बोर्डी : महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील इतिहासप्रसिद्ध गाव. लोकसंख्या ७,००० (१९८१ अंदाजे). हे महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेलगत असून मुंबईच्या उत्तरेस सु. १२० किमी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून पूर्वेस सह्याद्रीच्या डोंगररांगांचा निसर्गरम्य परिसर आहे. बोर्डी हे जिल्ह्यातील आरोग्यदायक हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत हे गाव अग्रेसर होते. अनेक भूमिगत स्वातंत्र्यवीरांनी या गावाचा आश्रय घेतला होता. या गावात सु. ९५ स्वातंत्र्यसैनिक झाले. १९३० सालापासून येथे गांधी आश्रमाद्वारे राष्ट्रीय शिक्षण देण्याची परंपरा चालू आहे. म. गांधींच्या सूचनेनुसार ⇨ताराबाई मोडक यांनी येथे ग्राम-बालशिक्षण संस्थेची स्थापना केली (१९४५). आसपासच्या आदिवासी बालकांच्या शिक्षणाकरिता व विकासासाठी ताराबाईंनी बोर्डीजवळील ८ किमी. अंतरावरील कोसबाड येथे एक ‘विकासवाडी’चा उपक्रम सुरू केला (१९५६). श्रीमती अनुताई वाघ यांनी हे कार्य पुढे चालविले आहे. बोर्डी येथे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तांत्रिक शिक्षणाच्या सोयी आहेत. प्राथमिक शाळेत ८०० आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखांमध्ये १,५०० विद्यार्थी शिक्षण घेतात (१९८१). येथे स्वावलंबनाचे व शिस्तीचे शिक्षण देणारे शारदाश्रम वसतिगृह असून जैन, पारशी, मुस्लिम व आदिवासी विद्यार्थ्यांचीही वसतिगृहे आहेत. गावात ग्रामपंचायत असून डाक-तार कार्यालय, दूरध्वनी, बँक, बससेवा इत्यादींची सोय आहे. यांशिवाय जवळच समुद्रकिनाऱ्यावर शासकीय विश्रामधाम व पारशी लोकांचे आरोग्यधाम आहे. बोर्डीत १९५९ साली अखिल भारतीय आदिमजाती सेवक संघाचे अधिवेशन भरले होते.

येथील शेती प्रगत असून आसमंतात चिकू, केळी, नारळाच्या बागा आहेत. घोलवडचे व बोर्डीचे चिकू महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. येथून चिकू, केळी, नारळ ही फळे, लिली व गुलाबाची फुले तसेच भाजीपाला मुंबईला पाठविला जातो. बोर्डीच्या आदिवासी भागात कोसबाड येथे ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’ची कृषिसंस्था आहे. या संस्थेमार्फत या भागात कृषिसंशोधन, कृषिविस्तार व आधुनिक कृषितंत्राचा प्रसार असे कार्य चालते. संस्थेचे विद्यमान संचालक, महाराष्ट्र शासनाचे फलोद्यानविषयक सल्लागार तसेच १९७९ चे ‘जमनालाल बजाज पारितोषिक’ विजेते डॉ. जयंतराव पाटील हे मूळचे बोर्डीचेच.

कापडी सुलभा संकपाळ, ज. बा.