सुगाळी-लंबाडी : आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रमुख आदिम जमात. तिचा लंबाडी-सुगाळी या जोड नावाने सर्वत्र निर्देश आढळतो. त्यांची एकत्र लोकसंख्या ११,५८,३४२ (१९८१) होती. सुगाली, बंजारी, बंजारा, बृंजरा, सुकाळी, बोईपारी, लमाण, लंबाडी वगैरे नावानी ती प्रदेशपरत्वे ओळखली जाते तथापि लंबाडी-सुगाळी किंवा सुगाळी-लंबाडी या नावाने ती अधिक परिचित आहे. आंध्र प्रदेशात त्यांची वसती प्रामुख्याने कुर्नूल, अनंतपूर, चित्तूर, गुंतूर, कृष्णा, हैदराबाद आदी जिल्ह्यांत आहे. हैदराबाद व चेन्नई (तमिळनाडू) या जिल्ह्यांत त्यांना लंबाडी म्हणतात. ही जमात मुख्यत्वे पशुपालक असून काही जण शेती करतात पण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ४७·५२ टक्के सुगाळी कामकरी किंवा मजूर होते (१९८१).

सुगाळी : बहुतेक सुगाळी मांसाहारी असूनही डुक्कर व गोमांस खात नाहीत. त्यांचे मुख्य अन्न भात व रागी आहे. ते इंडो-आर्यन भाषाकुळातील बंजारा किंवा लमाणी बोली भाषा वापरतात पण व्यवहारात तेलुगू-तमिळ भाषेचा अधिक वापर करतात. सुगाळी मुडेवनी, बनोथ, वर्थे व बुक्के अशा चार बहिर्विवाही कुळींत ते विभागलेले असून, सपिंड विवाहास जमातीत मान्यता आहे. मुले-मुली वयात आल्यानंतर लग्नविधी होतो. वधुमूल्य (ओली) रोख रकमेत देतात. लग्नानंतर मुलीच्या गळ्यात ताळी (मंगळसूत्र) आणि पायात मेट्टी (जोडवी) हे सौभाग्य अलंकार घालतात. लग्नानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी नांदण्यास जाते. घटस्फोट व पुनर्विवाह प्रचलित आहे मात्र त्यास कुलपंचायतीची संमती आवश्यक असते. पुनर्विवाह मेहुणीशी चालतो, पण देवरविवाहास प्रतिबंध आहे. समाजात एकत्र कुटुंबपद्घती असून सर्व मुलांना संपत्तीत सारखा हिस्सा मिळतो. काही कुटुंबांत मुलींनाही हिस्सा दिला जातो. ज्येष्ठ मुलगा हा पित्याच्या पश्चात कुटुंबप्रमुख होतो. नवजात अर्भकाचे सोयर नऊ दिवस पाळतात. नामकरण (वर्नम) विधी पंधराव्या दिवशी साजरा करतात. मृतास शक्यतो जाळतात. सुतक तीन दिवस पाळतात. बहुतेक सुगाळी पशुपालन व शेती करीत असले, तरी काहींनी अलीकडे किरकोळ व्यवसाय सुरू केले आहेत. वरिष्ठांची कुलपंचायत सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी बांधील असून तंटेबखेडे सोडविते. सुगाळी हे मूलतः हिंदू धर्मीय असून, ते हिंदूंचे सण साजरे करतात. शिवाय जमातीच्या देवांनाही भजतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी जनावरांचा बळी देतात. अलीकडे नागरीकरणामुळे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार झाला असून काही शिक्षक, अभियंते, वैद्य वगैरे झाले आहेत. त्यामुळे कुटुंबनियोजनासारखे उपक्रम यशस्वी होत आहेत. शिवाय ग्रामीण विकास योजनांचा लाभही ते घेत आहेत.

लंबाडी : लंबाडी हा शब्द लमाण किंवा लाभन यांपासून उत्पन्न झाला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. बंजारा या प्रमुख समूहाचा तो एक विभाग असून, त्याची नोंद आंध्र प्रदेशात आदिम सुगाळींसमवेत करण्यात आली आहे. ते द्वैभाषिक (लंबानी व तेलुगू) असून तेलुगू लिपीच वापरतात. ते उत्तरेकडून दक्षिण भारतात मोगल काळात स्थलांतरित झाले असावेत.

लंबाडींचा परंपरागत व्यवसाय पशुपालन असूनही त्यांच्यापैकी काही गावोगावी फिरून माल विकतात. या मालांत मुख्यत्वे मीठ व अन्य किरकोळ वस्तू असतात. शिवाय ते शेतीही करतात. १९८१ च्या जनगणनेनुसार त्यांच्यापैकी ४७·५२ टक्के लोक मजुरी करीत होते. त्यांच्या स्त्रिया सर्व आर्थिक व्यवहारांत आणि त्याबरोबरच सामाजिक व धार्मिक विधींत पुढाकार घेतात. लंबाडी स्त्रिया भौमितिक आकृतिबंधाचे रंगीबेरंगी कपडे तयार करून त्यांना लहान आरशांनी अलंकृत करतात. याशिवाय त्या भरतकामात तरबेज असून कवडी, नाणी, मणी यांचा वापर भरतकामात करतात. स्त्रिया घंटेच्या आकाराची जाड व लांब कर्णभूषणे वापरतात आणि मनगटापासून कोपरापर्यंत मनगटभर विविध प्रकारची कंकणे घालतात. कमरेला चांदीचा सैल कमरपट्टा बांधतात. त्यांची कुटुंबसंस्था पितृसत्ताक असून राठोड, रामहाव, चौहान व दत्य या चार कुळींत विभागलेली आहे. सपिंड विवाह प्रचलित असून, मुले-मुली वयात आल्यानंतरच विवाह होतात. साधारणतः ठरवून लग्न होते परंतु साटेलोटे पद्घतीने किंवा क्वचित पळवून नेऊन लग्न करतात. लग्नसोहळा मुलीच्या घरी संपन्न होतो आणि बरेच दिवस चालतो. वधूमूल्याची प्रथा असून घटस्फोट व पुनर्विवाहास मान्यता आहे परंतु ती कुलपंचायत व ग्रामसभा ठरविते. वडिलोपार्जित संपत्तीत सर्व मुलांचा सारखा हिस्सा असतो. नामकरणापेक्षा जावळ काढणे या विधीस त्यांच्यात अधिक महत्त्व आहे. मृतास ते जाळतात पण अविवाहित वा रोगराईने मृत्यू आलेल्या व्यक्तीस पुरतात. तेराव्या दिवशी श्राद्घ करतात आणि त्या दिवशी बोकडाचा बळी देऊन सर्वांना जेवण घालतात. १९८१ च्या जनगणनेनुसार सुगाळी-लंबाडींमधील ९९·८० टक्के लोक हिंदू धर्मीय होते. ते त्यांचेच सण व देवदेवता भजतात. ‘कार हन्निमे’ म्हणजे पोळा या सणाला ते बैलांची पूजा करतात. त्यांच्या देवदेवतांत तिरूपतीचा वेंकटेश्वर व हाथिरामजी यांना विशेष स्थान आहे. जादूटोणा व भूतपिशाच्च यांवर त्यांचा विश्वास असून, बाधा काढण्यासाठी मंत्रतंत्राचा देवऋषींकडून प्रयत्न करतात. ग्रामसभा सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवते. तिच्या प्रमुखास नाईक म्हणतात. लंबाडींमध्ये फारसा शिक्षणप्रसार झाला नाही, त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे.

पहा : बंजारा लमाण संसी.

संदर्भ : 1. Bhavani, Enakshi, Folk and Tribal Designs of India, Bombay,1974,

2. Singh, K. S. People of India : The Scheduled Tribes, Vol. 3. Delhi,1994.

3. Thurston, E. Castes and Tribes of Southern India, Delhi, 1975.

भागवत, दुर्गा