भुईया : भारतातील एक आदिवासी जमात. मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये भुईयांची वस्ती विशेषत्वाने आढळते. त्यांची लोकसंख्या १,८८,२१२ (१९७१) होती.

सामाजिक चालीरीती व सांस्कृतिक धाटणीवरून मुंडा आदिवासी जमातीशी भुईया जवळचे वाटतात. फिकट तपकिरी वर्ण, कुरळे केस, मध्यम उंची, रुंद नाक, जाड ओठ, बांधेसूद शरीरयष्टी आणि सर्वांगावर भरपूर केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत.

पुरुष व स्त्रियांचा पोषाख साधा असून पुरुष कमरेभोवती लुंगीसारखे कापड गुंडाळतात व ते खांद्यांना बांधतात तर स्त्रिया पायघोळ झगा घालतात व त्यावर ओढणी घेतात. मुख्यत्वे डोंगराळ भागात यांची वस्ती असते. डोंगराच्या उतारावर ३०-४० घरांचे त्यांचे गाव असून ते दर दहा-बारा वर्षांनी वस्तीची जागा बदलतात. वस्तीच्या मध्यभागी तरुण मुलामुलींसाठी स्वतंत्र युवागृहे बांधतात. मनोरंजन, पाहुण्यांची व्यवस्था, प्रौढ मंडळींची बैठक व इतर वेळी तरुणांची शयनव्यवस्था ही युवागृहाची काही प्रमुख उद्दिष्ट्ये होत.

युवागृहाच्या एका बाजूला लाकडाच्या वास्तूत गावदेवीची प्रतिष्ठापना करतात. नैसर्गिक आपत्तीमुळे विशेषतः वादळामुळे किंवा तत्सम कारणामुळे या देववास्तूची मोडतोड झाल्यास अशुभ मानतात आणि तत्काळ वस्तीची जागा बदलतात. गावप्रमुखाची घरे गावदेवीजवळच असतात. दासुमपाट, बामोनीपाट, कोइसरपाट व बोराम ही त्यांची मुख्य दैवते होत. भुईया जडप्राणवादी असून निसर्गपूजा आणि भुताखेतांवर त्यांचा विश्वास आहे.

शिकार, मासेमारी व अन्नसंकलन हे यांचे प्रमुख व्यवसाय असून ते कोंबड्या व जनावरे पाळतात. तुरळक प्रमाणात बदलती शेतीही करतात पण नांगराचा वापर करीत नाहीत. स्त्रिया उद्योगी असतात. घरकाम, चटया विणणे व शेतीकामात पुरुषांना मदत करणे, ही त्यांची प्रमुख कामे होत. शेती, शिकार व मासेमारी हे उद्योगधंदे मुख्यत्वे पुरुष करतात. भुईयांत विभक्त पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून वारसापद्धती आधिमान्य आहे.

एकाच गावातील तरुण-तरुणींचे विवाह भुईया त्याज्य मानतात. गावात वंशपारंपरिक पद्धतीनुसार धार्मिक कामासाठी व इतर कामासाठी असे दोन मुख्याधिकारी असतात. त्यांना देओरी म्हणतात. तीन ते बारा गावांच्या संघटनेस बार संघटना म्हणतात. गावचे दोन्ही मुख्याधिकारी या संघटनांचे सभासद असतात. बहिष्कृत व्यक्तींचे विधिपूर्वक शुद्धीकरण करणे हे त्यांचे प्रमुख कार्य होय.

संदर्भ : 1. Bahadur. K. P. Caste, Tribe and Culture of India : Vol. III, Bengal, Bihar and Orissa, Delhi, 1977.

2. Dalton, E. T. Tribal History of Eastern India, New Delhi, 1978.

मांडके, म. बा.