जमातिया : त्रिपुरा राज्यातील एक जमात. जमातियांची लोकसंख्या २४,३५९ (१९६१) होती. टिपेरा या जमातीची जमातिया ही एक उपशाखा आहे, असे रिझ्ली हा मानवशास्त्रज्ञ म्हणतो. यांच्यात मंगोलियन वंशसाम्य आहे. टिपेरा आपल्या जमातीत लुशाई, माघ व हिंदूंना समाविष्ट करून घेतात. यांचा धर्म हिंदू आहे. ते काली देवीला पूजतात. ते सत्यनारायणाचीही पूजा करतात.

माणूस मेला की लगेच प्रेत घरातून अंगणात हलवतात आणि कोंबड्याचा बळी देतात. मृताला ते जाळतात.

यांच्यात धार्मिक विधी करण्यास ब्राह्मण लागत नाही. औछाईला अथवा मांत्रिकाला बोलावून ते सारे विधी करतात.

लग्नविधी असा फारसा नसतोच. डुकराचा बळी देवतेला देतात. मुलीची आई मुलीला मद्याचा पेला देते. तो घेऊन मुलगी वराच्या मांडीवर जाऊन बसते आणि अर्धे मद्य आपण पिते व उरलेले त्याला देते. रात्री वराला वधूच्या खोलीत चोरून प्रवेश करावा लागतो आणि पहाटेच तिथून निघून जावे लागते. मग तो चार दिवस तेथे येत नाही. चौथ्या दिवशी तो बरीच मंडळी घेऊन येतो व मोठ्या समारंभाने मेजवानी पार पडते.

जमातियातील जमात पंचायत व ग्रामपंचायत अजून संघटित आहेत व आपली कार्ये बजावितात.

भागवत, दुर्गा