मॅकडॉनल, आर्थर : (१८५४–२८ डिसेंबर १९३०). थोर आंग्ला प्राच्यविद्यापंडित. जन्म बिहारमधील मुझफरपूरचा. त्यांचे वडील सैन्यात नोकरी करण्याच्या निमित्ताने भारतात होते. मॅकडॉनल ह्यांचे शिक्षण गटिंगेन (जर्मनी) आणि ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे झाले. अनेक शिष्यवृत्त्या त्यांनी मिळविल्या होत्या. एम्.ए. झाल्यानंतर ऋग्वेदावरील सर्वानुक्रमणीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली आणि त्याबद्दल लाइपसिक विद्यापीठाकडून (जर्मनी) त्यांना पीएच्.डी देण्यात आली. ऑक्सफर्ड येथे जर्मन आणि संस्कृत ह्या विषयांचे अध्यापन त्यांनी अनेक वर्षे केले. संस्कृतचे बोडन प्राध्यापक होण्याचा मान त्यांना तेथे मिळाला होता. बॅलिअल कॉलेजचे ते अधिछात्र (फेलो) होते. १९१३ मध्ये मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना तेथे मिळाला होता. बॅलिअल कॉलेजचे ते अधिछात्र (फेलो) होते. १९१३ मध्ये मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना कँप्‌बेल मेमोरिअल सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला होता. तसेच कलकत्ता आणि एडिंबरो विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय पदव्या (अनुक्रमे डी.सी.एल् आणि एल्‌एल्‌.डी.) मिळाल्या होत्या. ऑक्सफर्ड येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट’चे त्यांनी संवर्धन केले.

मॅकडॉनल ह्यांनी लिहिलेल्या वा संपादिलेल्या ग्रंथांत सर्वानुक्रमणी ऑफ द. ऋग्वेद (संपा. १८८६), वेदिक माय्‌थॉलॉजी (१८९७), हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१८९९), बृहद्देवता (संपा. २ भाग, १९०४), वेदिक ग्रामर (१९१०) ह्यांचा समावेश होतो. ए. बी. कीथ ह्या प्राच्यविद्याविशारदांच्या वेदिक इंडेक्स ऑफ नेम्स अँड सब्जेक्ट्स (दोन खंड, १९१२) ह्या ग्रंथासाठी मॅकडॉनल ह्यांनी सहकार्य दिले होते.

भट, गो. के.