मनोगति : (सायकोकायनेसिस –पी.के). मनोगती म्हणजे बाह्य भौतिक प्रक्रिया. बाह्य भौतिक परिस्थिती, अथवा वस्तू यांवर व्यक्तीचा स्नायुनिरपेक्ष रीत्या होणारा प्रभाव, अर्थात मनोदभव प्रभाव अथवा मनःकृत प्रभाव. केवळ संकल्पबलाने, इच्छाबलाने, प्रार्थनादींच्या योगे फासे-द्यूतात अनुकूल दान पडू शकते. तंतुवाद्ये कंपायमान होऊ शकतात. हवामानात बदल घडू शकतो. वनस्पती प्रभावित होऊ शकतात. प्राण्यांच्या व माणसांच्या शारीरिक व्याधी नष्ट होऊ शकतात, पदार्थाचे रूपांतर होऊ शकते. वस्तूंचे स्थलांतरण होऊ शकते वगैरे कल्पाना फार वर्षापासून सर्वत्र आढळतात. अशा प्रकारच्या घटनांचे उल्लेखही आढळतात.परंतु विज्ञानाच्या कसोटीत उतरेल अशा निरीक्षणाच्या अभावी असे वृत्तांत मनोगतीचा निर्णायक पुरावा म्हणून गणता येत नाहीत.

मरणोत्तर अस्तित्वविषयक संशोधनाच्या संदर्भात डी.डी. होम या विख्यात माध्यमाच्या (मीडिअम) बैठकी सर विल्यम क्रुक्स यांनी तसेच यूसेपिआ फ्लॅदिनो या माध्यम असलेल्या स्त्रीच्या बैठकी डॉ. चार्लस रीशे यांनी घेतल्या त्यावेळी टेबले, खुर्च्या व अन्य वस्तू गतिमान झाल्याचे या वैज्ञानिकांनी नमूद केलेले आहे. तथापि या व अशा प्रकारच्या इतर बैठकांच्या बाबतीत निरीक्षकांकडून अत्यंत सावधानता व जागरूकता बाळगण्यात आली नसेल ही शक्यता अगदीच बाजूस सारता येत नाही. कारण अशा भौतिक स्वरूपाच्या घटनांच्या बाबतीत अनुभवी निरीक्षकदेखील माध्यमांकडून बेमालूम रीत्या फसवले गेल्याची काही उदाहरणे आहेत.

मनोगतीविषयक प्रायोगिक संशोधन मात्र विशेषकरून अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. जे.बी. राइन यांनी १९३५ पासून सुरू केले. तत्पूर्वीच्या त्यांच्या प्रयोगांद्वारे अतींद्रिय प्रत्यक्षाची (ई.एस.पी.) सत्यता प्रस्थापित झालेली होती. त्यामुळे मनाच्या ठिकाणी वस्तूंची स्थिती व गती प्रभावीत करण्याचे अर्थात कारक सामर्थ्यही असते. ह्या समजुतीसही प्रायोगिक पुरावा मिळतो काय हे पहाण्याचे त्यांनी ठरविले. भिन्नभिन्न आकारमानांचे ,भिन्न भिन्न वजनांचे तसेच भिन्नभिन्न द्रव्यांचे बनविलेले फासे अमुक प्रकारे पडावेत ,अशी पयुक्ताने इच्छा करावयाची व ते फासे यांत्रिक उपकरणाच्या साहाय्याने गडगडत फेकले गेले असता त्यांचे प्रत्य़क्ष पतन आणि यदृच्छया अपेक्षित सरासरी पतन (मीन चान्स एक्स्पेक्टेशन) या दोहोंतील फरक सांख्यिकीय निकषांनुसार महत्वाचा आहे काय हे पहावयाचे, या स्वरूपात कित्येक प्रयोग ड्यूक विद्यापीठांतर्गत परामानसशास्त्रीय प्रयोगशाळेत तसेच इतरत्रही करून पाहण्यात आले आहेत. नाणी, चकत्या वगैरे विविध साहित्य वापरून तसेच विविध उपकरणांचे सहाय्य घेऊनही प्रयोग करण्यात आलेले आहेत. या संशोधनात ,श्रीमती लॉरा डेल, हाकॉन फोरबाल्ड, प्रा. कर्रोल नँश, जी. डब्ल्यू. फिरक, प्रा. आर.एच. थाउलेस, डॉ. रेमी शॉविन, डॉ .कार्लिस अँसिस यांचे प्रयोग विशेष महत्वाचे ठरले आहेत. व त्यांच्या बाबतीत केवळ योगायोग ही उपपत्ती गैरलागू ठरली आहे. प्रयुक्त व्यक्ती व फासे फेकणारे उपकरण यांमध्ये बरेच अंतर ठेवूनही प्रयोग करण्यात आले आहेत.

संकल्पबलाने वस्तू हलवू शकण्याचा ,धातू वाकवू शकण्याचा, वस्तुंचे उष्णतामान बदलवू शकण्याचा दावा करणार्यार काही व्यक्ती परामानशास्त्रज्ञांच्या आढळात आल्यामुळे त्यांचीही प्रायोगिक परीक्षा पाहण्यात आली आहे. रशियातनिना कुलजिना लर, अमेरिकेत स्टॅनफर्ड रिचर्स इन्स्टिट्यूट,कॅलिफोर्नियामध्ये यूरी गेलर या इसमावर न्यूयॉर्क येथे इंगोस्वान याच्यावर करण्यात आलेल्या प्रयोगांनी परमानसशास्त्राविषयी आस्था असणार्यांरचे लक्ष वेधून घेतले असून सदरहू व्यक्तीवरील काही प्रयोग त्यांच्या मनःसामर्थ्याचा पुरावा म्हणून गणता येण्यासारखे ठरले आहेत.

काही जणांच्या केवळ हस्तस्पर्शाने रोगनिवारण होऊ शकते तसेच प्रसन्नचित्त व्यक्तीनी स्पर्श केलेले पाणी रोपांच्या वाढीवर अनुकूल परिणाम करू शकते या समजुतींना पुष्टी देणारे जे प्रयोग बर्नार्ड ग्रॅड यांनी केले आहेत त्याचेंही अर्थघटन मानसिक ऊर्जेच्या परिभाषेत करणे शक्य आहे, असे परामानसशास्त्रज्ञ लूर्सा राइन यांना वाटते.

विज्ञानाच्या प्रचलित विचारसरणीत मनोगती बसू शकत नाही. म्हणून मनोगतीची संकल्पनाच अयथार्थ आहे, असे कित्येक वैज्ञानिक म्हणतात. परंतु परामानसशास्त्रज्ञ असे विचारतात, की मनात आलेल्या विचारमुळए वा इच्छेमुळे स्नायू सक्रिय होणे, मानसजन्य शारीरिक बिघाड (सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स) मानसचिकित्सेव्दारा त्यांचा परिहार, केवळ संमोहनसूचनांच्या योगे घडवून आणता येणारे शारीरिक परिणाम, रूग्णाच्या मनःचक्षूसमोरील अक्षरे आकृती त्याच्या त्वचेवर उमटणे, यांसारखे जे प्रकार वैज्ञानिक मान्य करतात , ते मूलगामी विचार केल्यास मनोगतीचेच निदर्शक नव्हते काय.

मनोगती हा प्रकार प्रयोगसिध्द सत्य ठरल्या कारणाने काही काही प्रकारच्या घटना केवळ योगायोग असे म्हणून वा केवळ अशक्य असे म्हणून इतपर धुडकावून लावता येणार नाहीत, असे परामानसशास्त्रज्ञांचे तसेच इतर काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. उदा. एखादी व्यक्ती गंभीर संकटात सापडली असताना अथवा तिचे प्राणोत्क्रमण होण्याच्या वेळी तिच्यापासून दूर असलेल्या प्रियजनांना एकाएकी भिंतीवरील चित्र पडलेले/घड्याळ बंद पडलेले/दिवा विझल्याचे वगैरे आढळणे अशासारख्या घटनांना त्या प्रियजनांची अतीद्रिय संवेदनक्षमता व त्यांचे मानसिक सामर्थ्य कारणीभूत असणे शक्य आहे असे लूईसा राइन म्हणतात. भुताटकी वा भूतचेष्टा म्हणून समजण्यात येणारे जे प्रकार प्रत्यक्ष भौतिक स्वरूपाचे असतात (उदा. दरवाजा आपोआप उघडला जाणे) त्यांचे कारण ते प्रकार अनुभवास येणार्याप व्यक्तीस त्या ठिकाणाशी संबंधित असलेल्या घटनांचे अतींद्रिय संवेदन व तिची मनोगतिक्षमता हे असण्याची शक्यता आहे. त्रास देणार्या जीवाच्या (पोल्टरगाईस्ट) खोड्या अथवा, भानामतीचे खेळ म्हणून समजल्या जाणार्याच घटनांच्या मुळाशी जर कोणत्याही प्रकारची लबाडी नसल्याचे किंवा कुणाकडूनही जाणूनबुजून म्हणा अथवा नकळत म्हणा झालेल्या शारीरिक क्रिया नसल्याचे वा भौतिक स्वरूपाची कारणे नसल्याचे निःसंशय रीत्या निष्पन्न झाले, तर हे प्रकार ज्या व्यक्ती भोवतीच्या परिसरात होतात तिच्या अंतस्थ भावनिक क्षुब्धतेत त्या प्रकारांचा उगम असण्याची शक्यता आहे असे मानण्याकडे काही परामानसशास्त्रज्ञांचा कल आहे. दूर अंतरावर असलेल्या रूग्ण माणसांचीच नव्हे, तर प्राण्यांची देखील व्याधी कोणी खरोखरीच औषधपाण्याविना दूर करीत असेल, तर तो प्रकारही मनोगतीचा द्योतक मानावा लागेल तसेच प्रार्थनेचे सामर्थ्य ह्या कल्पनेत तथ्यांश आहे हेही मान्य करावे लागेल.

पहा : अतीद्रिय मानसशास्त्र, परचितज्ञान, पराप्रत्यक्ष, पूर्वज्ञान.

संदर्भ : 1. Krippner, Stanley.Ed Advances in Parapsychological Research Vol, 1 New York, 1977.

2. Murphy Gardner,Challenge of Psychical Research, New York,1961.

3. Rhino J.B. Ed. Progress in Parapsychology Durham, N.C. 1971.

4. Rhine, Luisa E, Mind Over Matter, New York, 1970.

अकोलकर, व. वि.