गौडलू : (गौदलू). उरिवदन गौडलू, कादू गौडलू अगर गौडलू ही जमात कर्नाटक राज्यात व केरळ राज्यातील मुख्यतः कोझिकोडे या जिल्ह्यात आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार कर्नाटक राज्यात यांची  लोकसंख्या ४,१६६ होती. केरळात त्यांची वस्ती सु. ३०० असावी असा अंदाज आहे. केरळमध्ये ‘उरिवदन’ हे नाव ‘उरुंदुवन्नवार’ याचा अपभ्रंश असून त्याचा अर्थ, जे लोक बाहेरून आत गडगडत आले ते, असा होतो. टिपू सुलतानाने स्वारी केली, तेव्हा गौडलू म्हैसूरातून केरळात आले असे म्हणतात. गौडलू या नावाचा उगम गौवा म्हणजे धनगर यापासून झाला आहे असे मानतात. म्हशी पाळणाऱ्या  काचा गुलिगरांच्या चालीरीतींशी गौडलू संस्कृतीचे बरेच साम्य आहे. आपण श्रीकृष्णाच्या इद्यन वंशातील आहोत, असा त्यांचा दावा आहे.

गौडलूंच्या चौदा कुळी आहेत. त्यांपैकी काही कुळींना प्राण्यांची नावे असल्याने, त्या गणचिन्हवादी असाव्यात जसे मॉयरो (मोर), नागासिरो (नाग) व कोचिमो (कासव). अहलिया संथाना (मातृवंशी) गटाचे लोक मक्कळ संथाना (पितृवंशी) गटाच्या लोकांशी विवाहसंबंध करीत नाहीत.

गौडलू कन्नडची अपभ्रष्ट बोली बोलतात. मुले आईला ‘अव्वा’ म्हणतात. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ते गुरे-ढोरे, कोंबड्या व डुकरे पाळतात व बांबू विकतात. स्त्रिया बांबूच्या चटया विणतात. त्यांचे मुख्य अन्न रागी असते. पिकवलेला सर्व तांदूळ ते विकतात.

गौडलूंची वस्ती पाच ते सात झोपड्यांची असते. झोपड्यांना ते डेर असे म्हणतात. एका झोपडीत तीन खोल्या असतात. त्यांपैकी एक स्वयंपाकघर असते. एका कोपऱ्यात देवघर असते. ते हिंदूंप्रमाणे शिव, विष्णू व मरिअम्मा यांची पूजा करतात. चिक्कु देवी व पुलपल्ली देवी या त्यांच्या आवडत्या देवता. त्यांचा प्रमुख मुखिया अज्जैयी गौडलू कर्नाटक राज्यात करनवरला राहतो, असे ते म्हणतात.

वयात आल्यावर विवाह होतात. विवाहात वधूमूल्य देतात. विवाहाचे पौरोहित्य ब्राह्मण करतो. वधू गळ्यात ताली बांधते. मुलाचे नाव तिसऱ्या, नवव्या किंवा बाराव्या दिवशी ठेवतात. कान तिसऱ्या वर्षी टोचतात. ऋतुप्राप्ती, मासिकपाळी व प्रसूतीच्या वेळी स्त्रीस स्वतंत्र झोपडीत ठेवतात. बाळंतिणीस साठ दिवस अलग ठेवले जाते व तिला त्या काळात स्वयंपाक करण्याची मनाई असते.

मृताला स्नान घालून तेल किंवा चंदनाचा लेप लावून दक्षिणोत्तर पुरतात. कुटुंबात तीन दिवस काम करीत नाहीत. सुतक सोळा दिवस पाळतात.

भागवत, दुर्गा