मॉर्गन, कॉनवे लॉइड: (६ फेब्रुवारी१८५२–६ मार्च १९३६). इंग्रज मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व जीवशास्त्रज्ञ. जन्म लंडन येथे. रूढ नाव लॉइड मॉर्गन. सुरुवातीचे शिक्षण लंडनच्या ‘स्कूल ऑफ माइन्स’मध्ये परंतु नंतर प्रख्यात जीववैज्ञानिक टी. एच्. हक्स्लीचा प्रभाव पडून त्यांचे विद्यार्थी म्हणून ते जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ‘रॉयल कॉलेज ऑफ सायन्स’मध्ये गेले. शिक्षण संपल्यावर व दक्षिण आफ्रिकेत सहा वर्षे अध्यापन केल्यानंतर १८८४ मध्ये त्यांची ब्रिस्टल विद्यापीठाच्या महाविद्यालयात भूगर्भशास्त्राचे व प्राणिशास्त्राचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. तेथेच ते १८८७ मध्ये प्राचार्य व १९०९ मध्ये उपकुलगुरू झाले तथापि उपकुलगुरू झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी तेथील प्रशासकीय कामाचे त्यागपत्र दिले आणि मानसशास्त्र व नीतिशास्त्राच्या प्रमुख पदाचा स्वीकार केला. सेवानिवृत्तीपर्यंत (१९१९) ते ह्याच पदावर होते. ससेक्समधील हेस्टिंग्ज येथे ते निधन पावले.
प्राणि-मानसशास्त्राच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा त्यांनी विकास घडवून आणला. क्लार्क व हार्व्हर्ड विद्यापीठांतील त्यांच्या व्याख्यानांमुळे अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांना प्राणी वा तुलनात्मक मानसशास्त्राचे महत्त्व पटले आणि त्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. [→ तुलनात्मक मानसशास्त्र].
त्यांच्या मते मानवी वर्तनाची व हेतूंची अपेक्षा माणूस प्राणिवर्तनातही करीत असतो पण ते चूक आहे. त्यांनी प्रस्थापित केलेल्या ‘लाघव नियमा’मुळे (लॉ ऑफ पार्सिमनी) प्राण्यांच्या वर्तनावर एका वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश पडला. प्राण्यांच्या मनाबाबत निष्कर्ष काढताना त्यांच्यावर मानवारोप न करता प्रथम साध्या स्पष्टीकरणाचा स्वीकार करावयास हवा असे ते म्हणत. ॲनिमल लाइफ अँड इंटेलिजन्स (१८९०) आणि हॅबिट अँड इन्स्टिंक्ट (१८९६) ह्या त्यांच्या ग्रंथांत त्यांनी निसर्गाची समस्या हाताळलेली आहे. त्यांच्या मते आपल्या अर्जित सवयी, लामार्क किंवा डार्विन सूचित करतात त्याप्रमाणे कदापिही संक्रमित होऊ शकत नाहीत तसेच मानवी बुद्धीचा आनुवंशिकतेने विकास होतो हेही त्यांना मान्य नाही. त्यांच्या ॲनिमल बिहेविअर (१९००) मध्ये त्यांनी मधमाशा व मुंग्या यांच्या सहजप्रेरणांचे व सामूहिक वर्तनाचे विवेचन केलेले आहे.
तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व जीवशास्त्र या क्षेत्रांत त्यांच्या ‘उद्भवक्षम विकासवाद’ (इमर्जंट इव्होल्यूशन) सिद्धांताने मोठे वादळ उठविले. ते म्हणतात, की हीन अवस्थांतूनच उच्च अवस्थांचा उद्भव होतो. अनेक वेगवेगळे घटक कोणत्यातरी तऱ्हेने एकत्र येतात आणि त्यांतूनच नावीन्याची निर्मिती होते. बोधावस्थेचा उद्भवदेखील एखाद्या योजनेनुसार किंवा संकल्पनानुसार होत नाही, तर तो केवळ यदृच्छेनेच होतो.
प्राणिशास्त्र व भूगर्भशास्त्राचे ते प्राध्यापक होते आणि तीच दृष्टी घेऊन ते तुलनात्मक मानसशास्त्राकडे वळले. अँन इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह सायकॉलॉजी (१८९४) हा त्यांचा एतद्विषयक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. प्राणिमनाबाबत त्यांनी अगदी वाजवी दृष्टिकोन स्वीकारण्याचे हे एक प्रमुख कारण असावे, असे मानले जाते.
त्यांनी दिलेले ‘गिफोर्ड व्याख्याने’ इमर्जंट इव्होल्यूशन (१९२३) व लाइफ, माइंड अँड स्पिरीट (१९२६) या ग्रंथांमध्ये संगृहीत आहेत. त्यांचे इतर ग्रंथ माइंड ॲट द क्रॉसवेज (१९२९), द इमर्जन्सी ऑफ नॉव्हेल्टी (१९३३), हिस्टरी ऑफ सायकॉलॉजी इन ऑटोबायॉग्राफी (खंड २ रा, पृ. २३७–२६४, संपा. १९३२) इत्यादी.
तुलनात्मक मानसशास्त्राच्या घडणीत मॉर्गन यांचा महत्त्वाचा वाट आहे. ‘मॉर्गन कॅनन’ म्हणून ओळखला जाणारा ‘लाघव नियम’ त्यांनीच प्रवर्तित केला. जीवशास्त्र व भूगर्भशास्त्राच्या वैज्ञानिक दृष्टीतून त्यांनी मानसशास्त्राची विशेषतः मनाच्या विकासाची मांडणी केली. त्यांच्या मानसशास्त्रातील महत्त्वपूर्ण कार्यांमुळेच १८९९ मध्ये त्यांची ‘रॉयल सोसायटी’ चे फेलो म्हणून निवड करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ⇨
ई. एल्. थॉर्नडाइकवर त्यांचा प्रभाव पडला.
सुर्वे, भा. ग.
“