पॉलिनीशिया : मध्य पॅसिफिक महासागरातील हा द्वीपसमूह ओशिअनियाचा एक भाग होय. पॉलिनीशिया यातील मूळ ग्रीक शब्दांचा अर्थ ‘अनेक बोटे’ असा होतो. ३० उ. ते ४७ द. व १६५ पू. ते ११० प. यांदरम्यान पॉलिनीशियन बेटे पसरलेली आहेत. लोकसंख्या ३५ लक्ष (१९७०). त्यांत न्यूझीलंड, हवाई बेटे, सामोआ, लाईन बेटे, फ्रेंच पॉलिनीशिया, कुक बेटे, फिनिक्स बेटे, एलिस बेटे, टॉंगा, ईस्टर बेटे इत्यादींचा अंतर्भाव होतो. यांतील बहुतेक बेटे ज्वलामुखी किंवा प्रवाळ खडकांची बनलेली आहेत. दक्षिणेकडील काही भाग वगळल्यास येथे सर्वत्र उष्ण कटिबंधीय हवामान आहे. लागवडीयोग्य जमीन फार कमी आहे. या प्रदेशातील मुख्य उत्पादनात नारळ, केळी, रताळी, ऊस इत्यादींचा समावेश होतो.

या द्वीपसमूहांतील ⇨सामोअन, हवाईअन, टॉंगन,⇨माओरी,⇨मार्केझान यांसारख्या अनेक आदिवासी जमातींना उद्देषून पॉलिनीशियन ही सर्वसाधारण संज्ञा विषेशत: आधुनिक मानवशास्त्राचे अभ्यासक वापरतात. या आदिवासींची सर्वसाधारण सांस्कृतिक वैशिष्ट्येही अभ्यासनिय ठरली. अठराव्या शतकापासून या आदिवासी जमातींचे हळूहळू आधुनिकीकरण घडून येऊ लागले तथापि यांच्या पारंपरिक संस्कृतिविशेषांचा जो अभ्यास होत आहे, त्याचे स्थूल दिग्दर्शन पुढे केलेले आहे.

विसाव्या शतकात पॉलिनीशियातील विविध बेटांत उत्खनने झाली. त्यांतून लॅपिटा स्थळी सापडलेल्या पद‌्धतीची अनेक मृत्पात्रे, भव्य पुतळे आणि इतर अनेक लहानसहान वस्तू वा वास्तू मिळाल्या. कार्बन-१४ कालमापनपध्दतीनुसार टॉंगा बेटावर इ. स. पु. ११४० मध्ये वस्ती असावी, असे आढळून आले. या प्रदेशातील हीच आद्य लोकवस्ती असावी. येथील मूळचे लोक आणि त्यांचे मूल्यस्थान यांविषयी अद्याप निश्चित व विश्वासार्ह माहिती मिळत नाही. काहिंच्या मते पॉलिनीशियन हे मूळचे अमेरिकेतिल इंडियन लोक असावेत. तथापि बहुतेक संशोधक इंडोचायना (आधुनिक द. व उ. व्हिएटनाम, ख्मेर प्रजासत्ताक, लाओस इ.) व दक्षिण चीनची किनारपट्टी हे त्यांचे मूळचे स्थान असावे, असे मानतात. इ. स. पू. ३५०० च्या सुमारास ते पॅसिफिक महासागराकडे सरकू लागले. त्याचे हे स्थानांतरण इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकापर्यंत चालू होते.तत्संबंधीचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध झालेले आहेत. तथापि पॉलिनीशियात हे लोक स्थिरावल्यानंतर त्यांच्यात व आग्नेय आशियातील लोकांत शारीरिक वैशिष्ट्ये, भाषा, व्यवसाय इ. बाबतींत फारच थोडे साम्य टिकून राहिले. 

सर्वसाधारणपणे पॉलिनीशियन म्हणून मानले गेलेले विविध आदिवासी जमातींचे लोक उंचेपुरे, तांबूस-तपकिरी वर्णाचे, दणकट असून, काळे कुरळे केस, बारिक पिंगट डोळे, रूंद चेहरा, काहीसे पसरट पण टोकदार नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. ते मुख्यत: कॉकेशियन वंशाचे असून पश्चिमेकडिल बेटांतील जमातींत मंगोलॉइड व निग्रो वंशांच्या छटा आढळतात. स्त्री-पुरुषांत गोंदण्याची विशेष हौस आढळते. मूळ पॉलिनीशियन शब्दावरूनच गोंदणे या अर्थी असलेला टॅटोइंग हा इंग्रजी शब्द रूढ झाला. हे लोक मलायो-पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील पॉलिनीशियन भाषेच्या विविध बोली बोलतात. त्यांपैकी हवाईअन, सामोअन, ताहितीअन व माओरी भाषांचा अधिक वापर केला जातो. सर्व पॉलिनीशियन लोक दर्यावर्दी आहेत.

मच्छीमारी व शेती हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होत. चटया विणण्याचे कामही ते करतात. टॅपिओका, रताळी, भाकरीचे झाड, सुरण, केळी, आर्वी, नारळ, केवडा ही त्यांची काही प्रमुख पिके होत. ‘कवा’ ही आवडती दारू असून ती मिरीच्या झाडापासून तयार करतात. तिचा उपयोग सणासुदीला व इतर समारंभप्रसंगी होत असे. शेतीत खणण्याच्या काठीला त्यांच्यात विशेष महत्त्व होते. जलसिंचन व बंधारे यांचा शेतीसाठी सर्रास उपयोग करीत. पॉलिनीशियन लोकांना धातूंची विशेष माहिती नसावी. त्यांची हत्यारे, अवजारे व भांडी लाकूड, दगड व नारळाची करवंटी यांपासून तयार केलेली असत. नित्याच्या जीवनात नारळाला प्राधान्य असे. नारळाच्या पानांची छपरे व चटया करीत आणि शेंडीचा उपयोग काथ्या वळून दोरखंडे करण्यासाठी करीत. नारळाचे पाणि व खोबरे खाण्यासाठी वापरत. त्याचे तेलही काढीत. करवंटीचा उपयोग कप, चमचे, भांडी इ. तयार करण्यासाठी करीत.

मासेमारितील पॉलिनीशियनांचे ज्ञान प्रगत होते. समुद्रात संचार करण्यासाठी ते लहानमोठे पडाव व होड्या वापरत. मच्छीमारीसाठी लहानमोठी जाळी, ग, भाले, बरचे, गरी इ. साधने ते वापरित.मासे पकडण्याचे गरी हे अर्धवर्तुळाकृती साधन वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.

यांची घरे लहान असत. लाकडाचा जास्तीत जास्त उपयोग करून ती बांधीत. भिंती गवताच्या व लाकडाच्या असत. काही ठिकाणी दगडी पायावर घरांची बांधणी करीत. घराला क्वचित ओसरी ठेवीत. सार्वजनिक वास्तू व मंदिरे मोठी असत. त्यांच्या बांधकामात विविध रंगाचे गुळगुळीत व रेखीव दगड वापरीत. क्वचित विटांचाही वापर केल्याचे आढळते. बहुतेक पॉलिनीशियन स्त्री-पुरुष अर्धनग्न असत. कमरेपर्यंतचा भाग जे जाड्याभरड्या कापडाने झाकत. त्याला ‘लवालवा’ किंवा ‘परिऊ’ म्हणतात. न्यूझीलंडमधील माओरी तागाचे कपडे वापरीत. सामोआ व टाँगा बेटांत टापा नावाचे कापड मलबेरी झाडाच्या सालापासून तयार करीत. हवाई बेटांतील किवी पक्ष्यांच्या पिसांचे झगे व शिरोभूषणे कलात्मकतेचे नमुने होत. काही जमातींच्या स्त्रिया गवतांचे झगेही वापरीत.

बहुतेक जमातींत पितृसत्ताक कुटुंबपद‌्धती असल्याचे दिसून येते. वारसा हक्क मोठ्या मुलाकडे जाई. थोरल्या घराण्यातील अथवा प्रमुख शाखेतील मोठ्या मुलाकडे कुटुंबाचा वारसा व अधिकार जात असत. पहिल्या शाखेतील पिढीला विशेष महत्त्व असून जमातीचे पुढारी या शाखेतून निवडले जात. या शाखेतील पुरुषांत ‘माना’ शक्ती म्हणजे दैवी सामर्थ्य असते, अशी सर्वसाधारण समजूत असे. होड्या बनविणे, गोंदकाम करणे, धार्मिक विधी, सामाजिक रूढी इत्यादींचे प्रशिक्षण संघटित संस्थेमार्फत देण्यात येई. पहिले अपत्य मुलगा असेल, तर त्यानिमित्त विविध धार्मिक विधी करीत. मुलांची सुंता करण्याची पध्दत असल्याचे दिसते. सुंता न केलेले मूल मृत्यूनंतर अत्यंत दु:खी जगात जाते, अशी समजूत रूढ होती. रजस्वला मुलींच्या बाबतीत काही धार्मिक संस्कार रूढ होते. कुमारींना लैंगिक स्वातंत्र्य होते. गोंदणे, कान टोचणे हेही विधी कुटुंबात साजरे होत. वयात आल्यानंतरच मुलामुलींचे विवाह होत. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आणि बर्‍याच प्रमाणात स्वातंत्र्यही होते. विवाह नातेसंबंधात होत. घराण्यातील नातेसंबधांतील व्याक्तींचे समाजात महत्त्व असे. कुटुंबप्रमुख हा आपल्या हाताखालील अधिकार्‍यांच्या नेमणुका करी. अशा प्रमुखांचा एक वर्ग असे. वंशपरंरेने हे प्रमुख पुढे सत्ताधीश बनत. जो जमातींची बंधने मोडेल, त्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येई. हवाई बेटांतील आणि ताहिंती बेटांतील अशा प्रमुखांच्या अधिपत्याखाली सर्व जमीन असे आणि ते सर्वाधिकारी असत. अनेक वेळा धार्मिक बाबतींत त्यांचा शब्द अखेरचा मानला जाई.


ख्रिस्ती लोकांच्या आगमनापूर्वी बहुतेक पॉलिनीशियन पूर्वजपूजा करीत. काही जमातींत नरबळी व नरमांसभक्षण यांसारख्या अमानुष चाली प्रचलित होत्या. त्यांचा धर्म मुख्यत्वे ‘माना’ व  ‘तापू’ (ताबू) या दोन संकल्पनांभोवती केंद्रीत झालेला होता. आपल्या पूर्वजांचा जन्म पृथ्वी (माता) व आकाश देव (पिता) यांच्या पोटी झाला, अशी त्याची समजूत असे. या दोन देवतांशिवाय टेने, तू, रोंगो, टांगारोआ इ. देवतांना ते भजतात. टांगारोआ हा समुद्रदेव असल्यामुळे आणि पॉलिनीशियन मुळात दर्यावर्दी लोक असल्यामुळे त्यांच्यात या देवतेला विशेष महत्त्व झाले आहे. याशिवाय टेने ही प्रकाशदेवता पुरुषसंतती देते अशी त्यांची कल्पना होती. रोंगो व तू ह्या अनुक्रमे शेतीच्या व युद‌्धाच्या देवता होत. बहुतेक सर्व देवतांची मूर्तिपूजा रूढ होती. माऊइ हा लोकनायक देव समजला जाई. यांशिवाय कॅनॅलिआ, कॅने, लोनो, कू इ. स्थानिक व ग्रामीण देव-देवतांही विविध जमातींत स्थानपरत्वे पूज्य मानल्या जात.

माना आणि तापू या संकल्पनांना या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. जमातीच्या पुढार्‍यांमध्ये तसेच जेष्ठ मुलांमध्ये माना ही अतिदैवी शक्ती असते, अशी त्यांची धारणा होती. या अलौकिक शक्तीच्या स्वरूपासंबंधी त्यांच्या कल्पना इतर अदिवासीप्रमाणेच आहेत. माना ही शक्ती जडचेतन वस्तूत असते, ती निराकार असते व अत्यंत सामर्थ्यशाली व उपयुक्त असते, अशी त्यांची धारणा होती. मानाप्रमाणेच काही व्याक्ती व वस्तू याबद्दल ताबू म्हणजे निषिद‌्धता पाळण्यात येई. तिला तापू ही पॉलिनीशियन संज्ञा होती. कर्मकांडाप्रमाणे काही गोष्टी धार्मिक दृष्ट्या टाळणे व विशिष्ट वर्तन न करणे यांस तापू म्हणत.

पॉलिनीशियनांच्या फारच मोठ्या कलाकृती अवशिष्ट आहेत. त्यांची कलात्मक निर्मिती उदा., विणलेल्या सुरेख टोपल्या, वल्कलवस्त्रे, भिन्न पक्ष्यांच्या पिसांचे विविधरंगी झगे, गवताची झबली, नक्षीयुक्त चटया, पंखांची शिरोभूषणे इ. हळहळ नष्ट पावत गेली.मूर्तिकामात पॉलिनीशियनांनी फारशी प्रगती केली नसली, तरी त्यांच्या ओबडधोबड व काहीशा बेढब मूर्ती सापडतात. या मूर्तीवर कलाकुसर केलेली असून बटबटीत डोळे व बाहेर काढलेली जीभ या मूर्तीत दिसते. यांशिवाय मानवी देहाकृती, जनावरांची तोंडे यांच्या भव्य शिल्पाकृतीही आढळतात. त्यांच्या कुकईलिमो कू या युद‌्धदेवतेच्या मूर्तिचे दात कुत्र्याचे असून डोळे मोतीशिंपल्याचे  आहेत. ही मूर्ती शेकडो पक्ष्यांच्या पंखांची बनविलेली आहे. वास्तूरचनेच्या बाबतीत मात्र या लोकांनी लक्षणीय विकास केलेला दिसतो तथापि काही बिनछताची दगडी मंदिरे व सभागृहे एवढ्याच वास्तू अवशिष्ट आहेत. काटेकोरपणे केलेला वास्तूंचा अभिकल्प, प्रमाणबध्दता, विविध रंगाच्या आकाराच्या व गुणवत्तेच्या दगडाची कलात्मक रचना यांवरून त्यांचे वास्तूरचनेतील कौशल्य दिसून येते. या लोकांना अलंकांची फार आवड होती. त्यांचे काही नमूने संग्रहालयातून आढळथात. जमातीचे प्रमुख मानवी केसांच्या माळा गळ्यात घालीत. अशा माळांत देवमाशाच्या दाताचा तुकडा किंवा मोत्याचा शिंपला यांचा उपयोग करीत. डुकराच्या दातांची कंकणे, कुत्र्यांच्या कातड्याचे झगे किंवा पिसांचीविविध आकाराची शिरोभूषणे इ. अलंकार उल्लेखनीय आहेत. हे लोक सर्वांगावर गोंदून घेत. गोदण्यात पशुपक्ष्यांच्या चित्रांकनाला महत्त्व होते. न गोंदलेली व्यक्ती नरकात जाते, अशी त्यांच्यात समजूत असे.

पॉलिनीशियन लोककलांत गायन-वादन, नृत्य व नृत्यगीते, नाविक गीते, प्रेमगीते यांचा समावेश होतो. शार्कमाशाच्या कातडीचा ढोल आणि लाकडी फटिचा तास ही त्यांची आवडती वाद्ये. हवाई बेटांतील हुला नावाचे आदिम नृत्य उल्लेखनीय आहे. त्याला राष्ट्रीय नृत्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

संदर्भ : 1. Asian Research Service, Asian Profile, February, 1974, Hong Kong.

   2. Buhlers, A. Art of the South Sea Islands, London, 1960.

   3. Goldman, I. Ancient Polynesian Society, New York, 1970.

   4. Grosvenor, M. B. Ed. National Geographic, December, 1974, Washington.

   5. Sugggs, R. C. Marquesan Sexual Behavior, New York, 1965.

देशपांडे, सु. र.