतो आणि घटस्फोटास जमातीत मान्यता असली, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. 

अरनाम कैथे, पेंग, हेम्फी अरनाम, रेक अंगलॉगे इ. यांचे अनेक देव आहेत परंतु मुख्य देव पेरतार्त रिज्जे असून तो गृहाचा स्वामी व क्षेत्रपती आहे. देवतांत पेंग व अरनाम या रागीट देवता आहेत. पेंग गृहदेवता व अरनाम कृषिदेवता असून पेरतार्तला वर्षातून एकदाच बळी देतात. हा मोठा उत्सव असतो. पांढरा बोकड, पांढरा कोंबडा अगर रेडा त्याला बळी देतात. मात्र डुक्कर काळे असले तरी त्याचा बळी दिला तरी चालतो. पेंग व अरनाम ही उग्र दैवते असल्यामुळे त्यांना वारंवार बळी द्यावे लागतात. मिकिरांवर हिंदू धर्माचा प्रभाव आहे. भुताखेतांवर व जादूटोण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यासाठी मांत्रिकाला ते पाचारण करतात. वृद्धांना जमातीत मान व आदर असून सर्वांत वृद्ध पुरुष व सर्वांत वृद्ध स्त्री पुजारी व पुजारीण होतात. स्त्रीच्या बाबतीतले सर्व विधी मर्तिकसुद्धा पुजारीण करते व पुरुषाचे विधी पुजारी करतो. पुजारीण स्त्रिया, मुले आणि आजारी माणसे यांच्या बाबतीत फार उपयोगी पडते. तीच वैद्य व मांत्रिक असते. यांचे खास असे कोणतेच सण नाहीत परंतु पेरणीचा हंगाम व नवीन पीक आले म्हणजे गावात मोठा उत्सव होतो. त्यावेळी कोंबडा व बकरी बळी देतात आणि सामुदायिक भोजन करतात. यांच्यात मृताला जाळतात. मात्र लहान मुले व साथीच्या रोगाने मेलेल्यांना पुरतात. मृत्यू घडला की गावातील व आसपासचे लोक गोळा होतात. यांचा अंत्याविधी मोठा असून खर्चिक असतो. त्यामध्ये तरुण तरुणींचे नृत्य व त्याला ढोलाची साथ प्रमुख असून मद्य आणि भोजन यांना महत्त्व देतात. दुसऱ्या दिवशी मृताचे सोयरे अस्थी गोळा करून पुरतात. नंतर मृताच्या थडग्यावर-शिळेवर मृतासाठी काही अन्न ठेवतात. गाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत मृताला जाळलेली जागा त्याच्याच नावाने ओळखली जाते.

संदर्भ : 1. Barkataki, S. Comp. Tribes of Assam, New Delhi, 1969.

             2. Stack, E. Lyall, The Mikirs, London, 1908.

भागवत, दुर्गा