सिडनी – २ : कॅनडातील एक प्रसिद्घ बंदर व औद्योगिक शहर. लोकसंख्या ३१,५९७ (२०११). ते नोव्हास्कोशा प्रांतात केप ब्रेटन बेटावर हॅलिफॅक्सच्या ईशान्येस सु. ३०४ किमी.वर सिडनी नदीमुखापाशी वसले आहे. शहराचा विस्तार बंदराच्या गोदीच्या दक्षिणेस विशेषत्वाने झालेला आहे. या प्रदेशाचा मध्ययुगापर्यंतचा इतिहास ज्ञात नाही. हा प्रदेश १६३२ मध्ये फ्रेंचांच्या ताब्यात होता. फ्रान्स व अन्य यूरोपीय देशांत उत्रेक्तच्या तहाने स्पेनच्या वारसाचा निकाल झाला आणि केप ब्रेटन हे बेट ब्रिटिशांना देण्यात आले तथापि प्रत्यक्ष त्याचा ताबा १७६३ मध्ये संघर्ष करुन ब्रिटिशांना मिळवावा लागला. पुढे ब्रिटिशांच्या वसाहतीचे केप ब्रेटनमधील सिडनी हे मुख्यालय झाले (१७८४–१८२०). पहिला लेफ्टनंट गव्हर्नर जोसेफ एफ्. डब्ल्यू. सबॅरिस (कार. १७८४–८७) याने या स्थळाचे नाव ब्रिटिश वसाहतिक सचिव लॉर्ड सिडनीच्या स्मरणार्थ सिडनी ठेवले. पुढे केप ब्रेटन बेट नोव्हास्कोशात समाविष्ट केल्यानंतर (१८२०) सिडनीला प्रथम निमशहराचा दर्जा प्राप्त झाला (१८८५) व नंतर शहराचा दर्जा मिळाला (१९०४). त्याचे सुरुवातीचे रहिवासी अमेरिकेतील निष्ठावंत ब्रिटिश राजनिष्ठ होते. शिवाय स्कॉटलंडमधून अनेक आप्रवासी येथे आले आणि लोकसंख्या वाढून शहराचा विकास झाला. या शहराच्या परिसरात कोळशाच्या खाणी असून सिडनी माइन्स आणि ग्लेसबे ही या प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकांची कॅनडातील औद्योगिक केंद्रे होत. येथे दरसाल २०,००,००० टन कोळसा उत्पादित होतो. ‘डोमिनियन स्टील’ कंपनीने येथे कोळसा उत्खननासाठी यंत्रसंच (प्लँट) उभा केला (१८९०). हा कारखाना १९६७ मध्ये राज्यशासनाने आपल्या ताब्यात घेतला. विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात येथे लोखंड-पोलाद उद्योगाची उभारणी झाली. येथील कोळसा सिडनी बंदरातून निर्यात होतो. येथे पोलादाचे कारखाने असून शिवाय ॲल्युमिनियम, स्वयंचलित वाहनांची जोडणी, काँक्रीट, लाकडी फर्निचर व काष्ठकाम यांचे कारखाने आहेत. मच्छीमारी व जहाजदुरुस्ती आणि बांधणी हेही येथील प्रमुख उद्योग होत. शहरात कॅनडियन कोस्ट गार्ड कॉलेज, ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सेंट झेव्हिअर कॉलेज या काही प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. शहराच्या आग्नेयीस सु. ४० किमी. वर किनाऱ्याला लागून फोर्ट्रेस ऑफ लूईसबर्ग नॅशनल हिस्टॉरिक पार्क आहे. १९९५ मध्ये शहराला प्रादेशिक नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला. ट्रान्स कॅनडा हायवे आणि कॅनडियन नॅशनल रेल्वे यांवरील सिडनी हे पूर्वेकडील अंतिम स्टेशन (टर्मिनस)आहे. बंदरातून मोठ्या बोटींबरोबर न्यू फाउंडलंडकडे लहान बोटींची (फेरीबोट) ये-जा चालू असते.

देशपांडे, सु. र.