तार्द, गाब्रीएल : (१२ मार्च १८४३–१५ मे १९०४). एक नामवंत फ्रेंच सामाजिक विचारवंत. जन्म फ्रान्समध्ये सार्ला, दॉर्‌दॉन्या येथे. शिक्षण सार्ला, तूलूझ व पॅरिस येथे. पॅरिस येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर तो फ्रान्समध्ये प्रांतिक न्यायालयात न्यायाधिश होता. नंतर त्याने ‘ब्यूरो ऑफ क्रिमिनल स्टॅटिस्टिक्स’ चा संचालक म्हणून काम केले. १९०० मध्ये त्याची  ‘कॉलेज ऑफ फ्रान्स’–मध्ये आधुनिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि सेवानिवृत्त होईपर्यंत तो तेथेच होता. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

त्याच्या विचारांवर प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ हेगेल (१७७०–१८३१) याच्या विचारांचा प्रभाव होता. विश्वातील घटना स्थापना, प्रतिष्ठापना व संस्थापना अशा तीन प्रक्रियांनुसार दिसून येतात, अशी हेगेलची शिकवण होती. तार्दच्या मते पुनरावृत्ती, विरोध आणि समन्वय ह्या विश्वयंत्रणेतील तीन प्रधान प्रक्रिया होत. ह्या प्रक्रिया विश्वात सर्वत्र पण निरनिराळ्या स्वरूपात दिसून येत असतात. उदा., भौतिक क्षेत्रात पुनरावर्तनप्रक्रिया ही ध्वनिलहरींप्रमाणे कंपनांच्या स्वरूपात प्रगट होते, जीवयोनीमध्ये ती आनुवंशिकतेच्या स्वरूपात प्रगट होते, कारण आनुवंशिकतेमुळे एका पिढीच्या पोटी तत्समान अशी दुसरी पिढी जन्मास येते आणि सामाजिक जीवनात हीच पुनरावर्तनप्रक्रिया अनुकरणाच्या स्वरूपात अभिव्यक्त होत असते.

तार्दच्या मते समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते. क्वचित एखादी अलौकिक व्यक्ती नवनिर्मिती करून एखादा नवा विचार, नवा आचार, नवा संप्रदाय, नवी वर्तनपद्धती शोधून काढते. मग ह्या गोष्टी अनुकरणाने समाजात प्रसूत होतात आणि समाजजीवनात समान आचारविचार दृढमूल होऊन सारखेपणा आणि सुरळीतपणा येतो. या नवनिर्मितिमुळे प्रगती होते, तर अनुकरणामुळे समाजाला स्थैर्य प्राप्त होते. परंतु या नवनिर्मितीचा प्रसार होऊ लागला, की तिचा रूढ आचार–विचारांशी संघर्ष होतो आणि या संघर्षाची समाप्ती अखेर समन्वयात होते. समन्वय हाही एक प्रकारची नवनिर्मितीच असते. तिचाही सर्वत्र प्रसार होऊ लागला, की पुन्हा नवा संघर्ष निर्माण होतो आणि पुनश्च नवीन समन्वय घडून येतो. हा चक्रनेमिक्रम सतत चालू राहतो.

तार्दचे सर्वच लेखन फ्रेंचमध्ये आहे तथापि त्याच्या महत्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत. पुनरावर्तन, विरोध आणि समन्वय ह्या तीन विश्वव्यापी प्रक्रियांचे वर्णन तार्दने अनुक्रमे द लॉज ऑफ इमिटेशन (१८९०), युनिवर्सल ऑपझिशन (१८९७) आणि सोशल लॉजिक (१८९५)  या तीन स्वतंत्र ग्रंथात केले आहे. मानवी जीवनात युद्धाऐवजी वादविवाद आणि चर्चा यांच्या योगे संघर्षाची  भीषणता नष्ट करता येईल आणि समाजात शांततापूर्ण सहजीवन नांदविता येईल, असे त्याचे मत होते.

तार्दची विचारसरणी चिकित्सक होती. पूर्वग्रहांच्या किंवा अमूर्त सिद्धांतांच्या आहारी न जाता, मूर्त सामाजिक घटनांचे  अवलोकन व विश्लेषण करण्याकडे त्याची प्रवृत्ती होती. त्याच्या सामाजिक सिद्धांतांना मानसशास्त्रीय विश्लेषणाची बैठक होती व त्याच्या लिखाणाने आधुनिक सामाजिक मानसशास्त्राच्या उभारणीस हातभार लागला.

माणसाच्या व्यक्तिमत्वावर सामाजिक परिसराचे दूरगामी परिणाम होतात, अशी तार्दची भूमिका होती. गुन्हेगार मनुष्य हा जन्मतःच गुन्हेगार असतो, ही ⇨ चेझारे लोंब्रोसो (१८३६–१९०९) याची जीवशास्त्रीय उपपत्ती तार्दला मान्य नव्हती. गुन्हेगार हा सामाजिक परिस्थितीने घडविला जातो, असे तार्दचे म्हणणे होते.

तार्दचे इतर उल्लेखनीय ग्रंथ कंपॅरेटिव्ह क्रिमिनॅलिटी (१८८६), इकॉनॉमिक सायकॉलॉजी (२ खंड, १९०२) व पीनल फिलॉसॉफी (१९१२) हे होत.

संदर्भ : 1. Clark, T. N. Ed. Gabrief Tarde on Communication and Social Influence, Chicago, 1969.

   2. Davis, M. M. Psychological Interpretations of Society, New York, 1909.

केळशीकर, शं. हि.