हैदा : (हायडा) . उत्तर अमेरिकेतील एक कलाभिज्ञ इंडियन जमात. लोकसंख्या सु. २०,००० होती (२०११). त्यांची वस्ती प्रामुख्याने क्वीन शार्लट बेटे, ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्कातील प्रिन्स ऑफ वेल्स बेटाचा दक्षिण भाग यांतून आढळते. अलास्कात त्यांना कैगानी म्हणतात. क्वान पेरेझ या समन्वेषकाने १७७४ मध्ये या प्रदेशाला भेट दिली. तो त्यांचे वर्णन रुंद चेहऱ्याचे, घाऱ्या डोळ्यांचे, दाट काळे केस असलेले गहूवर्णीय असे करतो. सद्यःस्थितीत हैदा आरक्षित भागात राहतात आणि त्यांपैकी बहुसंख्य मत्स्योद्योगात काम करतात. तसेच पर्यटकांसाठी कोरीव वस्तूही ते तयार करतात. काही हैदा बटाटा आणि भाजीपाला ही पिके काढतात. पूर्वी ते सहा बोलीभाषा वापरीत असत तथापि त्यांपैकी स्किडेगेट व मॅसेट या दोनच बोली अवशिष्ट आहेत. 

 

गोऱ्या लोकांच्या संपर्कात व प्रभावाखाली येण्यापूर्वी हैदा लोक शरीर व चेहरा गोंदवून घेत असत आणि शंखशिंपले, हाडे, तांबे आणि लाकूड यांपासून बनविलेले अलंकार कानांत, नाकात तसेच ओठांत घालीत. उन्हाळ्यात फार कमी कपडे वापरीत. किंबहुना अर्धनग्न असत मात्र हिवाळ्यात सिडार लाकडांच्या सालीपासून बनविलेले जलरोधी चुणीदार वस्त्रे नेसत. तसेच सिडारच्या सालीपासून बनविलेले शंक्वाकार शिरस्त्राण (हॅट) वापरीत. विशेष समारंभप्रसंगी त्यांनी मढविलेले शर्ट, झगे, चिल्कट ब्लँकेट्स वापरीत असत. शिवाय रंगविलेले व कलाकुसरयुक्त मुखवटे धारण करीत. समुद्रातून मिळणारे विविध प्रकारचे मासे हे त्यांचे मुख्य अन्न असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. विशेषतः ते सील, सॅमन, हॅलिबट व इतर प्रकारचे मासे पकडीत. स्त्रिया ते वाळवून हिवाळ्यासाठी साठवून ठेवीत. याशिवाय स्त्रिया शेलफिश, समुद्रतृण, कंदमुळे, मृदुफळे गोळा करीत. ती वाळवून-कुटून त्यांची भाकरी बनविण्यासाठी साठवण करीत. तंबाखू हे पीकही हैदा घेत. त्यावर लिंबूरस टाकून ते चघळीत असत. हैदा हे हुशार व्यापारी असून मासे, चटया, लोकर, लाकडी होडीसाठी लागणारे लाकूड, कॉपर, गुलाम आणि ब्लँकेट्स इत्यादींचा व्यापार करीत. 

 

हैदा हे कुशल सुतार असून बोटी बांधीत व लाकडावर कोरीव काम करीत. उन्हाळ्यात, विशेषतः मासेमारीच्या हंगामात, त्यांची वस्ती सीडार चटईवर किंवा स्तंभावर बांधलेल्या माचीवर असे मात्र कायमची वस्ती समुद्रकिनाऱ्यावर खेडेवजा गावांतून असे. त्यांची घरे साधारणतः१२.२ मी. उंचीवर, ९.१ मी. रुंदीची असून स्तंभांवर लाकडी चौकटीवर बांधलेली असत. ती भरीव स्तंभांवर लाकडी फळ्यांच्या भिंतींनी बंदिस्त केलेली असत. त्यापुढे देवकस्तंभ असून त्यात प्रवेशद्वार खोदलेले असे. असे देवकस्तंभ खेड्यांतून सर्वत्र विखुरलेले असत. घरात वाळूमिश्रित मातीची जमीन असून मध्यभागी अन्न शिजविले जाई. एकसंध सीडार या वृक्षाच्या ओंडक्यातून बुंधा कोरून होडी तयार केली जाई. सांप्रत यांपैकी कोणतीच घरे अवशिष्ट नाहीत. 

 

हैदांमध्ये मातृसत्ताक बहिर्विवाही अर्धके (रॅव्हन आणि ईगल) असून त्यानुसार विवाह ठरतात. प्रत्येक अर्धकात काही कुळी असून त्या स्वतंत्र खेड्यात राहतात. प्रत्येक कुळीत त्या घरचा मालक, त्याच्या बायका, तरुण मुलेमुली, विवाहित मुली, त्यांची कुटुंबे, इतर नातेवाईक आणि गुलाम असत. कुळीचा प्रमुख हा श्रीमंत, रुबाबदार व प्रतिष्ठित असे. त्यांच्यात पराक्रमापेक्षा आर्थिक सुबत्तेला महत्त्व होते. बायकांची संख्या श्रीमंतीवर ठरे. पहिली पत्नी प्रमुख असे. मुलांत लहानमोठा भेद नसे. वृद्धांना जमातीत मान असून गुलामांची अन्य जमातींतून व युद्धांतून खरेदी केली जाई. 

 

अमेरिकेच्या आदिवासी जगतात हैदांची कला उच्च प्रतीची असून त्यांच्या चित्रकलेत, कोरीव कामात, गोंदण कलेत आणि विणकामात मासे, विविध प्राणी, सामुद्रिक जीवनातील काल्पनिक देवदेवता यांना विशेष स्थान होते. समुद्राचा त्यांच्या जीवनातील अविभाज्य सहभाग त्यांच्या धार्मिक समजुतीतून दृग्गोचर होतो. भरभरून मासे मिळावेत म्हणून ते समुद्राला तंबाखू, ओंगण, पशुपक्षी इत्यादी अर्पण करीत. 

 

संदर्भ : 1. Drew, Leslie, Haida : Their Art and Culture, Hancock, 1989.

            2. Gerber, Peter R. Indians of the Northwest Coast, New York, 1989. 

देशपांडे, सु. र.