येरुकुल : दक्षिण भारतातील एक आदिम भटकी जमात. तिची वस्ती आंध्र (गोदावरी, गुंतूर, कृष्णा व कुर्नूल जिल्हे), तमिळनाडू (द. व उ. अर्काट जिल्हा) व कर्नाटक (म्हैसूर जिल्हा) या राज्यांतून आढळते. त्यांची लोकसंख्या १,६२,५६० होती (१९७१). यांना एरुकल, येरकूल किंवा येरकल असेही म्हणतात. ‘एरुक’ या शब्दाचा अर्थ मंत्र घालणे वा भविष्य कथन करणे, असा असून या जमातीतील स्त्रिया हाच व्यवसाय करतात, म्हणून हे नाव त्यांना प्राप्त झाले. तमिळनाडूत त्यांना कोरचा किंवा कोरछा म्हणतात. या जमातीचे उरू, उप्पू व डब्ब असे तीन मुख्य भेद आहेत. उरू खेड्यात राहून शेती करतात उप्पू फिरस्त्याचा धंदा करतात आणि डब्ब डोंगराच्या पायथ्याशी राहून बांबूपासून चटया, टोपल्या वगैरे विणतात. त्यांची बोली तमिळ, तेलुगु व कन्नड या तीन भाषांचे मिश्रण होऊन झाली आहे.

त्यांचे कुचपुरी, परिगमुग्गुल, कूट, उण्णू, करेपकू, वूर, येद्दू, दब्ब, यीथपुल्लाल व भर्जथरी असे दहा विभाग आहेत. यात चार कुळी आहेत : सथपती, मनपथी, कवती व मंद्रगुती. असगोत्रीय विवाह प्रथेमुळे कुळींत एकमेकांत विवाह होतात.

पूर्वी गुन्हेगार जमात म्हणून यांची नोंद झाल्यामुळे यांपैकी बहुसंख्य भटके असून घरफोडी करीत. नागरीकरणामुळे त्यांपैकी अनेक शेती करतात आणि टोपल्या, चटया वा दोर विणतात व विकतात. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतर नेसतात, तर स्त्रिया चोळी व साडी नेसतात. स्त्रियांना अलंकारांची हौस असून रंगीबेरंगी मण्यांच्या माळा त्या गळ्यात घालतात. सर्व येरुकुल मांसाहारी असून मांजर, कोंबडी, डुक्कर, मेंढी यांचे मांस खातात.

वयात आल्यानंतर विवाह करतात. लग्नविधीत मामाचा हक्क अग्रहक्क समजला जातो. लग्न ओली अगर रुकी म्हणजे मुलीचे देज देऊन होते. ताली बांधून अक्षता टाकल्या की लग्नविधी संपतो. नंतर पुरुष भरपूर दारू पितात.

मिशनऱ्यांमुळे यांपैकी काहींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे तथापि इतर सर्व हिंदू धर्मीय आहेत. तिरुपतीचा व्यंकटेश व लक्ष्मी ही त्यांची प्रमुख दैवते. याशिवाय ते शुभ शकुन पाहतात आणि त्यासाठी देवीची पूजा करतात.

संदर्भ : 1. Government Of Andhra Pradesh, The Schedules Tribes in Andhra Pradesh, Hyderabad, 1963.

2. Iyer, L. A. Krishna, Social History of Keral, Vol. Ⅰ, Madras, 1968.

भागवत, दुर्गा