बॅलीॲरिक बेटे : (ईझ्लास बालीआरस). पश्चिम भूमध्य समुद्रातील स्पेनच्या आधिपत्याखाली द्वीपसमूह. क्षेत्रफळ ५,०१४ चौ. कि. मी. लोकसंख्या ६,२१,९२५ (१९७६). ही बेटे स्पेनच्या पूर्व किनाऱ्यापासून ८० ते ३०० किमी. वर ३८° ४०’ उ. ते ४०° ६’उ.अक्षांश व १° २२’ पू. ते ४° २५’ पू. रेखांश यांदरम्यान पसरलेली आहेत. या बेटांचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील (पाइन बेटे) असे दोन भाग पडतात. पूर्वेकडील समूहात माजॉर्का, मिनॉर्का व काव्ह्‍रेरा आणि पश्चिमेकडील समूहात ईव्हीथा, फॉर्मेंतेरा इ. बेटे मोडतात. माजॉर्का बेटावरील पाल्मा (लोकसंख्या २,३४,०९८–१९७०) ही यांची राजधानी आहे.

भूवर्णन : ही बेटे सु. ३२० किमी. परिसरात पसरलेली आहेत. त्यांचा पठारी भूप्रदेश म्हणजे स्पेनमधील अँडलूझियन विभागातील पर्वतांचाच विस्तार होय. माजॉर्का हे बेट सर्वांत मोठे आहे. त्यावर ६०० मी. पेक्षा जास्त उंचीची शिखरे असून तॉरेल्यास किंवा पूच माईऑर (१,४४३ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. यात यात आढळणारे चुनखडक हे तृतीयक व जुरासिक काळातील आहेत. तसेच या बेटावरील रांडा पठारावर (५०० मी. उंच) मायोसीन काळातील चुनखडक आढळतात. या बेटांवर ऊर्मिल टेकड्याही आढळतात. पर्वत-निर्माणकारी हालचालींचा परिणाम या बेटांवर झालेला आढळून येतो. बेटांचे हवामान सामान्यतः भूमध्य सामुद्रिक प्रकारचे आहे. मिनॉर्का बेटावर उन्हाळी वाऱ्‍यांचा प्रभाव सर्वांत जास्त असून वार्षिक सरासरी पर्जन्य ६३.५ सेंमी. आहे. या बेटांवरील उन्हाळ्याचे सरासरी तापमान २४° से. व हिवाळ्याचे सरासरी तपमान १०° से. असते. माजॉर्का बेटावर उत्तरेकडे थंड, तर इतरत्र उबदार हवामान आढळते. सर्व बेटांवर मे ते ऑगस्ट या काळात पाऊस नसतो. एकूण पावसाचे दिवस सु. ८० असतात. बर्फ मात्र क्वचितच पडते, पण जानेवारी ते मार्च या काळात अधूनमधून दहिवर पडते. माजॉर्का बेटावरील पर्वतावरील मात्र वसंत ऋतूपर्यंत बर्फ आढळते. येथे पाइन, ओक, अलेप्पो इ. वृक्षप्रकार जूनिपर, कण्हेर, मिर्टल इ. झुडुपे तसेच ऑलिव्ह, बदाम इ. फळझाडे आढळतात.

शेती व मासेमारी हे येथील प्रमुख व्यवसाय होत. गुरांची पैदसही केली जाते. टोमॅटो, बटाटे यांसारख्या पिकांचे व ऑलिव्ह, अंजीर, बदाम, जरदाळू इ. फळांचे उत्पादन होते. मासेमारीत अँकोव्ही व सार्डीन मासे महत्त्वाचे आहेत. ईव्हीथा बेट मीठ निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भरतकाम, सोनारकाम, मृत्पात्री, बुरूडकाम इ. पारंपारिक उद्योगांशिवाय सिमेंट, अन्नप्रक्रिया, लोकरी कापड, सुपर फॉस्फेट, ऑलिव्ह तेल, लोणी व चीज, मद्य-निर्मिती इ. आधुनिक उद्योगही विकसित झालेले आहेत. पर्यटन व्यवसायही विकसित होऊ लागलेला आहे. येथून मीठ, मासे, फळे, ऑलिव्ह तेल यांची निर्यात केली जाते.

बॅलीॲरिक बेटांच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. ८०% लोक माजॉर्का बेटावर राहत असून तेथील लोकसंख्येची घनता दर चौ. किंमी. २५८ आहे. शहरी भागात कॅटलॅन लोक बहुसंख्य असून ज्यू. इटालियन लोकही आढळतात. ग्रामीण भागात मूर, फिनिशियन, ग्रीक लोक आहेत. शहरांतून कॅस्टिलियन भाषा बोलली जाते. ग्रामीण भागात फ्रेंच व अरबी शब्दांचे मिश्रण असलेली कॅटलॅन ही बोलीभाषा प्रचलित आहे. सागरी वाहतू महत्त्वाची असून पाल्मा येथून येथून यूरेपातील मोठमोठ्या शहरांशी हवाई वाहतूक चालते.

या बेटांना पुरातन इतिहास आहे. प्रथम या बेटावर आयबेरियन लोकांची वस्ती होती. नंतर फिनिशियन, ग्रीक, कार्थेजियन लोक येथे आले. रोमनांनी ही बेटे इ.स. पू. १२३ मध्ये जिंकली. व्हँडाल लोकांच्या टोळ्यांनी इ. स. ४२३ मध्ये व बेलिसेरियसने इ.स. ५३४ मध्ये ही बेटे जिंकून बायझंटिन साम्राज्यास जोडली. मूर टोळ्यांनी ७९८ मध्ये ही बेटे जिंकली. पुढील ५०० वर्षे या बेटांवर त्यांचा ताबा होता. त्यांच्या अमदानीत शेतीत प्रगतीत झाली. अरगॉनचा पहिला जेम्स याने ही बेटे १२२९ ते १२३५ यांदरम्यान जिंकली. चौथा पेद्रो (कार. १३३६–१३८७) याने १३४५ मध्ये ॲरगॉनमध्ये ही बेटे सामील केली. १३४९ मध्ये ही बेटे सामील केली. १३४९ मध्ये ही बेटे स्पेनचा भाग बनली. अठराव्या शतकात दीर्घकाळ मिनॉर्का बेट ब्रिटिशांच्या ताब्यात होते स्पॅनिश यादवी युद्धाच्या काळात (१९३६–३८) राजनिष्ठ सैन्याने मिनॉर्का बेट ताब्यात घेतले होते, तर माजॉर्का, ईव्हीथा बेटांवर बंडखोरांचा ताबा होता. या बेटांना स्पॅनिश प्रांताचा दर्जा आहे.

डिसूझा, आ.रे. गाडे, ना. स.