बावचा : भारतातील गुजरात राज्यातील एक आदिवासी जमात. त्यांना काही भागांत बावचा तर काही भागांत बामचाम्हणतात. त्यांची वस्ती मुख्यत्वे अहमदाबाद व बडोदे जिल्ह्यांतील शहरी भागांत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतही त्यांची थोडी वस्ती आहे. महाराष्ट्रात १९७१ मध्ये फक्त ९५ बावचा होते. भारतात या जमातीची संख्या सुमारे तीन हजार (१९७१) होती. गुजरातमधील बावचा गुजराती बोलतात तर महाराष्ट्रात त्यांची भाषा मराठी आहे. हे लोक निरनिराळ्या छावण्यांतून, वसाहतींतून झाडूकाम करणारे, गवत कापणारे व गवताचे झाडू तयार करणारे म्हणून पूर्वी ओळखले जात. ते स्वत:ला मूळचे ‘वाणी’ असल्याचे समजतात. त्यांच्या पूर्वजांनी वाणी वर्णाला त्याज्य असणारी ‘शिरी किंवा कांडोडीची फुले’ व विशिष्ट प्रकारचा भाजीपाला खाल्ल्यामुळे वाणी लोकांनी त्यांना खालचा सामाजिक दर्जा दिला, असे सांगितले जाते.

उद्योगधंद्याच्या निमित्ताने ते स्थलांतरित झाले. त्यांचा मुख्य धंदा रस्ते, इमारती इत्यादींच्या बांधकामावर मजुरी व सफाई काम हा आहे. हे लोक धेड, भंगी व मुसलमान यांच्या हातचे अन्न खात नसत.

या जमातीत गट किंवा उपजाती नाहीत. त्यांच्यात चौधरी, गावीत, मकवाना, देसाई, महिदा इ. आडनावे आढळतात. बहिर्विवाही वा अंतर्विवाही असे कोणतेच विवक्षित गट वा कुळी त्यांच्यात नाहीत. तसेच आतेमामे भावंडांतील विवाह निषिद्ध समजतात. जवळच्या नात्यात लग्ने होत नाहीत. वयाच्या ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान मुलामुलींची लग्ने होतात. मुलाच्या वडलांना मुलीसाठी मागणी घालावी लागते. वधूमूल्याची प्रथा असून पूर्वी २२ रुपये वधूमूल्य देत पण सद्य: स्थितीत आर्थिक परिस्थितीनुसार वधूमूल्य दिले जाते. लहान मेहुणीशी लग्न करण्याची व बहुपत्नीत्वाची प्रथा रूढ आहे. घटस्फोट, विधवाविवाह, पुनर्विवाह व घरजावई या प्रथाही प्रचलित आहेत. पंचामार्फत घटस्फोट घेतला जातो. लग्ने बहुधा रविवारी होतात. जमातीतील कोतवालामार्फत लग्नविधी पार पाडला जातो.

हिंदू धर्माचा त्यांच्यावर प्रभाव असून ते हिंदू देवदेवतांची पूजा करतात. ते ‘बालसुंद्री पंथाचे’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्यात लग्नापूर्वी कालीमातेची पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू देवतांशिवाय वाघदेव आणि काकाबलिया ह्या आदिवासी दैवतांचीही ते पूजा करतात. दिवाळी, होळी, दसरा, पोळा हे हिंदूंचे सण ते साजरे करतात. दसऱ्याच्या दिवशी काकाबलिया देवीसमोर बोकड कापतात आणि त्याचे मांस सर्व जमातीत वाटतात. साथीचे रोग आल्यास ते काकाबलिया देवाची पूजा करतात. त्यांच्यात भगत नसल्यामुळे त्यांचे सर्व धार्मिक विधी कोतवाल करतो.

मृताला ते जाळतात. तिसऱ्या दिवशी जमातीला दुखवट्याचे जेवण देतात. त्यांच्यामध्ये श्राद्ध करण्याची प्रथा नाही.

गारे, गोविंद